Korpana Tobacco Seizure कारवाईत जप्त केलेला प्रतिबंधित तंबाखू साठा

कोरपना तालुक्यातील माथा येथे प्रतिबंधित हुक्का तंबाखू व पानमसाला जप्त; 59 वर्षीय आरोपी अटकेत

User avatar placeholder
Written by Prakash Hande

June 17, 2026

चंद्रपूर: Korpana Tobacco Seizure प्रकरणात चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना पोलिसांनी मोठी कारवाई करत माथा गावातील एका गोदामावर धाड टाकली. या कारवाईत प्रतिबंधित हुक्का तंबाखू आणि सुगंधित सुपारीचा साठा जप्त करण्यात आला असून 59 वर्षीय आरोपीला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी एकूण 17,606 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून संबंधित आरोपीविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (मूल तालुक्यात सुगंधित तंबाखूच्या कारखान्यावर धाड))

जिल्हा पोलीस दलाने प्रतिबंधित आणि मानवी आरोग्याला कमालीचे घातक असणाऱ्या सुगंधित तंबाखू व सुपारीच्या तस्करांविरोधात आपली धडक मोहीम सुरूच ठेवली असून, कोरपना पोलिसांनी मंगळवारी दुपारी एका मोठ्या कारवाईत हजारोंचा मुद्देमाल जप्त केला आहे. कोरपना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मौजा माथा येथे राजरोसपणे सुरू असलेल्या एका गोदामावर धाड टाकून पोलिसांनी लोकांच्या जीवितास हानिकारक असणारा प्रतिबंधित हुक्का तंबाखू आणि सुगंधित सुपारीचा साठा जप्त केला असून ५९ वर्षीय आरोपीला रंगेहात अटक केली आहे. या धडक कारवाईमुळे परिसरातील बेकायदेशीर नशिल्या पदार्थांची विक्री करणाऱ्या तस्करांचे धाबे दणाणले आहेत.

मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, १६ जून २०२६ रोजी कोरपना पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकारी तथा पोलीस निरीक्षक लता सीतारामजी वाढीवे या पोलीस स्टाफसह सरकारी वाहनाने हद्दीत पेट्रोलिंग करीत होत्या. दरम्यान, त्यांना एका गुप्त बातमीदाराकडून खात्रीशीर माहिती मिळाली की, मौजा माथा येथील रहिवासी सुभाष मनोहर उपगणलावार याने आपल्या घराजवळील गोदामात विक्रीच्या उद्देशाने प्रतिबंधित सुगंधित तंबाखूचा अवैध साठा लपवून ठेवला आहे.

Korpana Tobacco Seizure मध्ये पोलिसांना कशी मिळाली माहिती?

या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक वाढीवे यांनी तात्काळ दोन पंचांना पाचारण करून कायदेशीर सुचनापत्र दिले आणि दुपारी पावणेएक वाजेच्या सुमारास पोलीस पथकासह माथा येथील संबंधित संशयित घरासमोर धाड टाकली. घराबाहेर आलेल्या इसमाची पंचांसमक्ष चौकशी केली असता त्याने आपले नाव सुभाष मनोहर उपगणलावार (वय ५९ वर्ष, रा. माथा, ता. कोरपना) असे सांगितले. पोलिसांनी गोदामाची झडती घेण्याचे कारण सांगून कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करत पंचांसमक्ष गोदामाची तपासणी सुरू केली.

गोदामाच्या एका कोपऱ्यात तपासणी केली असता पोलिसांना दोन मोठ्या प्लास्टिकच्या चुंगळ्यांमध्ये लपवून ठेवलेला प्रतिबंधित साठा मिळून आला. यामध्ये १३,२५० रुपये किमतीचे ‘होला हुक्का तंबाखू’चे प्रत्येकी १ किलोग्रॅम वजनाचे १० नग पाकीट आणि ४,३५६ रुपये किमतीचे ‘विमल पान मसाला’चे एकूण २२ पाकीट असा एकूण १७,६०६ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. हा संपूर्ण साठा लोकांच्या जीवितास हानीकारक आणि नशिला पदार्थ असल्याने पोलिसांनी तो पंचांसमक्ष जप्त करून सीलबंद केला. या प्रकरणी कोरपना पोलीस ठाण्यात आरोपी सुभाष उपगणलावार याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS), २०२३ च्या कलम १२३, २७४, २७५, २२३ सह अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम २००६ च्या विविध कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार अमर रामराव राठोड यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.

Advertisement

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment