चुनाळा घरफोडी प्रकरणी तोडलेल्या कुलूपाचे प्रतीकात्मक छायाचित्र

उपचारासाठी नागपूरला गेले; इकडे कुऱ्हाडीने कुलूप तोडले

User avatar placeholder
Written by Prakash Hande

ऑक्टोबर 27, 2026

राजुरा – चुनाळा घरफोडी प्रकरणी राजुरा पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी रोख रक्कम आणि चांदीचे दागिने लंपास केले. फिर्यादीच्या तक्रारीनुसार, एकूण १७ हजार २०० रुपयांचा ऐवज चोरीस गेला. त्यात १० हजार रुपये रोख आणि ७ हजार २०० रुपयांचे चांदीचे दागिने आहेत. हे कुटुंब नागपूर येथे उपचारासाठी गेले होते. घटना २५ ते २६ ऑक्टोबरच्या रात्री घडल्याचे पोलिसांनी सांगितले. बीएनएस २०२३ अंतर्गत गुन्हा नोंदला आहे. (युवासेना जिल्हाप्रमुखावर गुन्हा दाखल, वाचा बातमी)

चंद्रपूर जिल्ह्याच्या राजुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चुनाळा वॉर्ड क्रमांक २ येथे एका बंद घराचे कुलूप कुऱ्हाडीने व हत्याराने तोडून अज्ञात चोरांनी घरात प्रवेश केला आणि घरातील लाकडी अलमारीमधील रोख रकमेसह सुमारे १७ हजार २०० रुपयांचे चांदीचे दागिने लांबवल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी राजुरा पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या (बीएनएस) विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला असून परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

चुनाळा घरफोडी: नेमके काय घडले?

पोलिसांनी दिलेल्या व फिर्यादीनुसार मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, फिर्यादी सुरेश हरिचंद्र वांढरे (वय ६३, रा. चुनाळा वॉर्ड नं. २, राजुरा) हे वेकोलिमधून (W.C.L.) सेवानिवृत्त झालेले असून पत्नीसह राहतात. गत ५ ऑक्टोबर २०२६ रोजी त्यांचे व त्यांच्या पत्नीचे दोन्ही डोळ्यांचे ऑपरेशन होणार असल्यामुळे ते नागपूर येथील मुलीच्या घरी उपचारासाठी गेले होते. घर बंद असल्याने त्यांनी घराची देखरेख करण्यासाठी त्यांचे लहान भाऊ दीपक हरिचंद्र वांढरे यांना सांगितले होते आणि घराला कुलूप लावून नागपूरला मुक्कामासाठी गेले होते.

शेजाऱ्याच्या फोननंतर चोरी उघडकीस

दरम्यान, घटना घडली तेव्हा दिनांक २५ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री ११ वाजता ते दिनांक २६ ऑक्टोबर २०२६ रोजी पहाटे ०५:०० वाजण्याच्या दरम्यान ही चोरीची घटना घडली. त्यानंतर सोमवारी दिनांक २६ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ६:२० वाजण्याच्या सुमारास फिर्यादीच्या घराशेजारी राहणारे आशिष भोंगळे यांनी सुरेश वांढरे यांना फोन करून त्यांच्या घराच्या कंपाऊंडचे व मुख्य दरवाजाचे गेट उघडे दिसत असल्याचे कळवले. तुम्ही घरी परत आला आहात का, अशी विचारणा त्यांनी केली असता फिर्यादीने आपण नागपूरलाच असल्याचे सांगितले. घरात कोणी नसताना मुख्य गेट उघडे दिसल्याने चोरी झाल्याचा संशय आल्यामुळे फिर्यादीने आपले भाऊ दीपक वांढरे यांना तात्काळ घरी पाठवले.

दीपक वांढरे यांनी घरी जाऊन पाहणी केली असता, अज्ञात चोरांनी घराच्या व वॉलकंपाऊंडच्या गेटचे कुलूप तोडून आत प्रवेश केल्याचे व चोरी झाल्याचे सांगितले. यानंतर फिर्यादी व त्यांची पत्नी नागपूरहून तातडीने राजुरा येथील आपल्या घरी परतले. त्यांनी घरात जाऊन तपासणी केली असता बेडरुममधील शोकेसच्या लाकडी अलमारीमधील कपडे अस्ताव्यस्त पडलेले दिसून आले. अलमारीच्या लॉकरमध्ये ठेवलेली ५०० रुपयांच्या नोटांची २० पत्रे असलेली एकूण १० हजार रुपयांची रोकड आणि चांदीचे जुने दागिने चोरट्यांनी लांबवले होते.

कोणता ऐवज चोरीस गेला?

चोरीस गेलेल्या मालमत्तेमध्ये तीन नग जुने चांदीचे करडे (वजन ५० ग्रॅम, किंमत १५०० रुपये), तीन नग जुने चांदीचे सिक्के (वजन ४० ग्रॅम, किंमत १२०० रुपये), दोन नग जुने चांदीचे चमचे (वजन १० ग्रॅम, ३०० रुपये), एक नग जुनी चांदीची प्लेट (वजन २० ग्रॅम, ६०० रुपये), एक नग जुना चांदीचा पेल्ला (वजन २० ग्रॅम, ६०० रुपये), चार नग जुने चांदीचे पायातील जोडवे (वजन ४० ग्रॅम, १२०० रुपये), एक जोड जुनी चांदीची चाळ (वजन ४० ग्रॅम, १२०० रुपये) आणि दोन नग जुने चांदीचे दिवे (वजन २० ग्रॅम, ६०० रुपये) अशा प्रकारे एकूण १७ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी पळवून नेल्याοचे निष्पन्न झाले.

या प्रकरणी सुरेश हरिचंद्र वांढरे यांनी राजुरा पोलीस ठाण्यात येऊन दिलेल्या तोंडी तक्रारीवरून अज्ञात आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस) २०२३ च्या कलम ३०५ आणि ३३१(४) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या गंभीर प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मण सुभाष लोकरे हे करीत असून, पोलीस चोरट्यांचा कसून शोध घेत आहेत.

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment