चंद्रपूर: Shegaon Stone Attack प्रकरणात चंद्रपूर जिल्ह्यातील शेगाव बुद्रुक-बिजोणी मार्गावर किरकोळ वादाचे रूपांतर हिंसक हल्ल्यात झाले. दगडफेकीत आकाश हरिदास कळसकर गंभीर जखमी झाला असून त्याच्या डाव्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली आहे. उपचारासाठी त्याला प्रथम वरोरा, नंतर चंद्रपूर आणि पुढे नागपूर येथे रेफर करण्यात आले. या प्रकरणी शेगाव पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. (चंद्रपुरात फोन पे चा बनावट स्क्रिनशॉट, १५ हजारांचा चुना)
शेगांव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शेगांव बुद्रुक ते बिजोणी रोडवर किरकोळ वादाचे पर्यावसान मारामारीत होऊन एका तरुणावर दगडफेक केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या हल्ल्यात बिजोणी येथील रहिवासी आकाश हरिदास कळसकर (वय २८ वर्ष) हा तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्या डाव्या डोळ्याला मोठी दुखापत झाली आहे. शुक्रवार, ३ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास एचपी गॅस एजन्सीसमोर ही घटना घडली.
Shegaon Stone Attack प्रकरणात तरुणावर दगडफेक कशी झाली?
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी आकाश कळसकर हा त्याचे मित्र आशिष रोडे यांच्या दुचाकीने शेगांव बुद्रुक येथे मटण खरेदी करण्यासाठी गेला होता. मटण घेऊन गावात परतत असताना, पुढे दुचाकीने जाणाऱ्या प्रकाश कूत्तरमारे (रा. बिजोणी) याने चालत्या गाडीवरून आशिष रोडे याला शिवीगाळ केली. या कारणावरून आशिषने प्रकाश आणि त्याच्या गाडीवर मागे बसलेले मारोती रोडे यांना थांबवून जाब विचारला असता, त्यांच्यात जोरदार वाद व भांडण सुरू झाले. यावेळी दुचाकीवर मागे बसलेला आकाश हा दोघांचे भांडण मिटवण्यासाठी मध्यस्थी करत असताना, ‘तू मधात कशाला आलास’ असे म्हणत आरोपी प्रकाश कूत्तरमारे याने रस्त्यावरील दगड उचलून थेट आकाशच्या डाव्या डोळ्यावर मारला.
दगडाचा प्रहार इतका भीषण होता की आकाशच्या डोळ्याच्या खाली गंभीर जखम होऊन रक्तस्त्राव सुरू झाला. जखम झाल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाले. जखमी आकाशने वडीलांना फोन करून बोलावून घेत घर गाठले, मात्र रक्तस्त्राव थांबत नसल्याने अखेर त्याने शेगांव पोलीस स्टेशन गाठून आपबिती सांगितली. पोलिसांनी तातडीने त्याला उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे उपचारासाठी दाखल केले, परंतु प्रकृती गंभीर असल्याने डॉक्टरांनी त्याला पुढील उपचारासाठी चंद्रपूर आणि त्यानंतर नागपूर येथे रेफर केले आहे.
याप्रकरणी शेगांव पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी योगेंद्रसिंह यादव यांच्या मार्गदर्शनानुसार, आरोपी प्रकाश कूत्तरमारे याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS), २०२३ च्या कलम ११८(१) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हवालदार अविनाश सुरेश तुरणकर करीत आहेत.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






