चंद्रपूर महिला हत्या प्रकरणाचा तपास करणारे चंद्रपूर शहर पोलीस ठाण्याचे पथक

साहेब मी खून केला, शहर पोलीस ठाण्यात खळबळ, हत्या चंद्रपुरात मृतदेह नागपुरात दफन

User avatar placeholder
Written by Prakash Hande

ऑक्टोबर 18, 2026

चंद्रपूर: चंद्रपूर महिला हत्या प्रकरणात ४९ वर्षीय आरोपीला न्यायालयाने २२ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलिसांनी सांगितल्यानुसार, तो १७ ऑक्टोबरला चंद्रपूर शहर पोलीस ठाण्यात स्वतः हजर झाला. पोलिसांच्या माहितीनुसार, त्याने १४ ऑक्टोबरला ४५ वर्षीय महिलेची हत्या केल्याची कबुली दिली. मृतदेह हिंगणा (जि. नागपूर) येथे पुरल्याचेही त्याने सांगितले. पोलिसांनी तहसीलदारांच्या उपस्थितीत मृतदेह बाहेर काढला. आरोपीवर भारतीय न्याय संहितेच्या कलम १०३(१) आणि २३८ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. (९ वर्षीय मुलावर बिबट्याचा हल्ला, वाचा थरार)

चंद्रपूर महिला हत्या : आरोपी स्वतः पोलीस ठाण्यात हजर

एखाद्या क्राईम थ्रिलर चित्रपटालाही लाजवेल अशी ही थरारक आणि अंगावर काटा आणणारी घटना चंद्रपुरात उघडकीस आली आहे. अनैतिक संबंधातील वादातून एका ४९ वर्षीय इसमाने आपल्या ४५ वर्षीय प्रेयसीची अत्यंत निर्घृणपणे गळा दाबून हत्या केली. एवढेच नव्हे तर, हत्येचा हा कट लपवण्यासाठी आणि पुरावा नष्ट करण्यासाठी आरोपीने तिचा मृतदेह चारचाकी वाहनातून थेट नागपूर गाठत हिंगणा परिसरातील एका निर्जन भागात नेऊन खड्डा खोदून गाडून टाकला. मात्र, घटनेनंतर पश्चातापाची आग जिवंत राहिल्याने आरोपीने स्वतः पोलीस ठाणे गाठून आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आणि या गुन्हेगारी प्रकरणाचा पर्दाफाश झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, संतोष साखरकर (वय ४९, रा. तुकूम, चंद्रपूर) असे आरोपीचे नाव असून, मृत महिला सुद्धा चंद्रपूर येथीलच राहणारी आहे. आरोपी संतोष साखरकर याचे संबंधित ४५ वर्षीय महिलेसोबत मागील ३ ते ४ वर्षांपासून अनैतिक प्रेमसंबंध सुरू होते. दरम्यान, १४ ऑक्टोबर २०२६ रोजी दोघांमध्ये कोणत्या तरी कारणावरून जोरदार वाद झाला. या वादातून संताप अनावर झाल्याने संतोष साखरकर याने महिलेचा गळा दाबून तिला जागीच ठार मारले.

हत्या केल्यानंतर हा भयानक प्रकार उघडकीस येऊ नये आणि पोलिसांच्या तावडीतून सहज सुटका व्हावी, यासाठी आरोपीने अत्यंत चलाखीने मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचे ठरवले. त्याने आपल्या चारचाकी वाहनात मृतदेह टाकला आणि चंद्रपूरहून थेट नागपूर गाठले. नागपूरमधील हिंगणा परिसरातील एका सुनसान भागात जाऊन त्याने रात्रीच्या वेळी मृतदेह गाडला, जेणेकरून कोणालाही संशय येणार नाही.

मात्र, या भयानक कृत्यानंतर आरोपीच्या मनातील पश्चातापाची भावना तीव्र होत गेली. सतत खाणाऱ्या गुन्हेगारीच्या जाणिवेनंतर १७ ऑक्टोबर २०२६ रोजी आरोपी संतोष साखरकर हा स्वतः चंद्रपूर शहर पोलीस ठाण्यात दाखल झाला. त्याने घडलेल्या संपूर्ण प्रकाराची पोलिसांसमोर अंगावर काटा आणणारी कबुली दिली.

हिंगणा येथे मृतदेह उत्खनन आणि पंचनामा

आरोपीने स्वतः येऊन माहिती दिल्यानंतर चंद्रपूर शहर पोलिसांनी तात्काळ पावले उचलली. पोलीस पथकाने नागपूर गाठत हिंगणा येथील सुनसान भागात कार्यकारी दंडाधिकारी तथा तहसीलदारांच्या उपस्थितीत रीतसर पंचनामा केला. जमिनीचे उत्खनन करून संबंधित महिलेचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. मृतदेहाची ओळख पटवल्यानंतर तो उत्तरीय तपासणीसाठी (पोस्टमॉर्टीएम) जिल्हा सामान्य रुग्णालय, चंद्रपूर येथे हलवण्यात आला. या प्रकरणी चंद्रपूर शहर पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात भारतीय न्याय संहिता (BNS) च्या कलम १०३ (१) व २३८ अन्वये हत्येचा आणि पुरावा नष्ट केल्याचा गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली असून, न्यायालयासमोर رजू केले असता न्यायालयाने त्याला २२ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

ही अत्यंत महत्त्वाची आणि धडक कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली चंद्रपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शाम गव्हाणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज सहारे, पोलीस हवालदार राकेश फुकट तसेच पोलीस अंमलदार मोरेश्वर शिंदे, रोशन भोईंकर आणि लीना काठवले यांच्या पथकाने पार पाडली असून, पोलीस या प्रकरणाचा पुढील सखोल तपास करीत आहेत.

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment