Sindewahi Tiger Attack : चंद्रपूर: मानव-वन्यजीव संघर्षाचा ‘ब्लॅक स्पॉट’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिंदेवाही तालुक्यात आज पुन्हा एकदा वाघाच्या भीषण हल्ल्याने संपूर्ण जिल्हा हादरून गेला आहे. सिंदेवाही तालुक्यातील गुंजेवाही वनपरिक्षेत्रातील बिट क्रमांक १८३६ मध्ये तेंदूपत्ता गोळा करण्यासाठी गेलेल्या चार महिलांचा वाघाच्या हल्ल्यात जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना २२ मे रोजी सकाळी ७.३० वाजताच्या सुमारास घडली. विशेष म्हणजे, या हल्ल्यात मृत्यू पावलेल्या चारही महिला आपापल्या कुटुंबातील एकमेव कमावत्या होत्या, ज्यामुळे त्यांच्या पश्चात त्यांचे कुटुंबीय पूर्णतः उघड्यावर आले आहेत. (वाघाच्या हल्ल्यात ४ महिलांचा मृत्यू)
थरारक घटना आणि घटनास्थळावरील तणाव
मिळालेल्या माहितीनुसार, २२ मे रोजी पहाटे गुंजेवाही गावातील ७ महिला नेहमीप्रमाणे पोटापाण्यासाठी जंगलात तेंदूपत्ता गोळा करण्यासाठी गेल्या होत्या. जंगलात पोहचल्यावर त्यांनी सुरक्षिततेच्या दृष्टीने दोन गट तयार केले; एका गटात ४ तर दुसऱ्या गटात ३ महिला काम करत होत्या. सकाळी ७.३० वाजेच्या सुमारास, जंगलात दबा धरून बसलेल्या एका वाघिणीने ४ महिलांच्या गटावर अचानक हल्ला केला. या जीवघेण्या हल्ल्यामुळे महिलांनी एकच आक्रोश केला. हा आक्रोश दुसऱ्या गटातील ३ महिलांच्या कानी पडताच त्यांनी भीतीपोटी सैरावैरा पळत जंगलाबाहेर धाव घेतली आणि गावकऱ्यांना घटनेची माहिती दिली. Sindewahi Tiger Attack
सिंदेवाहीत वाढता Sindewahi Tiger Attack आणि नागरिकांची भीती
गावकऱ्यांनी तात्काळ जंगलाकडे धाव घेतली, मात्र तोपर्यंत वाघाच्या हल्ल्यात चारही महिलांचा मृत्यू झाला होता. मृतांमध्ये दोन सख्ख्या बहिणी कु. कवडाबाई दादाजी मोहुर्ले (वय ४५) व कु. अनुबाई दादाजी मोहुर्ले (वय ४०), सौ. संगीता संतोष चौधरी (वय ५०) आणि सौ. सुनीता कौशिक मोहुर्ले (वय ३८) यांचा समावेश आहे. घटनेची माहिती मिळताच वनविभाग आणि पोलीस प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. मात्र, संतप्त गावकऱ्यांनी मृतदेह उचलण्यास तीव्र विरोध केला. “आधी नरभक्षक वाघाचा बंदोबस्त करा आणि मृतकांच्या पीडित कुटुंबांना तात्काळ भरीव आर्थिक मदत द्या,” अशी मागणी करत गावकऱ्यांनी प्रशासनाला धारेवर धरले, ज्यामुळे काही काळ घटनास्थळी कमालीचा तणाव निर्माण झाला होता. अखेर वनविभागाने मागण्या मान्य करण्याचे आश्वासन दिल्यानंतर गावकऱ्यांनी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी नेऊ दिले. Sindewahi Tiger Attack
कमावत्या महिला गेल्या, कुटुंबे झाली पोरकी
या भीषण दुर्घटनेमुळे गुंजेवाही गावावर शोककळा पसरली असून, मृत महिलांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मृत्यू पावलेल्या चारही महिला आपल्या कुटुंबाचा आर्थिक कणा होत्या:
- कवडाबाई आणि अनुबाई मोहुर्ले: या दोन्ही सख्ख्या बहिणींना एक दिव्यांग भाऊ आहे. या दोन्ही बहिणींनी लग्न न करता आपल्या दिव्यांग भावाच्या उदरनिर्वाहासाठी आणि त्याला चांगले जीवन देण्यासाठी जंगलातील कष्ट उपसणे पत्करले होते. त्यांच्या जाण्याने त्यांचा दिव्यांग भाऊ आता पूर्णपणे एकाकी आणि खचून गेला आहे. Sindewahi Tiger Attack
- संगीता संतोष चौधरी: यांचे पती देखील दिव्यांग असून घराची संपूर्ण जबाबदारी संगीता यांच्यावरच होती. मजुरी करून त्या घराचा गाडा चालवत होत्या. त्यांच्या मृत्यूने त्यांच्या पतीला मोठा मानसिक धक्का बसला आहे.
- सुनीता कौशिक मोहुर्ले: यांच्या पतीचे वर्षभरापूर्वीच निधन झाले होते. त्यांना एक ८ वर्षांची लहान मुलगी आहे. पोटच्या मुलीच्या भविष्यासाठी त्या मोलमजुरी करत होत्या, मात्र आता आईच्या जाण्याने ती चिमुरडी पूर्णपणे पोरकी झाली आहे.
दरवर्षी उन्हाळा सुरू झाला की, ग्रामीण भागातील नागरिक महिनाभरात मिळणाऱ्या २० हजार रुपयांच्या उत्पन्नासाठी जीव मुठीत धरून तेंदूपत्ता संकलनासाठी जंगलात जातात. वनविभागाने मृतकांच्या नातेवाईकांना तातडीची आर्थिक मदत सुपूर्द केली आहे. प्राथमिक माहितीनुसार, हा हल्ला एका वाघिणीने केला असून तिच्यासोबत तिचे ४ बछडे देखील आहेत, मात्र वनविभागाने अद्याप यावर अधिकृत शिक्कामोर्तब केलेले नाही. सध्या वनविभागाने वाघाच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी परिसरात कॅमेरा ट्रॅप आणि लाईव्ह कॅमेरे लावले असून, गावकऱ्यांना समूहाने जंगलात जाण्याचे आवाहन केले आहे. Sindewahi Tiger Attack
ताडोबाचे वाघ ‘व्हीव्हीआयपी’; सामान्य नागरिक वाऱ्यावर?
सिंदेवाही आणि चंद्रपूर जिल्ह्यात मानव-वन्यजीव संघर्षाची ही मालिका अत्यंत भयानक रूप धारण करत आहे. गेल्या वर्षी, म्हणजेच १० मे २०२५ रोजी देखील सिंदेवाहीतील डोंगरगाव येथे तेंदूपत्ता गोळा करताना एकाच वेळी ३ महिलांना वाघाने ठार केले होते. वर्ष २०२५ मध्ये या संघर्षात तब्बल ४५ नागरिकांचा बळी गेला होता, तर चालू वर्ष २०२६ मध्ये आतापर्यंत अवघ्या ५ महिन्यांत १९ जणांचा मृत्यू झाला असून त्यात ७ महिलांचा समावेश आहे. गेल्या ५ वर्षांचा (२०२१ ते २०२५) विचार केल्यास या भागात तब्बल २०० नागरिकांना वन्यजीवांच्या हल्ल्यात प्राण गमवावे लागले आहेत. Sindewahi Tiger Attack
या पार्श्वभूमीवर वनविभागाच्या भूमिकेबद्दल नागरिकांमध्ये प्रचंड तीव्र संताप व्यक्त होत आहे. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील वाघ हे वनविभागासाठी ‘व्हीव्हीआयपी’ झाले असून, त्यांच्या सुरक्षेवर आणि देखरेखीवर लाखो रुपये खर्च केले जातात. पर्यटनाच्या माध्यमातून ताडोबा प्रशासनाला दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा महसूल मिळतो, परंतु ताडोबा क्षेत्राबाहेरील वाघांच्या बंदोबस्ताबाबत वनविभाग कमालीचा उदासीन असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे.
सद्यस्थितीत ताडोबा प्रकल्पाच्या आत ९० ते १०० वाघ आहेत, तर प्रादेशिक आणि बफर क्षेत्राबाहेर जवळपास २०० वाघांचा मुक्त वावर आहे. मागील वर्षी वनविभागाने सुरक्षेचे कारण पुढे करत नागरिकांना जंगलात जाण्यास मज्जाव केला होता, परंतु गरिबी आणि पोटाची खळगी भरण्यासाठी वनविभागाच्या आदेशाला डावलून ग्रामीण भागातील नागरिक पहाटेच जंगलात जात आहेत. वनविभागाने केवळ निर्बंध न लादता, या गरिबांच्या रोजगाराचा आणि सुरक्षेचा ठोस उपाय शोधावा, अशी मागणी आता वन्यजीव प्रेमी आणि नागरिकांमधून जोर धरू लागली आहे. Sindewahi Tiger Attack
मानव-वन्यजीव संघर्षात २०० कुटुंब उध्वस्त – बंडू धोत्रे
आज सकाळी सिंदेवाही वनक्षेत्रात एकसाथ चार महिलांचा वाघाच्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झाला. मागील पाच वर्षात जिल्ह्यात २०० व्यक्ती (२०२१-२०२५) तर यंदा १९ व्यक्ती (२०२६ – मात्र ५ महिन्यात) मृत्यू आहे. २१९ हा फक्त आकडा नाही तर उध्वस्त परिवाराची संख्या सुद्धा आहे.
यावर सानुग्रह मदतनिधी देणे, ती अधिक देणे पर्याय नसून यावर कायमस्वरूपी उपाय अमलात आणावा लागेल. त्यासाठी शासनाने कठोर निर्णय घेतले पाहिजे. कायम या जिल्ह्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, यावर उपाययोजना व्हावी. Sindewahi Tiger Attack
“सर्वाधिक मानव वन्यप्राणी संघर्ष आणि मृत्यू होणारा जिल्हा अशी ओळख निर्माण झाली आहे, हे चित्र योग्य नाही. २०२० ला राज्य सरकारने गठीत केलेली राज्यस्तरीय चंद्रपूर जिल्हा वाघ-मानव संघर्ष समिती अहवाल प्राप्त होऊन पाच वर्ष लोटले आहे, अद्याप अमलबजावणी नाही. जिल्ह्यात वाघ संख्या अधिक आहेच तसेच ब्रह्मपुरी वनविभाग मधील वाघाची संख्या सर्वाधिक आहे, या वन विभागाची वाघाची ‘केरिंग कॅपिसिटी’ (वहन क्षमता) लक्षात घेता, ती तिप्पट आहे म्हणजे सर्वाधिक आहे, येथे सातत्याने संघर्ष होत राहील यासाठी या वनविभाग आणि वाघाची संख्या अभ्यास करून उपाययोजना करणे आवश्यक आहे.”
नुकतेच जिल्ह्यातील वरील मानव-वन्यप्राणी संघर्ष निवारण्याच्या प्रलंबित मागण्याकरिता “अन्नत्याग सत्याग्रह”आंदोलन करण्यात आले होते. त्यावर अद्याप कार्यवाही करण्यात आलेली नाही. Sindewahi Tiger Attack
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now
