Sindewahi Burglary Crime News Sai Nagar house theft investigation

सिंदेवाही शहरात भरदिवसा बंद घर फोडले; कपाटातील दागिन्यांसह अडीच लाखांचा मुद्देमाल लंपास!

User avatar placeholder
Written by Prakash Hande

September 10, 2026

सिंदेवाही (चंद्रपूर): Sindewahi Burglary Crime News मुळे सिंदेवाही शहर आणि लगतच्या परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. शहरातील गजबजलेल्या साई नगर भागात अज्ञात चोरट्यांनी भरदिवसा बंद घराचे कुलूप तोडले.

चोरट्यांनी घरात प्रवेश करून लोखंडी आणि लाकडी कपाटांचे लॉकर फोडले. १ लाख ३० हजारांची रोख आणि सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह एकूण २ लाख ४५ हजारांचा ऐवज लंपास केला. या प्रकरणी सिंदेवाही पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. (हे हि वाचा – आदिवासी बांधवांची ८२ लाखाने लूट)

Sindewahi Burglary Crime News : साई नगरात भरदिवसा घडलेला थरार

शहरातील साई नगर परिसरात भरदिवसा घरफोडीची थरारक घटना समोर आली असून, अज्ञात चोरट्यांनी बंद घराचा मुख्य दरवाजा उचकटून आत प्रवेश करत १ लाख ३० हजार रुपयांची रोकड आणि सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह एकूण २ लाख ४५ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे. या घटनेमुळे सिंदेवाही शहरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

कुटुंब बाहेरगावी गेल्याची संधी साधून घराचे कुलूप उचकटले

साई नगर येथील रहिवासी आणि गुरुकृपा डेली नीड्सचे संचालक भगवान कवडु मंडलवार हे ८ सप्टेंबर रोजी सकाळी सात वाजताच्या सुमारास कामानिमित्त गुरुकुंज मोझरी येथे गेले होते. त्यांची पत्नी कामानिमित्त बोथली येथे तर आई कांताबाई घरात होत्या. दुपारी एक वाजता आईने घराला कुलूप लावून भावाकडे मालपिरंजी येथे जात असल्याचे भगवान यांना फोनवरून सांगितले. संपूर्ण कुटुंब बाहेर असल्याने घर बंद असल्याची संधी साधत अज्ञात चोरट्यांनी मध्यंतरीच्या काळात घराला लक्ष्य केले.

शेजाऱ्यांच्या सतर्कतेमुळे चोरीचा प्रकार आला उघडकीस

दुसऱ्या दिवशी, ९ सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजता शेजारी राहणाऱ्या महिलेला मंडलवार यांच्या घराचा मुख्य दरवाजा उघडा असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी तात्काळ फोन करून विचारणा केल्यावर मंडलवार यांनी आपल्या पुतण्याला तातडीने घरी पाठवले. पुतण्या महेश याने घरी जाऊन पाहिले असता, घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप कोणत्यातरी धारदार अवजाराने उचकटल्याचे दिसले. तसेच घरातील दोन्ही बेडरूममधील लाकडी व लोखंडी कपाटांचे लॉक तोडून आतील सामान अस्ताव्यस्त फेकलेले होते, तर स्वयंपाकघरातील डबेही उघडून तपासण्यात आले होते.

दुपारी बाराच्या सुमारास गृहमालक भगवान मंडलवार यांनी घरी पोहोचून पाहणी केली असता, बेडरूममधील लोखंडी कपाटाच्या लॉकरमध्ये ठेवलेले प्रत्येकी १ ग्रॅम वजनाचे तीन सोन्याचे मंगळसूत्र, ५ ग्रॅम व ३ ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या अंगठ्या, १ ग्रॅम वजनाची बारी, १ ग्रॅमची जिवती, ३ ग्रॅमचे लॉकेट, ४ ग्रॅमची बिरी, १० तोळे वजनाची चांदीची पायपट्टी आणि ९० हजार रुपयांची रोख रक्कम गायब असल्याचे आढळून आले. याशिवाय दुसऱ्या लाकडी कपाटात ठेवलेली ४० हजार रुपयांची रोकडही चोरट्यांनी लंपास केली होती. चोरट्यांनी १ लाख १५ हजार रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने आणि १ लाख ३० हजार रुपयांची रोख असा मिळून एकूण २ लाख ४५ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला.

घटनेची माहिती मिळताच सिंदेवाही पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, ठाणे प्रभारी अधिकारी कांचन पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ च्या कलम ३०५, ३३१(३) आणि ३३१(४) अन्वये अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. या धाडसी घरफोडीचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सतीश मेश्राम करत असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने पोलीस अज्ञात आरोपींचा कसून शोध घेत आहेत. भरवस्तीत दिवसाढवळ्या झालेल्या या चोरीमुळे स्थानिक व्यापाऱ्यांसह नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात असून गस्त वाढवण्याची मागणी होत आहे.

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment