वरोरा डुक्कर चोरी प्रकरणात दुचाकी पळवल्याची तक्रार नोंदवणारे वरोरा पोलीस ठाणे

वरोरा येथे डुक्कर चोरीच्या वादातून तरुणाला मारहाण; दुचाकी पळवली

User avatar placeholder
Written by Prakash Hande

ऑक्टोबर 12, 2026

वरोरा (चंद्रपूर): वरोरा डुक्कर चोरी प्रकरणातून एका तरुणाला मारहाण झाल्याची घटना रविवारी (११ ऑक्टोबर) सकाळी घडली. जिजामाता वॉर्डातील सहारा पार्क परिसरात हा प्रकार घडला. डुक्कर चोरीच्या जुन्या वादातून हा प्रकार घडल्याचे तक्रारीत नमूद आहे. आरोपींनी राहुल नकवे (वय ३५) यांना जीवे मारण्याची धमकी दिली. त्यांच्या खिशातील चावी हिसकावून ५० हजार रुपये किमतीची दुचाकी पळवली, असा आरोप आहे. वरोरा पोलिसांनी अनिल लोणारे व भिमा दांडेकर यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा दाखल केला आहे. (शेतीच्या वादातून दाम्पत्याला घरात घुसून मारहाण, वाचा हि बातमी)

वरोरा डुक्कर चोरी वादातून सहारा पार्कमध्ये घटना

मिळालेल्या माहितीनुसार, वरोरा येथील जिजामाता वॉर्ड, एकाअर्जुना रोड परिसरातील रहिवासी राहुल राजन नकवे (वय ३५) हे सफाई कामगार म्हणून काम करतात. त्यांचा स्वतःचा गावठी डुकरांचा शेड असून त्यांच्याकडे सुमारे ४० डुकरे आहेत. यात्रावॉर्ड येथील रहिवासी अनिल नेलाजी लोणारे आणि टेंमुर्डा येथील रहिवासी भिमा दांडेकर हे दोघे नेहमी राहुल यांच्या शेडजवळ येऊन डुक्कर चोरी करण्याचा प्रयत्न करत असल्याने त्यांच्यात आधीपासूनच वाद सुरू होता.

दरम्यान, रविवारी सकाळी ८:५० वाजताच्या सुमारास राहुल यांचे मित्र आदित्य शरद पाचभाई यांनी फोन करून दोन व्यक्ती तुमचे डुक्कर पकडून घेऊन जात असल्याची माहिती दिली. ही माहिती मिळताच राहुल नकवे हे त्यांच्याकडे असलेली एमएच २७ सीएस ७६९७ क्रमांकाची दुचाकी घेऊन तातडीने सहारा पार्क परिसरात पोहोचले. तेथे अनिल लोणारे व भिमा दांडेकर हे दोघे डुक्कर घेऊन जात असल्याचे त्यांना दिसले. राहुल यांनी त्यांना अडवून “माझे डुक्कर पकडून कुठे घेऊन चालले,” अशी विचारणा केली. यावर संतप्त झालेल्या अनिल लोणारे याने राहुल यांची कॉलर धरून त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली.

राहुल यांनी डुक्कर नेण्यास विरोध केला असता, आरोपींनी डुक्कर तेथेच सोडून राहुल यांना पकडून मारहाण केली. एवढ्यावरच न थांबता आरोपींनी राहुल यांच्या खिशातील दुचाकीची चाबी जबरदस्तीने हिसकावून घेतली आणि “तू जास्त काही करशील तर तुला याच ठिकाणी मारून टाकू, तुला काय करायचे ते कर” अशी धमकी देत अंदाजे ५० हजार रुपये किमतीची दुचाकी घेऊन घटनास्थळावरून पळ काढला.

या घटनेनंतर घाबरलेल्या राहुल यांनी कसाबसा स्वतःचा बचाव केला. काही वेळातच घटनास्थळी त्यांचे मोठे भाऊ व मित्र पोहोचले. घडलेला सर्व प्रकार त्यांना सांगून राहुल नकवे यांनी वरोरा पोलीस ठाणे गाठून आपबिती कथन केली आणि तक्रार नोंदवली. राहुल नकवे यांच्या तक्रारीवरून वरोरा पोलिसांनी आरोपी अनिल नेलाजी लोणारे व भिमा दांडेकर यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS), २०२३ च्या कलम ३०९(४), ३५१(३) आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शरद श्यामजी भस्मे करत आहेत.

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

1 thought on “वरोरा येथे डुक्कर चोरीच्या वादातून तरुणाला मारहाण; दुचाकी पळवली”

Leave a Comment