Gadchandur Petrol Pump Theft accused arrested by police

महागात पडली आयफोनची हौस! आयफोनसाठी थेट पेट्रोल पंपावर दरोडा

User avatar placeholder
Written by Prakash Hande

August 29, 2026

गडचांदूर : Gadchandur Petrol Pump Theft प्रकरणात गडचांदूर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. राजीव गांधी चौकातील पेट्रोल पंपावरून १ लाख २ हजार रुपयांची रोकड चोरीला गेली होती. आरोपीने केवळ महागडा आयफोन खरेदी करण्यासाठी हा गुन्हा केला होता. पोलिसांनी तांत्रिक तपास करत नागपुरातून आरोपीला अटक केली आहे.

सध्याच्या तरुणाईमध्ये महागड्या स्मार्टफोनची आणि विशेषतः ‘आयफोन’ची जबरदस्त क्रेझ पाहायला मिळत आहे. मात्र, याच हव्यासापोटी एका तरुणाने थेट पेट्रोल पंपावर धाडसी चोरी केल्याची धक्कादायक घटना गडचांदूर शहरात उघडकीस आली आहे. पेट्रोल पंपावरील कर्मचारी गाढ झोपेत असताना तब्बल १ लाख २ हजार ३४० रुपयांची रोकड लंपास करणाऱ्या आरोपीला गडचांदूर पोलिसांनी नागपुरातून बेड्या ठोकल्या आहेत. दादाजी उर्फ नागेश सुनील मडावी (वय २०, रा. वॉर्ड क्र. ४, गडचांदूर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. (हे हि वाचा – चंद्रपूर जिल्ह्यातील १० गुन्हेगार तडीपार)

कर्मचारी झोपेत असताना साधला डाव

औद्योगिक नगरी असलेल्या गडचांदूर येथील राजीव गांधी चौकातील पेट्रोल पंपावर २३ ऑगस्टच्या रात्री नेहमीप्रमाणे कामकाज आटोपून तिन्ही कर्मचारी कॅबिनमध्ये झोपले होते. मध्यरात्री सुमारे ११:३० च्या सुमारास आरोपी नागेश मडावी याने उघड्या खिडकीतून अत्यंत शिताफीने आत प्रवेश केला. कर्मचारी गाढ झोपेत असल्याचा फायदा घेत त्याने ड्रॉवरमधील १,०२,३४० रुपयांची रोख रक्कम लंपास केली आणि पसार झाला.

सीसीटीव्ही आणि तांत्रिक तपासाने आवळल्या मुसक्या

२४ ऑगस्ट रोजी सकाळी चोरीचा प्रकार उघडकीस येताच पेट्रोल पंप व्यवस्थापनाने गडचांदूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. ठाणेदार शिवाजी कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तत्काळ घटनास्थळाचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. फुटेज आणि तांत्रिक माहितीच्या आधारे संशयित निष्पन्न झाल्यानंतर आरोपीचा माग काढण्यास सुरुवात झाली.

चोरीच्या पैशांतून २५ हजारांचा वापरता ‘आयफोन’ खरेदी

तपासादरम्यान आरोपी नागपूर जिल्ह्यातील कळमना येथे लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलीस पथकाने सापळा रचून २८ ऑगस्ट रोजी नागेश मडावी याला ताब्यात घेतले. खाकीचा धाक दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली. आयफोन वापरण्याच्या तीव्र इच्छेपायीच ही चोरी केल्याचे तपासात समोर आले. चोरीच्या रकमेतून त्याने २५ हजार रुपये किमतीचा वापरता (Second-hand) Apple iPhone 14 Plus खरेदी केला होता.

पोलिसांनी आरोपीकडून हा महागडा आयफोन जप्त केला असून उर्वरित रोख रक्कम हस्तगत करण्याचे काम सुरू आहे.

सदर यशस्वी कारवाई पोलीस निरीक्षक शिवाजी कदम यांच्या मार्गदर्शनात हवालदार शितल बोरकर, नाईक पोलीस शिपाई बलवंत शर्मा, पोलीस अंमलदार मनोहर जाधव व सूरज ढोले यांच्या पथकाने केली असून पुढील तपास गडचांदूर पोलीस करत आहेत.

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment