मूल – Mul Hookah Tobacco प्रकरणात चंद्रपूर जिल्ह्यातील मूल तालुक्यात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. नागाळा येथील किराणा दुकानातून १९ किलो प्रतिबंधित हुक्का शीशा तंबाखू जप्त करण्यात आला. या प्रकरणी अन्न सुरक्षा व मानके अधिनियम तसेच भारतीय न्याय संहितेअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (चंद्रपूर जिल्ह्यात FDA च्या कारवाईने तंबाखू विक्रेत्यांचे धाबे दणाणले)
चंद्रपूर जिल्ह्यातील मूल पोलीस ठाण्याच्या हद्दीत मानवी आरोग्यास घातक आणि प्रतिबंधित असलेल्या हुक्का शीशा तंबाखूची अवैध विक्री करणाऱ्या एका दुकानदारावर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. मूल तालुक्यातील नागाळा (चीचपल्ली) येथील ‘साजीत किराणा आणि कनफेकस्नरी’ या दुकानाची झडती घेऊन पोलिसांनी तेथून मोठ्या प्रमाणावर प्रतिबंधित अन्नपदार्थांचा साठा जप्त केला. याप्रकरणी अन्न सुरक्षा अधिकारी उमेश मार्तंड कापगते यांनी दिलेल्या लेखी फिर्यादीवरून दुकानाचा मालक साजीत खान शब्बीर पठाण (वय ४८ वर्ष, रा. नागाळा) याच्याविरुद्ध मूल पोलीस ठाण्यात विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Mul Hookah Tobacco प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई
अन्न व औषध प्रशासन विभागाचे अन्न सुरक्षा अधिकारी उमेश कापगते यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, महाराष्ट्र शासनाने सार्वजनिक आरोग्याचे हित लक्षात घेऊन राज्यातील गुटखा, पान मसाला, सुगंधित तंबाखू, खर्रा आणि अशा इतर मानवी आरोग्यास घातक असलेल्या अपमिश्रित अन्नपदार्थांच्या उत्पादन, साठा, वितरण आणि विक्रीवर पूर्णपणे बंदी घातली आहे. असे असतानाही आरोपी साजीत खान याने आपल्या दुकानात मानवी आरोग्यास कर्करोग आणि मुखरोगासारखे गंभीर आजार घडवून आणणारा प्रतिबंधित साठा विक्रीच्या उद्देशाने बाळगला होता. मूल पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक रुपेश कुंडलीक कुंभरे यांनी प्रतिबंधित अन्न पदार्थांच्या कारवाई संदर्भात संपर्क साधल्यानंतर अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी मूल पोलीस ठाण्यात हजर होऊन जप्त केलेल्या साठ्याची तपासणी केली.
या कारवाईदरम्यान पोलिसांना दुकानातून ‘होला हुक्का शीशा तंबाखू’ (MFD BY- ZEN Products Private Limited, Ahmedabad) चे प्रत्येकी १ किलो वजनाचे एकूण १९ पॅकेट्स आढळले. जप्त करण्यात आलेल्या या १९ किलो प्रतिबंधित हुक्का तंबाखूची एकूण किंमत २५,१७५ रुपये आहे. हा संपूर्ण साठा जप्त करून विश्लेषणासाठी त्याचे अनौपचारिक नमुने घेण्यात आले आहेत. याप्रकरणी शासकीय आदेशाचे उल्लंघन करून मानवी जीवाला धोका निर्माण केल्याबद्दल आरोपी साजीत खान शब्बीर पठाण याच्याविरुद्ध अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम २००६ च्या कलम २६(१), २६(२)(i), २६(२)(iv), २७(३)(e), ३०(२)(a) व ५० सहवाचन, तसेच भारतीय न्याय संहिता (BNS), २०२३ च्या कलम १२३, २२३, २७४ आणि २७५ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक विजय रामकृष्ण राठोड यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक व्यंकटेश यादवराव दोनोडे या प्रकरणाचा सखोल तपास करीत आहेत.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






