गडचांदुर – गडचांदुर जुगार अड्ड्यावर पोलिसांनी धाड टाकली आहे. गडचांदुर ते कोरपना मार्गावरील एका बारच्या इमारतीत हा प्रकार सुरू होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जुगार खेळताना तिघे जागीच सापडले. दोघे मागच्या दरवाजाने पळून गेले. पोलिसांनी ६७ हजार ८५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. आरोपींविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम, १८८७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (सासऱ्याला जिवंत जाळण्याचा प्रयत्न, जावयाला अटक, वाचा हि बातमी)
गडचांदुर जुगार अड्डा: बारच्या वरच्या मजल्यावर काय आढळले?
चंद्रपूर जिल्ह्याच्या गडचांदुर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका बारच्या इमारतीत सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी धाड टाकली आहे. उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या पथकाने केलेल्या या धडक कारवाईत पैशांची बाजी लावून जुगार खेळणाऱ्या तिघांना रंगेहात पकडण्यात आले असून, त्यांच्याकडून नगदी आणि मोबाईलसह सुमारे ६७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
प्राप्त माहितीनुसार, २६ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७ वाजेदरम्यान गडचांदुर ते कोरपना मार्गावर असलेल्या जे पॅलेस बारच्या वरच्या मजल्यावरील हॉलमध्ये काही इसम एकत्र जमून ५२ तास पत्त्यांवर कट पत्त्याचा पैशाची बाजी लावून हारजितचा जुगार खेळत असल्याची गुप्त माहिती गडचांदुर पोलिसांना मिळाली होती. या मिळालेल्या खबरीची खात्री करून उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांची लेखी परवानगी व पोलीस निरीक्षकांच्या आदेशानुसार पोलिसांनी सापळा रचला. यानंतर पंचांसमक्ष जे पॅलेस बारच्या दुसऱ्या मजल्यावर लपतछपत जाऊन पाहणी केली असता, काही व्यक्ती वर्तुळाकार बसून जुगार खेळताना निदर्शनास आल्या. पोलिसांना पाहताच पंचांसमक्ष छापा टाकला असता, तीन जण जागीच पकडले गेले, तर इतर दोन खेळणारे इसम मात्र हॉलच्या मागच्या दरवाज्याने भिंतीवरून उडी मारून पळून जाण्यात यशस्वी झाले.
तिघे ताब्यात, ६७ हजारांचा मुद्देमाल जप्त
घटनास्थळी पकडलेल्या इसमांकडे विचारपूस केली असता त्यांनी आपली नावे गणपत निळकंठ कोल्हे (वय ५०, रा. म्हाडा कॉलनी, नांदा, ता. कोरपना), अमोल तुकाराम राठोड (वय ३२, रा. डब्ल्यूसीएल क्वार्टर, चंद्रपूर) आणि अंकुश वासुदेव डंभारे (वय ४२, रा. पाठाळा, ता. भद्रावती) अशी सांगितली. पोलिसांनी पंचांसमक्ष घेतलेल्या अंगझडतीत व घटनास्थळाची पाहणी केली असता, आरोपींकडून रोख रक्कम, विविध कंपन्यांचे अँड्रॉइड मोबाईल फोन आणि ५२ तास पत्ते असा एकूण ६७ हजार ८५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल संतोष साहेबराव नागुलवाड यांच्या तक्रारीवरून गडचांदुर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम, १८८७ च्या कलमान्वये आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार दिवाकर दिपचंद पवार करीत असून, या धडक कारवाईमुळे अवैध जुगार खेळणाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now







2 thoughts on “बारच्या इमारतीमध्ये जुगार, पोलिसांची चाहूल लागताच जुगारी पळाले”