Ballarpur Cyber Fraud मध्ये वृद्ध कामगाराची 3.59 लाखांची ऑनलाइन फसवणूक

बल्लारपूरमध्ये वृद्ध व्यक्तीची 3.59 लाखांची ऑनलाईन फसवणूक; 5 मिनिटांत खाते साफ

User avatar placeholder
Written by Prakash Hande

June 16, 2026

चंद्रपूर: Ballarpur Cyber Fraud प्रकरणामुळे चंद्रपूर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. बल्लारपूर येथील 62 वर्षीय सुतार कामगार मधुकर राखुंडे यांच्या बँक खात्यातून अज्ञात सायबर भामट्याने अवघ्या पाच मिनिटांत 3 लाख 59 हजार 898 रुपये काढून घेतल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे फिर्यादी यांनी कोणताही ओटीपी, पिन किंवा डिजिटल पेमेंट सेवा वापरली नसतानाही ही आर्थिक फसवणूक झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. (डायल ११२ वर कॉल, पोलिसांची धावपळ आणि धक्कादायक सत्य उघड)

बल्लारपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका वृद्ध सुतार कामगाराची अज्ञात सायबर भामट्याने तब्बल ३ लाख ५९ हजार ८९८ रुपयांची ऑनलाईन आर्थिक फसवणूक केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी गणपती वार्ड, बल्लारपूर येथील रहिवासी असलेले ६२ वर्षीय फिर्यादी श्री. मधुकर पंढरी राखुंडे यांनी दिलेल्या तोंडी तक्रारीवरून बल्लारशाह पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.

Ballarpur Cyber Fraud प्रकरण नेमके काय?

फिर्यादी मधुकर राखुंडे हे सुतारकाम व मजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. त्यांचे बल्लारपूर येथील बसस्थानकासमोरील बँक ऑफ बडोदा शाखेत खाते असून त्याला त्यांचा मोबाईल क्रमांक नोंदणीकृत आहे. मजुरीतून मिळणारे पैसे ते याच खात्यात जमा करत असत. गेल्या महिनाभरात २४ मे २०२६ रोजी ते आपल्या मुलीसह पुणे येथे प्रवासात असताना त्यांच्या मोबाईलवर अचानक अनेक संशयास्पद संदेश (मेसेज) आले. मुलीने फसवणुकीची शक्यता वर्तवल्याने त्यांनी तातडीने बँकेच्या ग्राहक सेवा केंद्राशी (कस्टमर केअर) संपर्क साधून आपले बँक खाते गोठवून (फ्रिज) घेतले. त्यानंतर १ जून २०२६ रोजी त्यांनी बँकेत रीतसर अर्ज सादर करून आपले खाते पुन्हा सुरू करून घेतले.

खाते पूर्ववत झाल्यानंतर अवघ्या दोन दिवसांत, म्हणजेच ०३ जून २०२६ रोजी दुपारी ४:०७ ते ४:१२ वाजेच्या सुमारास अज्ञात आरोपीने त्यांच्या बँक खात्यावर डल्ला मारला. फिर्यादी यांच्या मोबाईलवर एकापाठोपाठ एक मेसेज आल्यानंतर त्यांच्या मुलीने तपासले असता, खात्यातून पैसे वजा होत असल्याचे उघड झाले. भामट्याने केवळ ५ मिनिटांच्या कालावधीत ५ वेगवेगळ्या ट्रान्झॅक्शनद्वारे अनुक्रमे ६२,९०० रुपये, ९९,००० रुपये, ९९,००० रुपये, ४८,९९९.३८ रुपये आणि ४९,९९९.०१ रुपये असे एकूण ३,५९,८९८.३९ रुपये अनधिकृतपणे काढून घेतले. विशेष म्हणजे फिर्यादी यांच्याकडे कोणतेही एटीएम कार्ड नाही, तसेच ते गुगल पे, फोनपे सारख्या कोणत्याही डिजिटल पेमेंट सेवा किंवा यूपीआयचा वापर करत नाहीत. त्यांनी कोणाशीही कोणताही ओटीपी किंवा गोपनीय पिन क्रमांक शेअर केला नसतानाही ही फसवणूक झाली.

आपली मोठी आर्थिक फसवणूक झाल्याचे लक्षात येताच फिर्यादी यांनी सुरुवातीला ०४ जून २०२६ रोजी राष्ट्रीय सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टलवर आपली तक्रार नोंदवली. त्यानंतर १५ जून २०२६ रोजी त्यांनी प्रत्यक्ष बल्लारपूर पोलीस ठाण्यात हजर होऊन रीतसर तक्रार दिली. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी माहिती तंत्रज्ञान अधिनियम, २००० च्या कलम ६६ (ड) आणि भारतीय न्याय संहिता (BNS), २०२३ च्या कलम ३१८(४) अन्वये अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक बिपीन सुभाष इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा पुढील सखोल तपास सुरू असून सायबर गुन्हेगाराचा शोध घेतला जात आहे.

Advertisement

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment