चंद्रपूर: (Chandrapur Fake PhonePe Scam) चंद्रपूर शहरात डिजिटल पेमेंटच्या नावाखाली फसवणुकीची धक्कादायक घटना समोर आली आहे. बनावट PhonePe व्यवहाराचा स्क्रीनशॉट दाखवून एका सैलून चालकाकडून १५ हजार रुपये घेऊन आरोपी पसार झाला. या प्रकरणी रामनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
डिजिटल पेमेंटच्या युगात फसवणुकीचे नवे मार्ग शोधणाऱ्या भामट्यांनी आता व्यापाऱ्यांना लक्ष करण्यास सुरुवात केली असून, चंद्रपूर शहरातील रामनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अशीच एक फसवणुकीची घटना उघडकीस आली आहे. सी आर सी ग्राउंडजवळ असलेल्या ‘के.एस. सैलून’ या दुकानात एका भामट्याने ऑनलाईन पेमेंट यशस्वी झाल्याचा बनावट स्क्रीनशॉट दाखवून सैलून चालकाकडून १५ हजार रुपयांची रोकड घेऊन पोबारा केला. याप्रकरणी सैलून संचालक मुकीम मोहर अली शेख (वय ४२) यांच्या लेखी तक्रारीवरून रामनगर पोलिसांनी आदिल शखिल खान नावाच्या आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. (चंद्रपुरात १० लाखांचा सुगंधित तंबाखू जप्त)
Chandrapur Fake PhonePe Scam प्रकरण नेमके काय आहे?
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी मुकीम मोहर अली शेख हे सी आर सी ग्राउंडजवळ ‘के.एस. सैलून’ नावाचे दुकान चालवतात, जिथे उमेश कुमार आणि फरहान साह हे दोन तरुण काम करतात. २८ जून २०२६ रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास फिर्यादी दुकानात असताना एक अनोळखी व्यक्ती तिथे आली. त्याने कामगारांना (लेबर) पैसे देण्यासाठी १५,००0 रुपयांच्या रोकडीची अत्यंत गरज असल्याचे सांगून मुकीम यांचा विश्वास संपादन केला. माझ्याकडे कॅश नाही, तुम्ही मला १५ हजार रुपये रोख द्या, मी तुमच्या फोन पे (PhonePe) वर १५,००० रुपये ट्रान्सफर करतो, असे या व्यक्तीने सांगितले.
त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून मुकीम यांनी त्यांच्या दुकानातील कामगार उमेश कुमार याचा फोन पे नंबर त्याला दिला. या भामट्याने स्वतःच्या मोबाईलवर पैसे यशस्वीरित्या ट्रान्सफर झाल्याचे बनावट (फेक) डिटेल्स उमेश कुमारच्या मोबाईल स्क्रीनवर दाखवले. स्क्रीनवरील तो यशस्वी पेमेंटचा मेसेज खरा मानून मुकीम यांनी त्याला १५,००० रुपयांची रोकड दिली.
तो व्यक्ती निघून गेल्यानंतर काही वेळाने संशय आल्यामुळे मुकीम यांनी उमेश कुमारचे बँक खाते तपासले असता, त्यात कोणतीही रक्कम जमा झाली नसल्याचे स्पष्ट झाले व आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर मुकीम यांनी त्या व्यक्तीच्या ९३७०३८२८४९ या मोबाईल क्रमांकावर वारंवार संपर्क साधला, तेव्हा त्याने आपले नाव आदिल शखिल खान (रा. चंद्रपूर) असल्याचे सांगितले. कायदेशीर कारवाईच्या भीतीने आदिलने सुरुवातीला फोन पे द्वारे १,५०० रुपये परत केले, मात्र उर्वरित १३,५०० रुपये देण्यास टाळाटाळ केली.
आपली रक्कम परत मिळेल या आशेवर असलेल्या मुकीम यांना अखेर आपली फसवणूक झाल्याची खात्री पटल्याने त्यांनी रामनगर पोलीस ठाणे गाठून लेखी तक्रार नोंदवली. या तक्रारीवरून रामनगर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक प्रभावती त्र्यंबक एकुरके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुवर्णा काळे यांनी आरोपी आदिल शखिल खान याच्याविरुद्ध माहिती तंत्रज्ञान अधिनियम, २००० च्या कलम ६६ (ड) आणि भारतीय न्याय संहिता (BNS), २०२३ च्या कलम ३१६(२) व ३१८(४) अन्वये गुन्हा नोंदवला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






