सिंदेवाही : Sindewahi Tobacco Raid प्रकरणात चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत सिंदेवाही येथे २.८४ लाख रुपयांचा प्रतिबंधित सुगंधित तंबाखू, गुटखा आणि हुक्का शिशा साठा जप्त केला आहे. या प्रकरणात मुख्य आरोपी सागर केकरे याला अटक करण्यात आली असून तळोधी बाळापूर येथील पुरवठादार रोहित शिवनकर याचा शोध सुरू आहे. पोलिसांनी दोन वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकून मोठ्या प्रमाणात अवैध साठा जप्त केला आहे.
महाराष्ट्र शासनाने जनआरोग्याच्या हितासाठी प्रतिबंधित केलेल्या सुगंधित तंबाखू, गुटखा आणि हुक्का शिशा सामग्रीच्या अवैध विक्री व साठवणुकीविरुद्ध चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) शनिवारी पहाटेच्या सुमारास सिंदेवाही पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक मोठी धडक कारवाई केली आहे. या छाप्यात पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणांहून एकूण २,८४,१४५ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून, या प्रकरणी एका मुख्य तस्कराला ताब्यात घेण्यात आले आहे, तर त्याच्या मुख्य पुरवठादाराचा शोध पोलीस घेत आहेत. (चंद्रपूर जिल्ह्यात ३ अल्पवयीन मुले बेपत्ता)
Sindewahi Tobacco Raid मध्ये LCB ची मोठी कामगिरी
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक विनोद गजानन भुरले व त्यांचे पथक १३ जून २०२६ रोजी सिंदेवाही पोलीस ठाण्याच्या परिसरात पेट्रोलिंगवर असताना त्यांना एका खास गुप्तबातमीदाराकडून खात्रीशीर माहिती मिळाली. सिंदेवाही येथील आझाद चौक परिसरातील भाड्याच्या खोलीमध्ये एका इसमाने विक्रीच्या उद्देशाने प्रतिबंधित गुटखा आणि सुगंधित तंबाखूचा मोठा साठा दडवून ठेवल्याची ती माहिती होती. माहिती मिळताच पोलीस पथकाने दोन स्थानिक पंचांना (रोहीत सादरानी आणि गणेश येग्गेवार) सोबत घेऊन आझाद चौकातील संशयास्पद घराकडे कूच केली.
भाड्याच्या खोल्यांवर छापे; दोन वेगवेगळ्या ठिकाणी मुद्देमाल जप्त
पोलीस पथकाने पहाटे ३:१५ ते ४:३० च्या दरम्यान आझाद चौकात राहणाऱ्या सागर प्रमोदराव केकरे (वय ३४ वर्षे, धंदा- किराणा दुकान श्रीकृष्ण ट्रेडर्स) याच्या घराची झडती घेतली. विचारपूस केली असता, सागरने एकता चौकातील सचिन दिलीपराव गुमदेलवार यांच्याकडून भाड्याने घेतलेली खोली दाखवली. या खोलीची पंचांसमक्ष झडती घेतली असता पोलिसांना पहिल्या खोलीत ८०,१०० रुपये किमतीचे ‘ईगल तंबाखू झेन’चे ९० टिनचे डब्बे, ३३,९०० रुपयांचे ‘मजा १०८ हुक्का शिशा’चे ३० डब्बे आणि ३४,३०० रुपयांचा ‘कालासोना जाफराणी जरदा ५५५’ चा साठा (एकूण १,४८,३०० रुपये) मिळून आला.
त्यानंतर आरोपी सागर केकरे याला अधिक विश्वासात घेऊन सखोल चौकशी केली असता, त्याने प्रतिबंधित तंबाखूचा उर्वरित साठा त्याचा ओळखीचा इसम विलास संबाशिव मोगरे (रा. सिंदेवाही) याच्या घरी लपवून ठेवल्याची कबुली दिली. मोगरे याच्या घरी छापा टाकला असता तो हजर नव्हता, मात्र खोलीच्या झडतीमध्ये पोलिसांना २९,४६५ रुपयांची ‘ईगल हुक्का शिशा तंबाखू’, २८,५०० रुपयांची ‘मजा १०८ हुक्का शिशा तंबाखू’, ३७,१०० रुपयांची ‘होला हुक्का शिशा तंबाखू’, १२,०७० रुपयांची ‘ईगल हुक्का शिशा तंबाखू’, ७,२०० रुपयांचा ‘केसरयुक्त विमल पान मसाला’, १८,००० रुपयांची ‘स्वीटू गोल्ड स्वीट सुपारी’ आणि ३,५१० रुपयांचा ‘राजश्री पान मसाला’ असा एकूण १,३५,८४५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
टाटा हॅरियर गाडीतून व्हायचा पुरवठा; मुख्य तस्कर जेरबंद, पुरवठादार फरार
दोन्ही खोल्यांमधून जप्त करण्यात आलेल्या प्रतिबंधित मालाची एकूण किंमत २,८४,१४५ रुपये आहे. पकडण्यात आलेल्या मुख्य आरोपी सागर केकरे याच्याकडे या मालाच्या स्त्रोताबाबत विचारणा केली असता, त्याने धक्कादायक खुलासा केला. हा संपूर्ण प्रतिबंधित साठा त्याला तळोधी बाळापूर (ता. नागभीड) येथील रहिवासी रोहित शिवनकर याने त्याच्या ‘टाटा हॅरियर’ (क्रमांक MH 44 S 3838) या चारचाकी वाहनाने आणून दिल्याचे पंचांसमक्ष मान्य केले. पोलिसांनी घटनास्थळावरून मुख्य आरोपी सागर केकरे याला जेरबंद केले असून पुरवठादार रोहित शिवनकर याचा शोध सुरू आहे. या संपूर्ण कारवाईचे ई-साक्ष ॲपद्वारे व्हिडिओ रेकॉर्डिंग व फोटो काढून कायदेशीर पुरावे गोळा करण्यात आले आहेत.
गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल
याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक विनोद गजानन भुरले यांच्या लेखी तक्रारीवरून सिंदेवाही पोलीस ठाण्यात आरोपी सागर प्रमोदराव केकरे आणि फरार पुरवठादार रोहित शिवनकर यांच्याविरुद्ध अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम २००६ च्या कलम २६(२)(i), २६(२)(iv), ३०(२)(a), ५९ सह भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ च्या कलम १२३, २२३, २७५ आणि ३(५) अन्वये गुन्हा (F.I.R. क्र. ०४२५) नोंदवण्यात आला आहे. प्रतिबंधित पदार्थांच्या सेवनामुळे कॅन्सरसारखे गंभीर आजार होतात याची जाणीव असतानाही केवळ पैशांच्या हव्यासापोटी हा साठा केल्याचे पोलिसांनी तक्रारीत म्हटले आहे. सिंदेवाही पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सतीश साळीकराम मेश्राम यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत उदाराम लांजेवार या गुन्ह्याचा पुढील तपास करीत आहेत.
पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनात यशस्वी कामगिरी
सदर धडक कारवाई चंद्रपूरचे पोलीस अधीक्षक श्री आयुष नोपानी आणि अपर पोलीस अधीक्षक श्री ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात करण्यात आली. या पथकात सपोनि दीपक काँक्रेटवार, पोउपनि विनोद भुरले, पोउपनि सर्वेश बेलसरे, पोलीस अंमलदार गणेश मोहुर्ले, जयसिंग, सचिन गुरनुले, संतोष येलपूलवार, गणेश भोयर, चेतन गज्जेलवार, सुमित बरडे आणि अजित शेंडे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now