राजुरा (चंद्रपूर): आंतरराज्यीय मालवाहतूक करणाऱ्या दोन ट्रकला लक्ष्य करून अज्ञात चोरट्यांनी तब्बल १७ टायर आणि त्यांच्या लोखंडी डिस्क चोरून नेल्याची खळबळजनक घटना राजुरा येथील लॉयड्स मेटल रेल्वे साईटिंग परिसरात घडली. राजुरा ट्रक टायर चोरी प्रकरणात दोन ट्रकचे १७ टायर आणि लोखंडी डिस्क चोरीला गेल्याची घटना समोर आली आहे. लॉयड्स मेटलच्या रेल्वे साईटिंग परिसरात हा प्रकार घडला. तक्रारीनुसार या साहित्याची किंमत सुमारे अडीच लाख रुपये आहे. दोन्ही चालकांचे मोबाईल बंद असल्याने कंपनीने त्यांच्यावर संशय व्यक्त केला आहे. राजुरा पोलिसांनी पुष्पेंद्र कुसवाहा व दिपक कुसवाहा यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा दाखल केला आहे. (डुक्कर चोरीच्या प्रकरणात मारहाण, वाचा बातमी)
राजुरा ट्रक टायर चोरी: रेल्वे साईटिंगवर काय घडले?
मिळालेल्या माहितीनुसार, छत्तीसगडमधील रायपूर येथील रींग रोड नं. २, श्रेया कॉम्प्लेक्सजवळ राहणारे राकेशकुमार देवीलाल रांगडाले (वय ४७) हे मागील १२ वर्षांपासून ‘SVA ट्रान्सपोर्टिंग’ कंपनीत सुपरवायझर म्हणून नोकरी करतात. त्यांच्या ट्रान्सपोर्ट कंपनीकडे एकूण १९ गाड्या असून, त्यापैकी १० गाड्या चंद्रपूर-रायपूर या मार्गावर धावतात. घटनेच्या दिवशी, दिनांक ८ ऑक्टोबर २०२६ रोजी कंपनीच्या दोन गाड्या (क्रमांक CG 22 AK 7982 आणि CG 22 AK 9200) कोळसा भरून रायपूर येथून निघाल्या आणि राजुरा तालुक्यातील पांढरपौनी येथील भाटीया कोल वासरी येथे कोळसा खाली करून लॉयड्स मेटलच्या राजुरा रेल्वे साईटिंगवर माल भरण्यासाठी रवाना झाल्या होत्या. या दोन्ही ट्रॅकवर अनुक्रमे पुष्पेंद्र कुसवाहा (वय २४, रा. सीधी, मध्य प्रदेश) आणि दिपक कुसवाहा हे चालक म्हणून कार्यरत होते.
चालकांचे मोबाईल बंद, GPS वरून ट्रक सापडले
दरम्यान, ९ ऑक्टोबर रोजी रात्री ११ वाजल्यापासून दोन्ही चालकांचे मोबाईल फोन बंद येऊ लागले. याच सुमारास लॉयड्स मेटल रेल्वे साईटिंगचे सुरक्षा सुपरवायझर इम्रान पठान यांनी राकेशकुमार यांच्याशी संपर्क साधून तुमच्या गाड्या माल भरण्यासाठी अद्याप हजर झाल्या नसल्याची माहिती दिली. यावर सुपरवायझर राकेशकुमार यांनी जीपीएस (GPS) द्वारे दोन्ही गाड्यांचा मागोवा घेतला असता, त्या लॉयड्स मेटलच्या कार्यालयाच्या साईटवर उभ्या असल्याचे दिसून आले. त्यानंतर कंपनीच्या सांगण्यावरून सुरक्षारक्षकाने घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता, दोन्ही ट्रॅकचे चालक जागेवर नव्हते आणि दोन्ही गाड्यांचे डिस्कसह एकूण १७ टायर गायब असल्याचे उघडकीस आले.
या प्रकारची माहिती मिळताच सुपरवायझर राकेशकुमार रांगडाले यांनी कंपनीचे मालक विनीतकुमार जैन यांच्याशी चर्चा करून १० ऑक्टोबर २०२६ रोजी थेट राजुरा रेल्वे साईटिंग गाठली. तिथे प्रत्यक्ष पाहणी केली असता, ट्रक क्रमांक CG 22 AK 9200 चे डिस्कहॅाट ८ टायर आणि ट्रक क्रमांक CG 22 AK 7982 चे डिस्कहॅाट ९ टायर असे एकूण २ लाख ५० हजार रुपये मूल्याचे १७ टायर व डिस्क चोरीस गेल्याचे स्पष्ट झाले. दोन्ही चालकांचे मोबाईल नंबर अद्यापही बंद येत असल्याने त्यांनीच संगनमत करून हा माल चोरल्याचा संशय व्यक्त करण्यात आला.
या प्रकरणी तक्रारदार राकेशकुमार रांगडाले यांनी मालक विनीतकुमार जैन यांच्यासह राजुरा पोलीस ठाण्यात येऊन तोंडी फिर्याद दिली. मिळालेल्या तोंडी तक्रारीवरून राजुरा पोलिसांनी ट्रक चालक पुष्पेंद्र कुसवाहा आणि दिपक कुसवाहा यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या (BNS) २०२३ मधील कलम ३०३(२) आणि ३(५) अन्वय गुन्हा नोंदवला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मण सुभाष लोकरे करीत आहेत.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now







1 thought on “राजुरा येथे दोन ट्रकचे १७ टायर व डिस्क चोरीला”