वरोरा: Warora House Theft News वरोरा शहरातील नंदनवन लेआउट, टिळक वार्ड येथे भरदिवसा बंद घराचे कुलूप तोडून चोरी झाल्याची घटना घडली आहे. अज्ञात चोरट्यांनी घरातील सोन्या-चांदीचे दागिने आणि रोकड असा एकूण ४३ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला.
घरमालक आपल्या मुलीच्या कार्यक्रमासाठी परगावी गेले असताना ही घटना घडली. परत आल्यानंतर कपाटातील साहित्य विस्कटलेले दिसले. या प्रकरणी वरोरा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. (हे हि वाचा – चंद्रपूर जिल्ह्यातील १० सराईत गुन्हेगार हद्दपार)
Warora House Theft News : नंदनवन लेआउट परिसरात भरदिवसा घरफोडी
घरगुती कार्यक्रमासाठी कुटुंब परगावी गेल्याची संधी साधत अज्ञात चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून घरातून सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह रोख रकमेवर डल्ला मारल्याची घटना वरोरा शहरातील नंदनवन लेआउट, टिळक वार्ड येथे उघडकीस आली आहे. या चोरीच्या घटनेत चोरट्यांनी कपाटातील सुमारे ४३ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला असून, या प्रकरणी वरोरा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कार्यक्रमासाठी पंम्पनवार दांपत्य गेले होते वणीला
नंदनवन लेआउट येथील रहिवासी अनिल पांडुरंग पंम्पनवार (वय ५९) हे आपली पत्नी कल्पना यांच्यासह राहतात. त्यांची मुलगी प्रणाली गौरव कुरेवार (रा. वणी, जि. यवतमाळ) हिच्या घरी कौटुंबिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यामुळे पंम्पनवार दांपत्य २५ ऑगस्ट रोजी दुपारी तीन वाजता घराला व्यवस्थित कुलूप लावून वणी येथे कार्यक्रमासाठी गेले होते. दरम्यान, २७ ऑगस्ट रोजी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास ते वणीवरून आपल्या घरी परत आले असता त्यांना मुख्य दरवाजाचे कुलूप तुटून खाली पडलेले दिसले. घरात प्रवेश करून पाहिले असता सर्व सामान अस्ताव्यस्त फेकलेले आढळले.
चोरी झाल्याचा संशय आल्याने त्यांनी घरातील लाकडी कपाटाची तपासणी केली असता, कपाटात ठेवलेली २० हजार रुपये किमतीची २ ग्रॅम वजनाची सोन्याची नथ, १० हजार रुपये किमतीची १० ग्रॅम वजनाची चांदीची चाळ, ५ हजार रुपयांचे ५ ग्रॅम वजनाचे चांदीचे ताट-वाटी व प्याला असा एकूण ३५ हजार रुपयांचा सोन्या-चांदीचा ऐवज गायब होता. याव्यतिरिक्त कपाटात ठेवलेल्या पैशाच्या गाडग्यातील अंदाजे ३ हजार रुपये आणि इतर रोख ५ हजार रुपये, अशी एकूण ८ हजार रुपयांची रोकडही चोरट्यांनी पळवून नेली.
सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम मिळून एकूण ४३ हजार रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्याने २५ ऑगस्टच्या दुपार ते २७ ऑगस्टच्या सकाळदरम्यान दरवाजाचे कुलूप तोडून चोरून नेल्याचे स्पष्ट झाले. यानंतर अनिल पंम्पनवार यांनी तत्काळ वरोरा पोलीस ठाणे गाठून घडल्या प्रकाराबाबत तक्रार दाखल केली.
पंम्पनवार यांच्या तक्रारीवरून वरोरा पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ मधील कलम ३०५(a), ३३१(३) आणि ३३१(४) अन्वये घरफोडी व चोरीचा गुन्हा नोंदवला आहे. ठाणे प्रभारी पोलीस निरीक्षक ओमप्रकाश शामराव सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मनीष जगन्नाथ तालेवार हे या गुन्ह्याचा पुढील तपास करत असून, पोलीस परिसरातील संशयितांचा आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरांचा शोध घेत आहेत.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






