बल्लारपूर (चंद्रपूर): पतीचा पत्नीवर हल्ला केल्याची घटना बल्लारपूर तालुक्यातील इटोली गावात २९ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री घडल्याची तक्रार आहे. ७० वर्षीय पतीविरोधात बल्लारपूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
तक्रारीनुसार, चारित्र्यावर संशय घेऊन आरोपीने ६५ वर्षीय पत्नीवर कुऱ्हाडीने वार केला. या हल्ल्यात महिलेच्या डाव्या पायाला गंभीर दुखापत झाली. त्यांच्यावर बल्लारपूर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलीस पुढील तपास करत आहेत. (पोलिसांचा पोलीस ठाण्यात धिंगाणा, गुन्हा दाखल. वाचा हि बातमी)
पतीचा पत्नीवर हल्ला: २९ सप्टेंबरच्या रात्री काय घडले?
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, इटोली येथील रहिवासी तक्रारदार (वय ६५) आणि त्यांचे पती रामदास लक्ष्मण भुरसे (वय ७०) यांच्यात गेल्या काही काळापासून कौटुंबिक विवाद सुरू होते. रामदास भुरसे हे पत्नीच्या चारित्र्यावर सतत संशय घेऊन तिला मारहाण करत असत. या संशयातूनच महिन्याभरापूर्वी नागपंचमीच्या दिवशी आरोपीने कुऱ्हाडीने मारून पत्नीला जखमी केले होते, ज्याबाबत पोलिसांत तक्रारही नोंदवण्यात आली होती. सततच्या त्रासाला कंटाळून पोळ्याच्या सणापासून चंद्रकला या घरातील तीन खोल्यांमध्ये वेगळ्या राहणाऱ्या मुला-सुनेसह राहू लागल्या होत्या, तर आरोपी पती घराला लागून असलेल्या सायवना (छपरात) एकटाच राहत होता.
२९ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री सुमारे आठ-साडेआठ वाजेच्या सुमारास पीडित महिला या नेहमीप्रमाणे जेवण आटोपून आपल्या नातींसोबत पहिल्या खोलीत बसल्या होत्या. त्यावेळी आरोपी रामदास भुरसे याने बाहेरून शिवीगाळ करत थेट हातात कुऱ्हाड घेऊन घरात प्रवेश केला. “आज तुला जिवंत मारून टाकतो” असे ओरडत त्याने चंद्रकला यांच्यावर कुऱ्हाडीचा वार केला. वार चुकवण्यासाठी त्या खाली बसल्याने कुऱ्हाड त्यांच्या डाव्या पायावर गुडघ्याखाली लागली आणि गंभीर दुखापत झाली.
नागरिकांची गर्दी जमताच आरोपी पसार
जीव वाचवण्यासाठी त्या ओरडत बाहेर पळाल्या असता, आरोपी हातात कुऱ्हाड घेऊन मागे धावला. भीतीपोटी महिलेने शेजारील हिरामण भय्याजी पिपरे यांच्या घरात जाऊन आश्रय घेतला. त्यांचा आक्रोश ऐकून गावातील रूपेश दुधबडे, प्रभाकर भुरसे, साईनाथ बोबाटे, लक्ष्मी पिपरे व इतर नागरिक घटनास्थळी जमा झाले. नागरिकांची गर्दी पाहून आरोपी रामदास भुरसे कुऱ्हाड तिथेच टाकून पसार झाला.
घटनेची माहिती मिळताच तक्रारदार यांच्या मुलाने तत्काळ पोलिसांना संपर्क साधला. बल्लारपूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमी महिलेला उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय, बल्लारपूर येथे दाखल केले.
या प्रकरणी ३० सप्टेंबर २०२६ रोजी चंद्रकला भुरसे यांच्या तक्रारीवरून बल्लारपूर पोलिसांनी आरोपी रामदास लक्ष्मण भुरसे याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS), २०२३ च्या कलम १०९(१) (हत्येचा प्रयत्न), २९६ (अश्लील कृत्य/शिवीगाळ) आणि ३५१(३) (गुन्हेगारी धमकी) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. प्रकरणाचा पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक करिश्मा मोरे करत आहेत.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






