चंद्रपूर / शेगाव: Shegaon Crime News अंतर्गत शेगाव पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. टेमुर्डा येथे एका शाळकरी मुलीची छेड काढणाऱ्या नराधमाला पोलिसांनी अवघ्या २४ तासांत बेड्या ठोकल्या. ही घटना २९ ऑगस्ट रोजी सकाळी घडली होती. पीडित विद्यार्थिनी शाळेत पायी जात असताना आरोपीने तिला लिफ्ट दिली. पुढे गेल्यावर त्याने छेडछाड सुरू केली. मुलीने चालत्या गाडीवरून उडी मारून स्वतःचा बचाव केला. पोलिसांनी आरोपी गणेश कुमावत याला अटक केली आहे. (हे हि वाचा – आयफोनच्या नादात दरोडा)
Shegaon Crime News : टेमुर्डा येथील थरारक घटना
शाळेत जाणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीला लिफ्ट देण्याच्या बहाण्याने दुचाकीवर बसवून तिची छेड काढणाऱ्या आणि तिला चालत्या गाडीवरून उडी मारण्यास भाग पाडणाऱ्या अज्ञात विकृताला शेगाव पोलिसांनी अवघ्या २४ तासांच्या आत गजाआड केले आहे. गणेश बाळुराम कुमावत (वय ३४ वर्षे, सध्या रा. बोर्डा, ता. वरोरा, मूळ रा. बासडी खुर्द, जि. जयपूर, राजस्थान) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेली दुचाकीही जप्त करण्यात आली आहे.
विद्यार्थिनीने चालत्या दुचाकीवरून मारली उडी
मिळालेल्या माहितीनुसार, शेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील टेमुर्डा येथे २९ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली. पीडित अल्पवयीन मुलगी नेहमीप्रमाणे पायी शाळेत जात असताना एका अज्ञात दुचाकीस्वाराने तिला शाळेत सोडतो, अशी बतावणी करून लिफ्ट दिली. विद्यार्थिनी विश्वासाने गाडीवर बसल्यानंतर काही अंतरावर जाताच या नराधमाने तिची छेड काढण्यास सुरुवात केली. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे शाळकरी मुलगी प्रचंड घाबरली. स्वतःचा बचाव करण्यासाठी तिने प्रसंगावधान राखत थेट चालत्या दुचाकीवरून खाली उडी घेतली. या धाडसी प्रयत्नात ती खाली पडून जखमी झाली. हा प्रकार लक्षात येताच आरोपी घटनास्थळावरून दुचाकीसह पसार झाला. या घटनेची माहिती मिळताच शेगाव पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम ७४ सह बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा (पोक्सो) कलम १२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवली. सुरुवातीला आरोपीबाबत कोणतीही माहिती उपलब्ध नसतानाही शेगाव पोलिसांनी तांत्रिक तपास, गुप्त खबऱ्यांचे जाळे आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे टेमुर्डा, वरोरा व लगतच्या भागात कसून शोध मोहीम राबवली. अवघ्या २४ तासांच्या आत पोलिसांनी आरोपी गणेश कुमावत याला वरोरा तालुक्यातील बोर्डा येथून ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवून सखोल चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी त्याला विधिवत अटक करून गुन्ह्यात वापरलेली दुचाकी जप्त केली.
सदर धडक कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी दिनकर ठोसरे यांच्या मार्गदर्शनाखाली शेगावचे ठाणेदार सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेंद्रसिंग यादव, पोलीस उपनिरीक्षक दिलीप पोले, पोलीस उपनिरीक्षक सुमित कांबळे, सहाय्यक फौजदार दिलीप सुर, पोलीस हवालदार अविनाश तुरणकर, दिनेश ताटेवार आणि पोलीस शिपाई प्रशांत गिरडकर यांनी यशस्वीरीत्या पार पाडली. पोलिसांच्या या तत्पर कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






