Mul Fake Bomb Threat case accused arrested by Mul Police Chandrapur

बॉम्बस्फोटाचा बनावट कॉल; दारूच्या नशेत डायल ११२ ची दिशाभूल करणाऱ्या २४ वर्षीय युवकाला अटक

User avatar placeholder
Written by Prakash Hande

July 24, 2026

मूल : Mul Fake Bomb Threat प्रकरणी मूल पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत एका २४ वर्षीय आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातील मूल शहरात २३ जुलैच्या रात्री आपत्कालीन क्रमांक ‘डायल ११२’ वर एका मोबाईलवरून वारंवार कॉल आले. या फोनमध्ये मूल शहरात बॉम्बस्फोट होणार असल्याचा गंभीर संदेश देण्यात आला होता. पोलीस यंत्रणेने तातडीने घटनास्थळी धाव घेऊन चौकशी केली असता, हा संदेश पूर्णपणे बनावट असल्याचे निष्पन्न झाले. दारूच्या नशेत ही खोटी माहिती देणाऱ्या आरोपी रोशन बंडू मेश्राम याला पोलिसांनी तातडीने अटक केली असून त्याच्यावर गंभीर कलमान्वये गुन्हा नोंदवला आहे. (तिघांनी जगन्नाथ मंदिरातील दानपेटी फोडली)

‘डायल ११२’ वर रात्री ९:४३ वाजता आलेला तो एक कॉल

मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, गुरुवारी २३ जुलै रोजी रात्रीच्या सुमारास मूल पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार श्रीकांत गजानन वाढई व सहाय्यक फौजदार योगेश्वर भेंडारे हे रात्रपाळीच्या (नाईट ड्युटी) कर्तव्यावर तसेच ‘डायल ११२’ च्या आपत्कालीन वाहनावर तैनात होते. रात्री ९:४३ ते १०:१५ च्या दरम्यान पोलिसांच्या ‘डायल ११२’ या आपत्कालीन हेल्पलाईनवर एका मोबाईल क्रमांकावरून वारंवार कॉल आले. फोन करणाऱ्या इसमाने “मूल शहरात रोशन मेश्राम नावाचा इसम बॉम्बब्लास्ट (बॉम्बस्फोट) करणार आहे, तातडीने मदत पाठवा,” असा गंभीर संदेश दिला.

शहर सुरक्षिततेच्या दृष्टीने हा अत्यंत संवेदनशील संदेश असल्याने मूल पोलीस यंत्रणा तत्काळ सतर्क झाली आणि पोलीस पथकाने मिळालेल्या माहितीच्या आधारे तपासाची चक्रे वेगाने फिरवून घटनास्थळी धाव घेतली. मात्र, पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून सखोल चौकशी केली असता, तेथे असा कोणताही प्रकार घडणार नसल्याचे स्पष्ट झाले. डायल ११२ वर देण्यात आलेली माहिती पूर्णपणे खोटी, बनावट आणि पोलिसांची दिशाभूल करणारी असल्याचे तपासात निष्पन्न झाले.

यानंतर पोलिसांनी खोटी माहिती देणाऱ्या व्यक्तीचा शोध घेतला असता, मूल शहरातील वॉर्ड क्रमांक १६ मधील दुर्गा मंदिरासमोरील रस्त्यावर एक इसम दारूच्या नशेत धुंद अवस्थेत आढळून आला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्यानेच दारूच्या अमलाखाली हा फोन केल्याचे समोर आले. संशयिताची उपजिल्हा रुग्णालय, मूल येथे वैद्यकीय तपासणी करण्यात आली असता, तो घटनेच्या वेळी पूर्णपणे दारूच्या नशेत असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या अहवालात नमूद केले आहे.

कोणतेही कारण नसताना केवळ पोलिसांना त्रास देण्याच्या आणि मजा बघण्याच्या हेतूने या युवकाने जाणीवपूर्वक खोटी माहिती दिली, ज्यामुळे शासकीय यंत्रणेचा, मनुष्यबळाचा आणि मौल्यवान वेळेचा अपव्यय झाला. याप्रकरणी पोलीस अंमलदार श्रीकांत वाढई यांच्या तक्रारीवरून मूल पोलीस ठाण्यात आरोपी रोशन बंडू मेश्राम याच्याविरोधात भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ चे कलम २१७ आणि महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम १९४९ चे कलम ८५(१) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक महेश केळझारकर करत आहेत.

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment