चिमूर: शेतीच्या वादातून मारहाण झाल्याची घटना चिमूर तालुक्यातील खुटाळा येथे घडली आहे. शनिवारी, १० ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी एका शेतकरी दांपत्याला घरात घुसून मारहाण करण्यात आली. याप्रकरणी भाष्कर निकोडे (वय ५०) यांनी चिमूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून पोलिसांनी एकाच कुटुंबातील पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आरोपींमध्ये वैभव, गजानन, रामा, चंद्रशेखर आणि प्रेमीला बारसागडे यांचा समावेश आहे. भारतीय न्याय संहिता २०२३ च्या विविध कलमांन्वये पुढील तपास सुरू आहे. (१८ वर्षीय तरुणाला एमडी सह अटक, वाचा हि बातमी)
शेतीच्या वादातून मारहाण : खुटाळा येथील घटनाक्रम
मिळालेल्या माहितीनुसार, खुटाळा येथील रहिवासी भाष्कर झींगरु निकोडे (वय ५० वर्षे) हे आपल्या शेतालगत भाड्याने शेती करणाऱ्या वैभव बारसागडे आणि गजानन बारसागडे यांना गेल्या दोन वर्षांपासून ओळखतात. मागील दोन वर्षांपासून त्यांच्यात शेतीच्या कारणावरून किरकोळ वाद सुरू होते. शनिवार, १० ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास तक्रारदार भाष्कर निकोडे हे आपल्या शेतात हजर असताना वैभव बारसागडे तेथे आला. निकोडे यांनी त्याला ‘माझ्या शेतात का आलास’ असे विचारून शेताबाहेर जाण्यास सांगितले. या कारणावरून संतापलेला वैभव रागाच्या भरात तेथून निघून गेला.
घरात घुसून दांपत्याला मारहाण, पत्नीशीही झटापट
त्यानंतर त्याच दिवशी सायंकाळी ७:३० वाजताच्या सुमारास भाष्कर निकोडे हे आपल्या घरी पहिल्या खोलीत जेवण करत असताना, संतापलेला वैभव बारसागडे, गजानन बारसागडे, रामा वासुदेव बारसागडे, चंद्रशेखर गजानन बारसागडे आणि प्रेमीला गजानन बारसागडे हे सर्व जण बेकायदेशीरपणे त्यांच्या घरात घुसले. ‘तू वैभवला शेतातून बाहेर का काढले’ असा जाब विचारत सर्व आरोपींनी त्यांना खाली पाडून लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. दरम्यान, भाष्कर यांची पत्नी वनिता निकोडे या पतीला वाचवण्यासाठी आणि वाद सोडवण्यासाठी मध्यस्थी करायला आल्या असता आरोपींनी त्यांच्याशीही झटापट करत धक्काबुक्की केली, ज्यामध्ये त्यांच्या अंगावरील कपडे फाटले.
या अचानक झालेल्या प्राणघातक हल्ल्यामुळे आणि गंभीर प्रकारामुळे निकोडे कुटुंब प्रचंड भीतीच्या सावटाखाली आले. घटनेनंतर पीडित भाष्कर निकोडे यांनी तात्काळ चिमूर पोलीस ठाणे गाठून आपबिती सांगत आरोपींविरुद्ध तोंडी रिपोर्ट नोंदवला. तक्रारीच्या आधारे चिमूर पोलिसांनी आरोपी वैभव बारसागडे, चंद्रशेखर बारसागडे, रामा बारसागडे, गजानन बारसागडे आणि प्रेमीला बारसागडे या पाच जणांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS), २०२३ च्या कलम ११५(२), १८९(२), ३३३, ३५१(२) आणि ३५२ अन्वये गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा पुढील सखोल तपास पोलीस ठाणे अंमलदारांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार प्रभाकर मंगम करत आहेत.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






