Chandrapur Gutkha Raid मध्ये FDA ने जप्त केलेला प्रतिबंधित मुद्देमाल

चंद्रपूर जिल्ह्यात गुटखा-खर्रा विक्रीविरुद्ध FDA ची धडक मोहीम; ४४ हजारांचा मुद्देमाल जप्त

User avatar placeholder
Written by Prakash Hande

June 28, 2026

चंद्रपूर: मानवी आरोग्याला घातक ठरणाऱ्या आणि कर्करोगासारख्या गंभीर आजारांना कारणीभूत असणाऱ्या प्रतिबंधित गुटखा, सुगंधीत तंबाखू, पानमसाला आणि खर्रा यांविरुद्ध चंद्रपूर जिल्ह्यात अन्न व औषध प्रशासनाने (FDA) मोठी धडक मोहीम राबवली आहे. अन्न सुरक्षा आयुक्तांच्या बंदी आदेशाचे उल्लंघन करून बेकायदेशीरपणे या पदार्थांचा साठा व विक्री करणाऱ्यांवर दुर्गापूर, गडचांदूर आणि गोंडपिपरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत छापे टाकून एकूण ४४,३६५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून संबंधित आरोपींविरुद्ध अन्न सुरक्षा व मानके कायद्यासह भारतीय न्याय संहितेच्या (BNS) विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. (चंद्रपुरातील पान टपरीवर एमडी पावडर जप्त)

पहिली कारवाई: तुकूम येथील राजीव नगरमध्ये खर्रा बनवण्याच्या मशीनसह मुद्देमाल जप्त

दुर्गापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पहिली कारवाई २५ जून २०२६ रोजी सकाळी ९:३० ते १०:०० वाजेच्या सुमारास तुकूम परिसरातील राजीव नगर येथे करण्यात आली. अन्न सुरक्षा अधिकारी उमेश मार्तंड कापगते यांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे राजीव नगर येथील एस.टी. वर्कशॉपजवळ असलेल्या शंकर गजानन हजारे (वय ४१ वर्ष) यांच्या घरापुढे तपासणी केली. या छाप्यात शासनाने प्रतिबंधित केलेला मानवी आरोग्यास घातक असणारा खर्रा आणि इतर साहित्य आढळून आले.

Chandrapur Gutkha Raid अंतर्गत FDA ची मोठी कारवाई

या कारवाईत अंदाजे १०० रुपये किमतीचा १०० ग्रॅम तयार खर्रा, ३,००० रुपये किमतीची ०.५ किलोग्रॅम सुगंधीत तंबाखू (मजा), २,५०० रुपये किमतीची ५ किलो सुपारी (खर्रा बनवण्यासाठी वापरली जाणारी) आणि तब्बल ९,००० रुपये किमतीची खर्रा बनवण्याची इलेक्ट्रॉनिक मशीन, असा एकूण १४,६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी या प्रतिबंधित साठ्यातून विश्लेषणासाठी अनौपचारिक नमुने घेतले असून संपूर्ण माल जप्त केला आहे.

या प्रकरणी अन्न सुरक्षा अधिकारी उमेश कापगते यांच्या लेखी तक्रारीवरून दुर्गापूर पोलिसांनी आरोपी शंकर गजानन हजारे याच्याविरुद्ध अन्न सुरक्षा व मानके अधिनियम २००६ च्या कलम २६(१), २६(२)(i), २६(२)(iv), २७(३)(e), ३०(२)(a) तसेच भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ च्या कलम १२३, २२३, २७४ आणि २७५ अन्वये गुन्हा (क्र. ०३११) दाखल केला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पंकज सूर्यभान वासाडे करत आहेत. (भाड्याच्या खोलीत सुगंधित तंबाखूचा साठा, एलसीबी ची कारवाई)

दुसरी कारवाई: ताडोबा रोडवरील पान सेंटरवर छापा; ग्राइंडर मशीन व सुगंधी तंबाखू हस्तगत

दुर्गापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतच २५ जून २०२६ रोजी दुसरी समांतर कारवाई ताडोबा रोडवरील तुकूम भागात करण्यात आली. अन्न सुरक्षा अधिकारी कुणाल गोपाल मुळे यांनी ताडोबा रोडवर शिवकृपा मेडिकलच्या बाजूला असलेल्या ‘इटणकर डेलिनिडस अँड झेरॉक्स अँड पान सेंटर’ या पेढीची झडती घेतली. या ठिकाणी आरोपी पेढीमालक मंगेश मधुकर इटणकर (वय ४७ वर्ष, रा. वाघोबा चौक, नवकरकर लेआऊट, तुकूम) हा प्रतिबंधित अन्नपदार्थांचा साठा करून विक्री करत असल्याचे निष्पन्न झाले.

या दुकानातून पोलिसांनी ५५२ रुपये किमतीचे १८४ ग्रॅमचे सिग्नेचरचे १ पॅकेट, ८३० रुपये किमतीचे ईगल हुक्का शिशा टोबॅकोचे २ पॅकेट, १५४ रुपये किमतीचे व्ही-१ टोबॅकोचे ७ पॅकेट, २५० रुपये किमतीचा २५० ग्रॅम हुक्का शिशा सुगंधी तंबाखू व सुपारीयुक्त तयार खर्रा, १९८ रुपये किमतीचे प्रीमियम राजश्री पानमसाल्याचे ११ पॅकेट आणि ३,५०० रुपये किमतीची खर्रा बनवण्याची ग्राइंडर मशीन, असा एकूण ५,४८४ रुपयांचा साठा जप्त केला. या प्रकरणी कुणाल मुळे यांच्या फिर्यादीवरून दुर्गापूर पोलिसांनी आरोपी मंगेश इटणकर याच्याविरुद्ध अन्न सुरक्षा कायदा व भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमांतर्गत गुन्हा (क्र. ०३१०) नोंदवला असून, याही गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक संतोष भीमराव शेगावकर यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक पंकज वासाडे यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.

तिसरी कारवाई: गोंडपिपरी येथील ‘माउली टी & पान सेंटर’वर पोलिसांचा धाडसी छापा

प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीविरोधातील तिसरी कारवाई २५ जून २०२६ रोजी सायंकाळी ६:०० वाजेच्या सुमारास गोंडपिपरी येथील धाबा रोडवर करण्यात आली. अन्न सुरक्षा अधिकारी प्रणय दामोधर कांबळे यांनी गोंडपिपरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आझाद हिंद चौक (वॉर्ड क्र. १६) येथील ‘माउली टी & पान सेंटर’ या पेढीची आकस्मिक तपासणी केली. या तपासणीत पेढीचालक आर्यन अनंत अवझे (वय २० वर्ष, रा. आझाद हिंद चौक, गोंडपिपरी) याच्या ताब्यात बंदी असलेला माल सापडला.

येथून ३८४ रुपये किमतीच्या सिग्नेचर सुगंधीत सुपारीच्या ३२ पुड्या (वजन ४ ग्रॅम), २५५ रुपये किमतीचे ईगल हुक्का शिशा टोबॅकोचे ३ पॅकेट (वजन ४० ग्रॅम), ५०० रुपये किमतीचा ५०० ग्रॅम वजनाचा प्रतिबंधित खर्रा आणि १,००० रुपये किमतीची २ किलो सुपारी, असा एकूण २,१३९ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. लोकसेवकाच्या आदेशाचे उल्लंघन करून मानवी आरोग्यास घातक असलेला साठा बाळगल्याप्रन्यार्थी अन्न सुरक्षा अधिकारी प्रणय कांबळे यांनी गोंडपिपरी पोलीस ठाण्यात लेखी फिर्याद दिली. त्यावरून पोलिसांनी आरोपी आर्यन अवझे याच्याविरुद्ध गुन्हा (क्र. ०२६३) दाखल केला असून, पोलीस निरीक्षक रमेश शहाजी हत्तीगोटे यांच्या सूचनेनुसार सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक खुशाल लिंगाजी टेकाम या प्रकरणाचा तपास करत आहेत.

चौथी कारवाई: गडचांदूर येथे मोठी कारवाई; मुख्य आरोपी फरार, नोकर पोलिसांच्या ताब्यात

जिल्ह्यातील चौथी आणि सर्वात मोठी कारवाई २६ जून २०२६ रोजी दुपारी १:०० ते २:०० वाजेच्या दरम्यान कोरपणा तालुक्यातील गडचांदूर येथे करण्यात आली. गडचांदूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शिवाजी कदम यांनी अन्न व औषध प्रशासनाशी संपर्क साधून प्रतिबंधित मालाबाबत माहिती दिली होती. त्यानुसार अन्न सुरक्षा अधिकारी प्रणय दामोधर कांबळे यांनी गडचांदूर पोलीस ठाणे गाठून पोलिसांच्या मदतीने एका पानठेल्यावर/दुकानात संयुक्त छापा टाकला. या कारवाई दरम्यान मुख्य आरोपी व विक्रेता विनोद वामन तराळे (वय ४५ वर्ष, रा. गडचांदूर) हा पोलिसांना चकमा देऊन फरार झाला, तर दुकानात हजर असलेला त्याचा नोकर अमोल सुभाष टेकाम (वय ३४ वर्ष, रा. गडचांदूर) याला पोलिसांनी ताब्यात घेतले.

या दुकानातून तब्बल ११.१२३ किलो वजनाचा प्रतिबंधित साठा आणि पॅकिंगचे साहित्य जप्त करण्यात आले. यामध्ये ५२० रुपयांचे व्ही-१ टोबॅकोचे १९ पॅकेट, ५२५ रुपयांचे विमल पानमसाल्याचे ५ मोठे पॅकेट, १६२ रुपयांचे विमल पानमसाल्याचे ८ छोटे पॅकेट, १,१९० रुपयांचे रजनीगंधा सुगंधीत पानमसाल्याचे १७ पॅकेट, ५,१७५ रुपयांचे फ्लेवर्ड हुक्का मोलासेस (आफ्रीन व माया गोल्ड ब्रँड) चे ४४ पॅकेट, १,९८० रुपयांचे सिग्नेचर सुगंधीत सुपारीचे ५ पॅकेट (१३२ ग्रॅम), ८८८ रुपयांचे सिग्नेचरचे ३ पॅकेट (९२.५ ग्रॅम), ७२६ रुपयांचे प्रीमियम राजश्री पानमसाल्याचे २२ पॅकेट, ९० रुपयांचे राजश्री पानमसाल्याचे १ पॅकेट, २,२६० रुपयांचे मजा हुक्का शिशा-१०८ चे १ पॅकेट आणि ३,००० रुपये किमतीची ६ किलो सुपारी हस्तगत करण्यात आली.

याशिवाय गुटखा व खर्रा पॅक करण्यासाठी वापरली जाणारी ७,७६० रुपये किमतीची मोठ्या प्रमाणावरील पॉलिथिन पिशव्यांची पाकिटे जप्त करण्यात आली. अन्नपदार्थ व पॉलिथिन मिळून एकूण २४,२७६ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

या प्रकरणी गडचांदूर पोलीस ठाण्यात आरोपी मालक विनोद वामन तराळे आणि नोकर अमोल सुभाष टेकाम यांच्याविरुद्ध अन्न सुरक्षा व मानके अधिनियमाच्या विविध कलमांसह भारतीय न्याय संहितेच्या कलम १२३, २२३, २७४, २७५ अन्वये गुन्हा (क्र. ०३७०) दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पंकज शंकरराव हेकड करत आहेत.

आरोग्याशी खेळल्यास ‘मकोका’ अंतर्गत कारवाईची मागणी

अन्न व औषध प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रित अधिसूचनेनुसार सार्वजनिक आरोग्याचा हितासाठी गुटखा, पानमसाला, सुगंधीत तंबाखू, खर्रा आणि सुगंधीत सुपारी यांच्या उत्पादन, साठा, वाहतूक व विक्रीवर संपूर्ण राज्यात एका वर्षासाठी कठोर बंदी घालण्यात आली आहे. या पदार्थांच्या सेवनाने मुखाचा कर्करोग (Cancer), प्रजननावर विपरीत परिणाम आणि इतर गंभीर आजार होतात याची पूर्ण जाणीव असतानाही आरोपी केवळ आर्थिक फायद्यासाठी नागरिकांच्या व तरुणांच्या आयुष्याशी खेळत होते. अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी आपल्या फिर्यादीत नमूद केले आहे की, जर भविष्यात या आरोपींचा सुगंधीत तंबाखू व अमली पदार्थांच्या बेकायदेशीर तस्करीतील संघटित गुन्हेगारीशी संबंध आढळल्यास, त्यांच्यावर ‘मकोका’ (MCOCA) अंतर्गत कठोर कारवाई करण्यासाठी देखील पोलिसांकडे पाठपुरावा केला जाईल. या धडक कारवायांमुळे जिल्ह्यातील अवैध गुटखा आणि खर्रा विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत.

Advertisement

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment