Illegal Sand Mining : चंद्रपूर – चंद्रपूर जिल्ह्यात अवैधरित्या गौण खनिजाचे उत्खनन आणि चोरटी वाहतूक करणाऱ्या तस्करांविरुद्ध स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) धडक मोहीम उघडली आहे. जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेच्या विविध उपविभागीय पथकांनी वेगवेगळ्या ठिकाणी गोपनीय माहितीच्या आधारे धाडी टाकून अवैध रेती उपसा आणि वाहतूक करणाऱ्या टोळ्यांचा पर्दाफाश केला आहे. गेल्या दोन दिवसांत रामनगर, चिमूर आणि तळोधी पोलीस स्टेशनच्या हद्दीत करण्यात आलेल्या या तीन मोठ्या कारवायांमध्ये पोलिसांनी एकूण ५५ लाख ९५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, अनेक आरोपींवर गुन्हे दाखल केल्याने रेती तस्करांचे धाबे दणाणले आहेत. (शेतकऱ्याने शेतात लावला गांजा)
रामनगर, चिमूर आणि तळोधीत Illegal Sand Mining विरोधात धाडी
पहिली मोठी कारवाई २१ मे २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर येथील उपविभाग मूल पथकाने केली. रामनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत अवैधरित्या गौण खनिजाची चोरटी वाहतूक केली जात असल्याची खात्रीशीर गोपनीय माहिती या पथकाला मिळाली होती. माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचून रामनगर हद्दीत छापा टाकला. या कारवाई दरम्यान पोलिसांनी अशोक लेलँड कंपनीचा हायवा ट्रक (क्रमांक MH 34 CQ 7878) ताब्यात घेतला, ज्यामध्ये १० ब्रास रेती भरलेली होती.
जप्त केलेल्या हायवा ट्रकची किंमत अंदाजे ४० लाख रुपये आणि रेतीची किंमत ७० हजार रुपये असून, एकूण ४० लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी आरोपी चालक देवानंद मारुती सोमणकर (वय ३६ वर्षे, रा. गडचिरोली) आणि वाहन मालक बिट्टू उर्फ हरीश सय्यद (रा. चंद्रपूर) यांच्याविरुद्ध रामनगर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) चे कलम ३०३(२), जमीन महसूल कायदा आणि मोटार वाहन कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुसऱ्या कारवाईत ५ लाखाचा मुद्देमाल जप्त
दुसरी कारवाई २२ मे २०२६ रोजी उपविभाग चिमूर पथकाने केली. चिमूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील मौजा चिमूर नाला येथून अवैधरित्या रेतीचे चोरटे उत्खनन करून वाहतूक केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पथकाने चिमूर नाला परिसरात धाड टाकली. या छाप्यामध्ये पोलिसांनी विना क्रमांकाची ट्रॉली असलेला एक ट्रॅक्टर आणि त्यामध्ये भरलेली एक ब्रास रेती असा एकूण ५ लाख ५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
या प्रकरणी पोलिसांनी घटनास्थळावरून आरोपी बापुराव आत्माराम चव्हाण (वय २८ वर्षे, रा. शिवापूर बंदर, तह. चिमूर) याला ताब्यात घेतले, तर त्याचा साथीदार बबलू जाधव (रा. चिमूर) हा पसार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. या आरोपींविरुद्ध चिमूर पोलीस ठाण्यात अप.क्र. ५१७/२६, कलम ३०३(२), ४९ बीएनएस, जमीन महसूल कायदा कलम ४८(७), ४८(८) आणि मोटार वाहन कायद्याच्या कलम १७७ अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
तिसरी कारवाई देखील २२ मे रोजीच उपविभाग ब्रह्मपुरी पथकाद्वारे करण्यात आली. तळोधी पोलीस स्टेशनच्या हद्दीत अवैध रेतीची चोरटी वाहतूक होत असल्याची टीप मिळाल्यावरून ब्रह्मपुरी पथकाने तळोधी परिसरात छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी रेतीने भरलेले दोन ट्रॉलीसह ट्रॅक्टर जप्त केले. यामध्ये दोन ट्रॅक्टर आणि ट्रॉलीची किंमत १० लाख रुपये आणि त्यातील २ ब्रास रेतीची किंमत २० हजार रुपये असा एकूण १० लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
याप्रकरणी पोलिसांनी आतिश परसराम मसराम (रा. वलनी) याला आरोपी केले असून, ट्रॅक्टर मालक सागर मेश्राम (रा. वलनी, ता. नागभीड) आणि ट्रॅक्टर क्रमांक MH-34-BV-4189 चा चालक/मालक या फरार आरोपींचा शोध सुरू आहे. या सर्वांविरुद्ध तळोधी पोलीस ठाण्यात कलम ३०३(२), ४९ बीएनएस, जमीन महसूल कायदा व मोटार वाहन कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या या सलग तीन धडक कारवायांनी जिल्ह्यातील अवैध रेती उपसा करणाऱ्या माफियांमध्ये घबराट पसरली असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






