वरोरा रावण दहन बंदी मागणीचे निवेदन देताना आदिवासी समाजबांधव

रावण दहनाची इंस्टाग्रामवर स्टोरी आणि आदिवासी बांधवांचे पोलिसांना निवेदन

User avatar placeholder
Written by Prakash Hande

ऑक्टोबर 18, 2026

वरोरा (चंद्रपूर): वरोरा रावण दहन बंदी या मागणीसाठी समस्त आदिवासी ‘सगा’ समाजाने वरोरा पोलीस ठाण्यात निवेदन सादर केले. दसऱ्याला होणाऱ्या रावण दहनामुळे धार्मिक भावना दुखावतात, असे निवेदनात म्हटले आहे. वरोऱ्यात रावण दहन जल्लोषात होणार असल्याची इन्स्टाग्राम पोस्ट व्हायरल झाल्याचा उल्लेख निवेदनात आहे. संबंधित व्यक्तींवर कायदेशीर कारवाईची मागणी करण्यात आली आहे. निवेदनानुसार, कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवल्यास जबाबदारी प्रशासनाची राहील. (९ वर्षीय मुलावर बिबट्याचा हल्ला, वाचा बातमी)

वरोरा रावण दहन बंदी : निवेदनात काय मागणी?

जल, जंगल आणि जमिनीचे रक्षण करणारे प्रकृती पूजक आदिवासी समाज महात्मा राजा रावण यांना आपले आराध्य दैवत मानतो. मात्र, विजयादशमीच्या (दसऱ्याच्या) दिवशी होणाऱ्या रावणाच्या दहनामुळे आदिवासी समाजाच्या धार्मिक व सांस्कृतिक भावना मोठ्या प्रमाणावर दुखावल्या जात आहेत. या गंभीर मुद्द्यावर वरोरा तालुक्यात तीव्र रोष व्यक्त करण्यात आला असून, दसऱ्याच्या दिवशी होणाऱ्या रावण दहनावर पूर्णपणे बंदी घालण्यात यावी, या प्रमुख मागणीसाठी समस्त आदिवासी ‘सगा’ समाजाच्या वतीने वरोरा पोलीस स्टेशनमध्ये अधिकृत निवेदन सादर करण्यात आले आहे.

इन्स्टाग्राम पोस्टवर कारवाईची मागणी

गेल्या काही वर्षांपासून रावणा दहनाविरोधात आदिवासी समाजाने राज्यभरात जनजागृती मोहीम हाती घेतली असून, अनेक शहरांमध्ये आता रावण दहन बंदही करण्यात आले आहे. असे असतानाच, नुकतीच काही समाजकंटकांकडून इन्स्टाग्रामवर स्टोरी ठेवून वरोऱ्यात रावण दहन जल्लोषात होणार असल्याची पोस्ट व्हायरल करण्यात आली. या प्रकारामुळे आदिवासी समाजाच्या भावना तीव्र स्वरूपात दुखावल्या असून, सामाजिक सलोखा बिघडवणाऱ्या संबंधित समाजकंटकांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी या अर्जात करण्यात आली आहे.

प्रशासनाने या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून तातडीने योग्य ती पावले उचलली नाहीत आणि तालुक्यात कुठेही महात्मा राजा रावण यांचे दहन झाल्यास समस्त आदिवासी ‘सगा’ समाज तीव्र आंदोलनासाठी रस्त्यावर उतरेल, असा सज्जड इशारा या निवेदनाद्वारे प्रशासनाला देण्यात आला आहे. यानंतर दोन समाजात कोणत्याही प्रकारची तेढ निर्माण झाल्यास किंवा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची राहील, असेही या निवेदनात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे.

यावेळी निवेदन सादर करताना बाळूभाऊ गेडाम, ज्येष्ठ आदिवासी नेते तथा पंचायत समितीचे माजी सदस्य चिंतामणजी आत्राम, वरोऱ्याचे माजी नगराध्यक्ष गजानन मेश्राम, साहित्यिक दत्तात्रय गावंडे, सामाजिक कार्यकर्ते संदीप धानोरकर, तसेच आनंद गेडाम, सतीश गेडाम, सूरज पेंदोर, मनोज पेंदोर यांच्यासह असंख्य आदिवासी समाजबांधव आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या घटनेमुळे वरोरा परिसरात एकच चर्चा रंगली असून, पोलीस व प्रशासनाकडून या प्रकरणावर लक्ष ठेवण्यात येत आहे.

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment