माता महाकाली महोत्सवाच्या सांगतेनिमित्त चंद्रपुरात निघालेली नगर प्रदक्षिणा पालखी

चंद्रपुरात माता महाकाली महोत्सवाची सांगता; नगर प्रदक्षिणा पालखी सोहळ्यात हजारो भाविक

User avatar placeholder
Written by Prakash Hande

ऑक्टोबर 20, 2026

चंद्रपूर: माता महाकाली महोत्सवाची सोमवारी चंद्रपुरात भव्य नगर प्रदक्षिणा पालखी सोहळ्याने सांगता झाली. आमदार किशोर जोरगेवार यांच्या पुढाकाराने पाच दिवस हा महोत्सव सुरू होता. पालखी सायंकाळी सहा वाजता महाकाली मंदिरातून निघाली. गिरनार चौक, गांधी चौक व जटपुरा गेटमार्गे ती पुन्हा मंदिरात पोहोचली. आमदारांनी सांगितले की, दुष्काळी परिस्थितीमुळे मनोरंजन कार्यक्रम रद्द केले आणि शेतकऱ्यांना मदत केली जाईल.

‘जय माता महाकाली, जय महाकाली!’ अशा अखंड जयघोषाने दुमदुमलेले शहर, मातेच्या दर्शनासाठी आतुर झालेले हजारो भाविक, भक्तिरसात न्हाऊन निघालेले रस्ते आणि टाळ-मृदंग व ढोल-ताशांच्या निनादात पुढे सरकणारी मातेची भव्य पालखी… अशा अत्यंत मंगलमय आणि उत्साही वातावरणात सोमवारी श्री माता महाकाली महोत्सवाची सांगता भव्य नगर प्रदक्षिणा पालखी सोहळ्याने झाली. आमदार किशोर जोरगेवार यांच्या पुढाकारातून गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेल्या या महोत्सवाचा समारोप होत असताना भाविकांच्या मनात मातेच्या दर्शनाचे समाधान आणि भक्तीचा आनंद ओसंडून वाहत होता. (उरलेले अन्न खाल्ल्याने विषबाधा, चिमूर तालुक्यातील घटना, वाचा बातमी)

श्री माता महाकाली मंदिरातून सोमवारी सायंकाळी ६ वाजता नगर प्रदक्षिणा पालखी सोहळ्याला मोठ्या दिमाखात प्रारंभ झाला. ही पालखी गिरनार चौक, गांधी चौक आणि जयंत टॉकीज चौक मार्गे जटपुरा गेटची प्रदक्षिणा घालत कस्तुरबा मार्गाने पुन्हा श्री माता महाकाली मंदिरात पोहोचली. पालखी मार्गावर ठिकठिकाणी भाविकांनी दर्शनासाठी अलोट गर्दी केली होती.

धार्मिक परंपरा आणि संस्कृतीचे दर्शन

या पालखी सोहळ्यात मातेची उत्सवमूर्ती, आकर्षक रथ, गंगा आरती, पोतराज नृत्यसमूह, झांज-डमरू पथक आणि शिवतांडव-अघोरी नृत्याने भव्यता आणली. पवनसुत बाहुबली हनुमानाचे बोलके दृश्य, वारकऱ्यांचा गजर, अश्वावर आरूढ नवदुर्गेचे रूप आणि मुलांनी सादर केलेली लाठी-काठी, दानपट्टा, तलवारबाजीची प्रात्यक्षिके उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होती. याशिवाय श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील देखावे, चंद्रपूरमधील मंदिरे, तंट्या भील यांच्यावरील सादरीकरण आणि बंगाली समाजातील महिलांचा शंखनाद यातून इतिहास व अध्यात्माचा अनोखा संगम पाहायला मिळाला. विविध सामाजिक संघटनांच्या वतीने भाविकांसाठी पिण्याचे पाणी व शीतपेयांची सोय करण्यात आली होती.

मान्यवरांची उपस्थिती अन् सामाजिक बांधिलकी

या महोत्सवात माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर, खासदार प्रतिभा धानोरकर, आमदार विजय वडेट्टीवार आणि जिल्हा व सत्र न्यायाधीश पी. एम. गुप्ता यांसारख्या विविध राजकीय, सामाजिक व प्रशासकीय क्षेत्रांतील मान्यवरांनी भेट देऊन मातेची पूजा-अर्चना केली. सोहळ्याच्या शेवटी महोत्सवात सहभागी झालेल्या विविध मंडळ, समाज आणि संघटनांना आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

लोकसहभाग हीच आमची ताकद – आ. किशोर जोरगेवार

यावेळी बोलताना आमदार किशोर जोरगेवार म्हणाले, “चंद्रपूरच्या माता महाकालीची महती देशभर पोहोचावी यासाठी आम्ही दरवर्षी या महोत्सवाचे आयोजन करतो. दरवर्षी वाढणारा लोकसहभाग आमची ऊर्जा वाढवणारा आहे. यंदा राज्यातील दुष्काळी परिस्थितीचे भान ठेवून आम्ही मनोरंजनाचे सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत. महोत्सव समितीच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याद्वारे दुष्काळग्रस्त शेतकरी बांधवांना आर्थिक मदत केली जाणार आहे.” आई महाकालीच्या चरणी सर्वांच्या सुख-समृद्धीसाठी आणि शेतकरी बांधवांच्या भरभराटीसाठी प्रार्थना करत त्यांनी सर्व नागरिकांचे आभार मानले.

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment