ब्रह्मपुरी रेती तस्करी प्रकरणात पोलिसांनी जप्त केलेला रेतीचा ट्रक

नाकाबंदीत ट्रक अडवले; परवान्याविना रेती वाहतुकीचा प्रकार उघड

User avatar placeholder
Written by Prakash Hande

नोव्हेंबर 25, 2026

चंद्रपूर: ब्रह्मपुरी रेती तस्करी प्रकरणात ब्रह्मपुरी पोलिसांनी गांगलवाडी परिसरात काही तासांच्या अंतराने दोन कारवाया करून ५० लाख ८६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. २४ आणि २५ नोव्हेंबर २०२६ रोजी झालेल्या या कारवायांत दोन ट्रक आणि सुमारे १६ ब्रास रेती हस्तगत करण्यात आली. गडचिरोली जिल्ह्यातील वैनगंगा नदीपात्रातून ही रेती आणली जात असल्याचे पोलिसांनी सांगितले. चालक, हेल्पर आणि वाहनमालकांविरुद्ध भारतीय न्याय संहितेनुसार दोन गुन्हे दाखल झाले आहेत. (२ लाखांची मागितली खंडणी, गुन्हा दाखल)

ब्रह्मपुरी रेती तस्करी: गांगलवाडीत मध्यरात्री पहिली कारवाई

गडचिरोली जिल्ह्यातील वैनगंगा नदीच्या पात्रातून शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडवत चोरून रेतीची अवैध वाहतूक करणाऱ्या तस्करांविरुद्ध ब्रह्मपुरी पोलिसांनी अवघ्या काही तासांच्या अंतरात दोन धडक कारवाया करत तब्बल ५० लाख ८६ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. गांगलवाडी परिसरात मध्यरात्री आणि पहाटेच्या सुमारास केलेल्या या सलग कारवायांमध्ये दोन जडवाहू ट्रक आणि १६ ब्रास रेती हस्तगत करण्यात आली असून, चालक, हेल्पर, वाहनमालक व रेती तस्करांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या सलग कारवायांमुळे जिल्ह्यातील वाळू तस्करांचे धाबे दणाणले आहेत. (ब्रह्मपुरी रेती तस्करी)

पहिल्या कारवाईत २४ नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री साडेदहा ते २५ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री सव्वाबाराच्या दरम्यान मौजा गांगलवाडी येथील एसबीआय बँकेसमोर, गांगलवाडी ते तळोधी रोडवर नाकाबंदी व कारवाई करण्यात आली. ब्रह्मपुरी पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक प्रीतमकुमार भरत येरमे हे रात्रपाळीत डीओ अधिकारी म्हणून अंमलदार मोहसीन यांच्यासोबत कर्तव्यावर असताना ठाणेदारांनी फोनवरून माहिती दिली की, गांगलवाडी येथे परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक सचिन खेत्रे यांनी विनापरवाना अवैध रेती वाहतूक करणारा ट्रक पकडून ठेवला असून पुढील कारवाई करावी. त्यानुसार येरमे व त्यांचे पथक चालक अंमलदार चौधरी यांच्यासोबत शासकीय वाहनाने घटनास्थळी पोहोचले.

तेथे थांबवण्यात आलेल्या टाटा कंपनीच्या ट्रक क्रमांक MH-40-CV-7116 च्या चालकाची विचारपूस केली असता त्याने आपले नाव अभिलाश रमेश मुनघाटे (वय ३०, रा. हिरापूर, ता. चिमूर, जि. चंद्रपूर) असे सांगितले. त्याने ट्रकमध्ये रेती असून ती वघाळा (ता. आरमोरी, जि. गडचिरोली) येथील रेती घाटातून भरून सामदा येथे नेत असल्याची कबुली दिली; मात्र वाहतुकीचा कोणताही परवाना नसल्याचे स्पष्ट झाले. ट्रकमध्ये १० ब्रासपेक्षा अधिक रेती असल्याचा संशय बळावल्यानंतर चालकाने आठ ब्रासपेक्षा जास्त रेती असल्याचे सांगितले.

वैनगंगा नदी रेती अवैध वाहतुकीचा आरोप, ब्रह्मपुरी रेती तस्करी

त्यानंतर स्थानिक पंच नलेश देवाजी भोयर (वय ५०) आणि किशोर रामभाऊ पाटील (वय ४५, दोघेही रा. गांगलवाडी) यांच्यासमक्ष ३० लाख रुपये किमतीचा ट्रक आणि ५० हजार रुपये किमतीची १० ब्रास रेती असा एकूण ३० लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी चालक अभिलाश मुनघाटे, हेल्पर गौरव भोयर (वय २४, रा. कांपा, ता. नागभीड, जि. चंद्रपूर, फरारी) आणि ट्रक मालक कैलाश सपाटे (वय ४०, रा. आरमोरी, जि. गडचिरोली) यांच्याविरुद्ध २५ नोव्हेंबर रोजी पहाटे १ वाजेदरम्यान ब्रह्मपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद क्रमांक ०८४३ अन्वये BNS कलम ३०३(२), ४९ व ३(५) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रेखलाल भैयालाल गौतम करीत आहेत. (ब्रह्मपुरी रेती तस्करी)

या कारवाईनंतर अवघ्या काही तासांतच, २५ नोव्हेंबर २०२६ रोजी पहाटे ३ वाजून ५० मिनिटांपासून ४ वाजून ४० मिनिटांदरम्यान ब्रह्मपुरी पोलिसांनी दुसरी मोठी कारवाई केली. पोलीस निरीक्षक कांचन पद्माकर पांडे हे अंमलदार देवेंद्र लोनवले आणि उमेश पोटावी यांच्यासह नागभीड, तळोधी आणि सिंदेवाही भागात विभागीय गस्त पूर्ण करून गांगलवाडी मार्गे ब्रह्मपुरीकडे परत येत होते. गांगलवाडी ते तळोधी रोडवरील ग्रामपंचायत कार्यालयासमोर नाकाबंदी दरम्यान आरमोरीकडून येणारा अशोक लेलँड कंपनीचा ट्रक क्रमांक MH-49-AT-3591 थांबवण्यात आला. (ब्रह्मपुरी रेती तस्करी)

चालकाकडे चौकशी केल्यानंतर त्याने आपले नाव आकाश विनोद वैरागडे (वय २२, रा. बामणी, ता. पवनी, जि. भंडारा) असे सांगितले, तर त्याच्यासोबत हेल्पर गोवर्धन उर्फ पवन अशोक डहारे (वय २२, रा. निष्टी, ता. पवनी, जि. भंडारा) हा आढळून आला. हा ट्रक मयूर भोयर (रा. उमरेड, जि. नागपूर) यांच्या मालकीचा असून धनपाल गभणे (रा. गुडेगाव, ता. पवनी, जि. भंडारा) यांच्या सांगण्यावरून ठाणेगाव (ता. आरमोरी, जि. गडचिरोली) येथील वैनगंगा नदीच्या पात्रातून रेती भरून नागभीडकडे नेण्यात येत असल्याची माहिती समोर आली.

वाहतुकीचा परवाना नसल्याचे निष्पन्न झाल्यानंतर स्थानिक पंच जीवन रामभाऊ म्हशाखेत्री (वय ४९) आणि अभय गणेश मेश्राम (वय ३१, दोघेही रा. गांगलवाडी) यांच्यासमक्ष २० लाख रुपये किमतीचा ट्रक आणि ३६ हजार रुपये किमतीची अंदाजे ६ ब्रास रेती असा एकूण २० लाख ३६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. (ब्रह्मपुरी रेती तस्करी)

या दुसऱ्या प्रकरणी चालक आकाश वैरागडे, हेल्पर गोवर्धन उर्फ पवन डहारे तसेच पाहिजे आरोपी वाहनमालक मयूर भोयर आणि धनपाल गभणे यांच्याविरुद्ध २५ नोव्हेंबर रोजी सकाळी ब्रह्मपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद क्रमांक ०८४४ अन्वये BNS कलम ३०३(२), ४९ आणि ३(५) नुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. दोन्ही गुन्ह्यांच्या घटनास्थळ पंचनाम्याचे चित्रीकरण व दस्तऐवजीकरण ‘ई-साक्ष’ ॲपद्वारे करण्यात आले असून, या गुन्ह्यांचा पुढील तपासही पोलीस उपनिरीक्षक रेखलाल भैयालाल गौतम यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. वैनगंगा नदीपात्रातून होणाऱ्या अवैध रेती उपसा व वाहतुकीमुळे पर्यावरणाचा ऱ्हास आणि शासकीय महसुलाचे मोठे नुकसान होत असून, अशा तस्करांवर कठोर कारवाई सुरूच राहील, असा संकेत या सलग कारवायांमधून देण्यात आला आहे.

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment