माजरी (चंद्रपूर): Majri Gambling Raid News अंतर्गत माजरी पोलिसांनी कुचना गावात मध्यरात्री मोठी कारवाई केली आहे. पिंपळाच्या झाडाखाली सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी धाड टाकली. या कारवाईत पोलिसांनी चार जुगाऱ्यांना रंगेहात ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून रोख रकमेसह ८९ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. (हे हि वाचा – चंद्रपूर जिल्ह्यातील १० सराईत गुन्हेगार तडीपार)
Majri Gambling Raid News: कुचना येथील जुगार अड्ड्यावर पोलिसांची धडक कारवाई
भद्रावती तालुक्यातील माजरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या कुचना गावात बेकायदेशीररीत्या सुरू असलेल्या जुगारावर पोलिसांनी मध्यरात्री मोठी कारवाई केली आहे. २८ ऑगस्टच्या रात्री भारतीय ग्रामीण विद्यालयासमोर असलेल्या रामनगर वसाहतीतील पिंपळाच्या झाडाखाली सार्वजनिक ठिकाणी पथदिव्याच्या प्रकाशात ५२ पत्त्यांवर पैशांची बाजी लावून ‘कटपान’ जुगार खेळला जात असल्याची गुप्त माहिती माजरी पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तातडीने सापळा रचून कारवाई करत चार जुगाऱ्यांना रंगेहात पकडले असून त्यांच्याकडून एकूण ८९ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
मिळालेल्या गोपनीय माहितीनंतर माजरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुबोध वंजारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार हरिश्चंद्र देऊळकर यांच्यासह पोलीस अंमलदार प्रमोद मिलमिले, सुरज वासेकर, सोहन गुरनुले, हेमंत बोरकर आणि अशोक नायर यांच्या पथकाने रात्रीच्या सुमारास कुचना परिसराकडे धाव घेतली. गावातील दोन पंचांना सोबत घेऊन पोलिसांनी घटनास्थळी छापा टाकला असता, चार व्यक्ती गोलाकार बसून पैशांवर पत्त्यांचा जुगार खेळताना आढळून आल्या. पोलिसांनी कोणताही संशय न येऊ देता चौघांनाही जागीच ताब्यात घेतले.
रामनगर वसाहतीत पिंपळाच्या झाडाखाली सुरू होता ५२ पत्त्यांचा खेळ
पोलिसांनी केलेल्या चौकशीत पकडण्यात आलेल्या आरोपींची नावे अमित माणिकराव परचाके (वय ३४), स्वप्निल सुभाष पिदुरकर (वय ३०), अंकुश उर्फ शंकर हरिचंद्र महातळे (वय ३८) आणि भास्कर महादेव चोपणे (वय ४९, सर्व रा. कुचना, ता. भद्रावती, जि. चंद्रपूर) अशी निष्पन्न झाली.
पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी व आरोपींची अंगझडती घेतली असता जुगाराच्या डावावरून २,८०० रुपये रोख आणि जुगाराचे ५२ तासपत्ते हस्तगत करण्यात आले. तसेच आरोपींच्या अंगझडतीतून अमित परचाके याच्याकडून ३,५०० रुपये रोख व २५ हजार रुपये किमतीचा मोबाईल, स्वप्निल पिदुरकर याच्याकडून ८०० रुपये रोख, अंकुश महातळे याच्याकडून १ हजार रुपये रोख व ३० हजार रुपये किमतीचा मोबाईल, तर भास्कर चोपणे याच्याकडून १,५०० रुपये रोख व २५ हजार रुपये किमतीचा मोबाईल असा एकूण ८९ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.
या प्रकरणी पोलीस हवालदार हरिश्चंद्र देऊळकर यांच्या तक्रारीवरून माजरी पोलीस ठाण्यात चारही आरोपींविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा १८८७ च्या कलम १२(अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार धनराज पंचोडबारिया यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. पोलिसांच्या या मध्यरात्रीच्या धडक कारवाईमुळे अवैध धंदे करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






