चंद्रपूर: सावली पत्नीवर हल्ला प्रकरणी भारपायली येथील एका पतीविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी महिलेच्या तक्रारीनुसार, दारूच्या नशेत पतीने दोन वर्षांच्या मुलीला मारहाण केली. विरोध केल्यावर पत्नीच्या डोक्यात खलबत्ता मारल्याचा आरोप आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील सावली पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या भारपायली गावात एक अत्यंत संतापजनक आणि क्रूर प्रकार उघडकीस आला आहे. दारूच्या नशेत चूर असलेल्या पतीने आपल्या दोन वर्षांच्या चिमुकल्या मुलीला विनाकारण मारहाण केली. इतकेच नव्हे तर, याचा विरोध करणाऱ्या पत्नीलाही बेदम मारहाण करत तिच्या डोक्यात लोखंडी खलबत्ता घालून तिचे डोके फोडल्याची धक्कदायक घटना घडली आहे. याप्रकरणी सावली पोलिसांनी आरोपी पतीविरुद्ध गंभीर कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे. (प्रेमसंबंधात वाद, शिक्षकाने प्रेयसीची केली हत्या, वाचा हत्येचा थरार)
सावली पत्नीवर हल्ला प्रकरणाची घटना कशी घडली?
पोलिसांकडून मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, फिर्यादी सौ. अंकिता मयूर दंडीकवार (वय २१, रा. भारपायली, ता. सावली) हिचे मयूर शरद दंडीकवार (वय २५) याच्याशी विवाह झाला असून त्यांना दोन वर्षांची मुलगी आहे. आरोपी मयूर हा दारू पिण्याच्या सवयीचा असून तो नेहमीच दारूच्या नशेत पत्नीवर विनाकारण संशय घेऊन तिच्याशी भांडण करत मारहाण करत असे.
दरम्यान, दिनांक १९ ऑक्टोबर रोजी रात्री ७.३० वाजताच्या सुमारास हा गुन्हा घडला. फिर्यादी अंकिता या घरातील बेडरुममध्ये झोपलेल्या असताना किचनमधील खोलीतून मुलीचा रडण्याचा आवाज आला. त्यांनी तिकडे जाऊन पाहिले असता आरोपी मयूर हा दोन वर्षांच्या चिमुकल्या मुलीला मारहाण करत होता. पोटच्या मुलीला विनाकारण मारहाण करत असलेले पाहून अंकिता यांनी पतीला जा विचारला की, “तुम्ही मुलीला कशाला मारता, ती लहान आहे, तिला काय समजते?”
यावर संतापलेल्या आरोपी पतीने अंकिता यांना उद्धटपणे उत्तर देत, “मी तुला आणि मुलीला ओळखत नाही, तू माझी पत्नी नाही आणि ही त्रिशा माझी मुलगी नाही, मी तिला मारून टाकेन, तू मला सांगणारी कोण?” असे म्हणून शिवीगाळ केली. तसेच हाताबुक्क्यांनी बेदम मारहाण करून किचनमध्ये ठेवलेला लोखंडी खलबत्ता हातात घेतला आणि अंकिता यांच्या डोक्यात जोरदार प्रहार केला. या हल्ल्यात अंकिता यांचे डोके फुटून मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाल्यामुळे त्या डोक्याला हात धरून खाली बसल्या. त्यानंतर आरोपीने, “आता तू जर जास्त करशील तर तुला व मुलीला मारून टाकतो,” अशी जीवे मारण्याची धमकी दिली.
या दरम्यान घरातील सासू छाया दंडीकवार व ननद साक्षी दंडीकवार तिथे आल्याचे पाहून आरोपी मयूर तिथून निघून गेला. काही वेळाने पीडित महिलेने आपले वडील भास्कर बिटपल्लीवार यांना फोन करून घडсलेल्या प्रकाराची माहिती देऊन बोलावून घेतले. त्यानंतर वडिलांसोबत सावली पोलीस ठाण्यात पोहोचून अंकिता यांनी पतीविरुद्ध तक्रार नोंदवली.
पीडितेच्या तोंडी फिर्यादीवरून सावली पोलिसांनी दिनांक २० ऑक्टोबर रोजी पहाटे ०१:२७ वाजताच्या सुमारास भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ च्या कलम ११८(१), ३५१(२), आणि ३५२ अन्वये गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार अजय विजयराव वडलावार हे करत आहेत.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






