Mul Tobacco Factory Raid मध्ये जप्त केलेला बनावट तंबाखू आणि पानमसाला साठा

एलसीबीची धडक कारवाई; घरातच बनत होता प्रतिबंधित तंबाखू, 9.85 लाखांचा माल जप्त

User avatar placeholder
Written by Prakash Hande

June 17, 2026

मूल (चंद्रपूर): Mul Tobacco Factory Raid प्रकरणात चंद्रपूर जिल्ह्यातील मुल शहरात स्थानिक गुन्हे शाखा आणि मुल पोलिसांनी संयुक्त कारवाई करत घरामध्ये सुरू असलेल्या बनावट सुगंधित तंबाखू निर्मिती कारखान्याचा पर्दाफाश केला आहे. या धाडीत प्रतिबंधित तंबाखू, पानमसाला, उत्पादन साहित्य, मशीनरी आणि कारसह तब्बल 9.85 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

राज्यात प्रतिबंधित असलेल्या आणि मानवी आरोग्याला घातक ठरणाऱ्या सुगंधित तंबाखू तसेच पानमसाल्याच्या बेकायदेशीर निर्मिती आणि विक्रीविरोधात चंद्रपूर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. मुल शहरात चक्क घरामध्येच सुरू असलेल्या बनावट सुगंधित तंबाखू निर्मितीच्या कारखान्यावर स्थानिक गुन्हे शाखा (LCB) आणि मुल पोलिसांनी संयुक्त धाड टाकून तब्बल ९,८५,४४५ रुपयांचा माल जप्त केला असून या प्रकरणी २७ वर्षीय आरोपीला अटक करण्यात आली आहे. (सावली मध्ये प्रतिबंधित बनावट तंबाखूच्या कारखान्यावर धाड)

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूरच्या अधिकाऱ्यांना गुप्त बातमीदाराकडून खात्रीशीर माहिती मिळाली होती की, मुल येथील वॉर्ड क्रमांक १४ मधील रहिवासी तोहीद शेख हा स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी प्रतिबंधित सुगंधित तंबाखू व पानमसाला विक्रीसाठी बाळगून आहे आणि घरीच बनावट तंबाखू तयार करत आहे. या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखा आणि मुल पोलीस स्टेशनच्या पथकाने ताडाळा रोड (वॉर्ड क्र. १७) येथील आरोपी मोहम्मद तोहीद मोहम्मद आरिफ याच्या राहत्या घरावर छापा टाकला.

Mul Tobacco Factory Raid मध्ये नेमके काय जप्त झाले?

या कारवाईत पोलिसांनी बनावट सुगंधित तंबाखू तयार करण्याचे साहित्य, मशीन, प्रतिबंधित तंबाखू, पानमसाल्याचा साठा आणि वाहतुकीसाठी वापरण्यात येणारी कार (क्रमांक MH-27 BV-2907) असा एकूण ९,८५,४४५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. जप्त केलेला मुद्देमाल आणि आरोपीला पुढील कायदेशीर कारवाईसाठी अन्न व औषध प्रशासन (FDA) चंद्रपूर यांच्या ताब्यात देण्यात आले असून त्यांच्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) आणि अन्न सुरक्षा व मानके कायदा, २००६ अन्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास मुल पोलीस करत आहेत.

सदर कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी सत्यजित आमले यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे, मुलचे पोलीस निरीक्षक विजय राठोड आणि पोउपनि विनोद भुरले, पोउपनि संतोष निंभोरकर, पोउपनि रुपेश कुंभरे, धनराज करकाडे, जयंत चुनारकर, चेतन गज्जलवार, सुरेंद्र महतो, सुमित बरडे, प्रफुल गारघाटे, किशोर वाकाटे, दीपिका सोडणार व सायबर पोलिसांनी केली.

मुल येथील या धडक कारवाईने चंद्रपूर जिल्ह्यातील अवैध धंद्यांचे जाळे किती घट्ट पसरले आहे हे पुन्हा एकदा उघड केले असले, तरी या निमित्ताने स्थानिक पोलिसांच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. काही दिवसांपूर्वीच सावली तालुक्यातही स्थानिक गुन्हे शाखेने अशाच प्रकारच्या एका बनावट तंबाखू निर्मितीच्या कारखान्यावर धाड टाकून मोठा पर्दाफाश केला होता. सावली पाठोपाठ आता मुल शहरातही एलसीबीनेच पुढाकार घेऊन ही कारवाई केली आहे.

शहराच्या मध्यवस्तीत, घरामध्येच एवढा मोठा बनावट कारखाना राजरोसपणे सुरू असतो आणि त्याची साधी पुसटशी कल्पनाही स्थानिक पोलिसांना म्हणजेच बीट अंमलदार आणि पोलीस स्टेशनला कशी लागत नाही, याबाबत आता आश्चर्य व्यक्त केले जात आहे. स्थानिक पोलिसांचे या अवैध धंद्यांकडे दुर्लक्ष होते की त्यांचे या माफियांसोबत काही साटेलोटे आहे, असा संतप्त सवाल आता नागरिक विचारत आहेत. एलसीबीच्या सततच्या धाडींमुळे स्थानिक पोलिसांची यंत्रणा सुस्त आणि अपयशी ठरत असल्याचेच चित्र पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

Advertisement

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment