Mul Scented Tobacco Seized by FDA and Mul Police Chandrapur

चामोर्शी ते मूल तंबाखू तस्करी उघड; पोलिसांकडून ३ आरोपींवर गुन्हे

User avatar placeholder
Written by Prakash Hande

July 24, 2026

चंद्रपूर: Mul Scented Tobacco Seized कारवाईअंतर्गत मूल पोलीस व अन्न आणि औषध प्रशासनाने (FDA) संयुक्तपणे धडक कारवाई केली आहे. ताडाळा रोडवरील सरकारी गोदामासमोर गस्त घालत असताना दुचाकीवरून अवैध तंबाखू नेणाऱ्या दोन तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून १ लाख ८ हजार ५५० रुपयांचा सुगंधित हुक्का तंबाखू आणि दुचाकी जप्त करण्यात आली. या प्रकरणी अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून तीन जणांविरुद्ध भारतीय न्याय संहिता व अन्न सुरक्षा कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. (तो बॉम्बस्फोट करणार आहे तातडीने मदत पाठवा, एक कॉल पोलिसांची उडाली तारांबळ)

शंका आल्याने दुचाकीची झडती; पुठ्ठ्याच्या खोक्यांमध्ये आढळला हुक्का तंबाखू

मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, मूल पोलीस ठाण्याचे पोलीस पथक ताडाळा रोडवरील सरकारी गोदामासमोर गस्त घालत असताना, त्यांना एका दुचाकीवरून दोन तरुण संशयास्पदरीत्या जाताना दिसले. पोलिसांनी त्यांना थांबवून त्यांच्या ताब्यातील हीरो स्प्लेंडर दुचाकीवर (क्रमांक MH 34 CH 5382) असलेल्या खाकी थैलीची झडती घेतली असता, त्यात तीन पुठ्ठ्याच्या खोक्यांमध्ये महाराष्ट्रात प्रतिबंधित केलेला सुगंधित हुक्का तंबाखूचा साठा आढळून आला. पोलिसांनी तातडीने या घटनेची माहिती अन्न व औषध प्रशासनाला दिली. या माहितीवरून चंद्रपूरचे अन्न सुरक्षा अधिकारी प्रणय दामोधर कांबळे यांनी मूल पोलीस ठाण्यात पोहोचून जप्त साठ्याची सखोल पाहणी व तपासणी केली.

पानठेल्यांवर विक्रीची तयारी

या कारवाईदरम्यान ‘मजा १०८ हुक्का शीशा तंबाखू’ चे ५० ग्रॅम वजनाचे एकूण ३० डब्बे (एकूण १.५ किलो) जप्त करण्यात आले. या सुगंधित तंबाखूची बाजारपेठेतील किंमत ८ हजार ५५० रुपये असून, वाहतुकीसाठी वापरलेली १ लाख रुपये किमतीची दुचाकी असा एकूण १ लाख ८ हजार ५५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. चौकशीदरम्यान संशयित आरोपी सूरज ईश्वर लोनबले (वय २८, रा. ताडाळा) आणि यश रवींद्र निमगडे (वय २०, रा. ताडाळा) यांनी हा प्रतिबंधित माल पानठेल्यांवर विक्री करण्यासाठी नेत असल्याचे मान्य केले. तसेच, या मालाची कोणतीही अधिकृत खरेदी पावती (बिल) त्यांच्याकडे नव्हती. अधिक चौकशीत त्यांनी हा माल चामोर्शी येथील अवि चलाक नावाच्या व्यक्तीकडून प्राप्त केल्याचे निष्पन्न झाले.

राज्य शासनाने १३ जुलै २०२६ च्या अधिसूचनेनुसार सार्वजनिक आरोग्याचे हित लक्षात घेऊन सुगंधित तंबाखू, गुटखा, पानमसाला आणि निकोटीनयुक्त अन्नपदार्थांच्या उत्पादनावर, विक्रीवर व वाहतुकीवर पूर्णपणे बंदी घातली आहे. अशा पदार्थांच्या सेवनाने कर्करोग, मुखरोग आणि इतर गंभीर आजार होतात याची पूर्ण कल्पना असतानाही आरोपींनी आर्थिक लाभासाठी हा बेकायदेशीर साठा केला होता. याप्रकरणी अन्न सुरक्षा अधिकारी प्रणय कांबळे यांच्या तक्रारीवरून मूल पोलीस ठाण्यात आरोपी सूरज लोनबले, यश निमगडे आणि पुरवठादार अवि चलाक यांच्याविरुद्ध अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम २००६ च्या कलम २६(१), २६(२)(i), २६(२)(iv), २७(३)(e), ३०(२)(a), ५९ सह भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ मधील कलम १२३, २२३, २७४, २७५ आणि ३(५) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस शिपाई नरेश कोडापे करत आहेत.

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment