चंद्रपूर – माता महाकाली महोत्सव २०२६ ची सुरुवात घटस्थापनेनिमित्त ५१ फूट उंच ध्वजाच्या विधिवत ध्वजारोहणाने झाली. रविवारी, ११ ऑक्टोबर रोजी श्री माता महाकाली मंदिरात हा सोहळा पार पडला. श्री माता महाकाली महोत्सव ट्रस्टने हा महोत्सव आयोजित केला आहे. यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी चांदीच्या मूर्तीचे दर्शन घेतले. त्यानंतर मातेची पालखी निघाली. राज्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे यंदा मनोरंजनाचे कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. मात्र धार्मिक परंपरा आणि सामाजिक उपक्रम पूर्वीप्रमाणेच सुरू राहणार आहेत. (चंद्रपूर अग्नीवर भरतीत ८ हजार तरुणांचा सहभाग, वाचा बातमी)
यावेळी मनीष महाराज, सुनिल महाकाले, राजु शास्त्रकार, अजय जयस्वाल, श्याम धोपटे, मिलिंद गंपावार, बलराम डोडाणी, प्रसाद जोरगेवार, संजू बुरघाटे, अरुण तिखे, सविता दंढारे, वंदना हातगावकर यांच्यासह श्री महाकाली माता महोत्सव ट्रसचे पदाधिकारी भक्तांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन यंदा महोत्सवातील मनोरंजनाचे कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या कार्यक्रमांसाठी होणारा खर्च वाचवून दुष्काळग्रस्त शेतकर्यांना मदत करण्याचा मानस आहे. मात्र, महोत्सवातील धार्मिक परंपरा आणि सामाजिक उपक्रम पूर्वीप्रमाणेच सुरू राहणार आहेत. श्रद्धा, सेवा आणि सामाजिक बांधिलकी यांचा समतोल साधत महोत्सवाची परंपरा जपण्यावर भर देण्यात आला आहे.
चांदीच्या मूर्तीची पालखी, कुमरवार परिवाराला पहिला मान
याबाबत आमदार किशोर जोरगेवार म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आवाहणा नंतर “महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थितीत शेतकरी बांधवांच्या वेदना आणि अडचणी लक्षात घेणे ही आपली सामाजिक जबाबदारी आहे. त्यामुळे मनोरंजनाचे कार्यक्रम रद्द करून त्या खर्चातून दुष्काळग्रस्त शेतकर्यांना मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, माता महाकाली महोत्सवाची धार्मिक परंपरा आणि समाजोपयोगी उपक्रम सुरूच राहतील. मातेच्या आशीर्वादाने भक्ती, सेवा आणि सामाजिक बांधिलकीची ही परंपरा पुढे नेण्याचा आमचा प्रयत्न आहे.
ध्वजारोहणानंतर चांदीच्या माता महाकाली मूर्तीची विधिवत पूजा करण्यात आली. त्यानंतर मूर्तीची पालखीतून रथापर्यंत मिरवणूक काढण्यात आली. भजन-कीर्तनाच्या गजरात आणि वाजतगाजत हा रथ नितीन कुमरवार यांच्या निवासस्थानी नेण्यात आला. यंदा माता महाकालीची चांदीची मूर्ती घरी नेऊन भाविकांना दर्शनाची संधी उपलब्ध करून देण्याचा पहिला मान कुमरवार परिवाराला मिळाला.
नवरात्रोत्सवाच्या काळात माता महाकालीच्या चांदीच्या मूर्तीचे घरोघरी दर्शन घडविण्याची परंपरा आहे. त्यानुसार कुमरवार परिवाराच्या निवासस्थानी मूर्ती विराजमान करण्यात आली आहे.
माता महाकाली महोत्सव २०२६ ला ध्वजारोहणाने सुरुवात
सोमवारी, १२ ऑक्टोबर रोजी नितीन कुमरवार यांच्या निवासस्थानावरून माता महाकालीची मूर्ती वाजत गाजत रामजीवन परमार यांच्या निवासस्थानी नेण्यात येणार आहे. घटस्थापनेच्या दिवशी ५१ फूट उंच ध्वजाचे ध्वजारोहण करून महोत्सवाच्या धार्मिक सोहळ्यांना सुरुवात झाली. दुष्काळग्रस्त शेतकर्यांप्रती सामाजिक बांधिलकी जपत मनोरंजनाचे कार्यक्रम रद्द करण्यात आले असले, तरी धार्मिक परंपरा आणि समाजोपयोगी उपक्रमांच्या माध्यमातून माता महाकाली महोत्सवाची वाटचाल सुरू राहणार आहे.
रद्द झालेले कार्यक्रम…
१४ ऑक्टोबरपासून नियोजित असलेल्या पाच दिवसीय महोत्सवात सुप्रसिद्ध भक्तिसंगित गायक गजेंद्र प्रताप सिंह, हेमंत ब्रिजवासी, चौतन्य देवढे आणि प्रसिद्ध गायिका जयपिंदर नरुला यांच्या भक्तिमय गायन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, राज्यातील दुष्काळी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन हे सर्व कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.
आयोजित कार्यक्रम…
महोत्सवातील धार्मिक परंपरा आणि सामाजिक उपक्रम मात्र पूर्वनियोजित स्वरूपात सुरू राहणार आहेत. यामध्ये ९९९९ कन्यांचे पूजन व भोजन, सौभाग्यवती महिलांना अखंड सौभाग्याची कामना करत हिरवा चुडा भरून देण्याचा उपक्रम तसेच नवरात्रीदरम्यान जन्मलेल्या कन्यांना चांदीचे नाणे वाटप करण्यात येणार आहे. १९ ऑक्टोबर रोजी नगरप्रदक्षिणाही काढण्यात येणार आहे.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






