वरोरा: Warora Crime News अंतर्गत पोलिसांनी अवैध धंद्यांवर मोठी कारवाई केली आहे. शेंबळ येथील सार्वजनिक रस्त्यावर चालणाऱ्या जुगारावर धाड टाकण्यात आली. सहायक पोलीस निरीक्षकांच्या पथकाने रात्रीच्या वेळी ही धडक कारवाई केली. पंचांसमक्ष टाकलेल्या या छाप्यात चार जुगाऱ्यांना रंगेहात पकडण्यात आले. (हे हि वाचा – सेवानिवृत्त शिक्षकच्या घरी चोरी)
घटनास्थळावरून १७ हजार ५०० रुपयांची रोकड आणि साहित्य जप्त केले आहे. वरोरा पोलिसांनी महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.
Warora Crime News : शेंबळ सार्वजनिक रस्त्यावर पोलिसांची मोठी कारवाई
शेंबळ येथील सार्वजनिक रस्त्यावर ५२ पत्त्यांवर पैशांची बाजी लावून चालणाऱ्या कट-पत्ता जुगारावर वरोरा पोलिसांनी रविवारी रात्री अचानक धाड टाकून मोठी कारवाई केली. या कारवाईदरम्यान पोलिसांनी जुगार खेळणाऱ्या चार जणांना रंगेहात पकडून त्यांच्याकडून रोख रकमेसह एकूण १७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
वरोरा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक शरद श्याम भस्मे हे पथकासह परिसरात गस्त घालत असताना, शेंबळ वॉर्ड क्रमांक ३ मधील सार्वजनिक रस्त्यावर काही व्यक्ती पैशांची बाजी लावून कट-पत्ता जुगार खेळत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. माहितीच्या आधारे पोलिसांनी दोन पंचांना सोबत घेऊन घटनास्थळी सापळा रचला आणि अचानक छापा टाकला. पोलिसांची चाहूल लागताच काही जुगारी अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले, मात्र पथकाने सतर्कता दाखवत चार जणांना जागीच घेरून ताब्यात घेतले.
घटनास्थळाची पंचांसमक्ष तपासणी केली असता जुगाराच्या डावावरून ११ हजार ३०० रुपये रोख, ५२ ताश पत्ते आणि इतर साहित्य हस्तगत करण्यात आले. तसेच पकडण्यात आलेल्या आरोपींची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे ६ हजार १०० रुपये रोख आढळून आले. पोलिसांनी घटनास्थळावरून डावावरील आणि अंगझडतीतील मिळून एकूण १७ हजार ५०० रुपयांची रोकड व जुगाराचे साहित्य जप्त केले आहे.
या कारवाईत पोलिसांनी संदीप बाळकृष्ण काळे (वय ४०, रा. पोहा), अरुण बापुराव खारकर (वय ६१, रा. शेंबळ), संजय नानाजी निमकर (वय ५०, रा. शेंबळ) आणि राजेंद्र अरुण उपरे (वय ४३, रा. आष्टी, सर्व ता. वरोरा, जि. चंद्रपूर) यांना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी आरोपींविरुद्ध वरोरा पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्याच्या कलम १२(अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस शिपाई महेश गुलाब गावतुरे पुढील तपास करत आहेत. सार्वजनिक ठिकाणी चालणाऱ्या अशा अवैध धंद्यांविरुद्ध वरोरा पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारल्याने जुगार चालकांमध्ये खळबळ उडाली आहे.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






