Rajura Land Dispute प्रकरणातील पांढरपवनी शेतातील हाणामारीचे प्रतीकात्मक दृश्य

‘तुमच्या बापाची शेती आहे का?’ धानोरकर कुटुंबात वाद

User avatar placeholder
Written by Prakash Hande

June 17, 2026

चंद्रपूर: Rajura Land Dispute प्रकरणात चंद्रपूर जिल्ह्यातील पांढरपवनी शेतशिवारात कौटुंबिक जमिनीच्या वादाचे हिंसक रूप पाहायला मिळाले. शेतात नागरणी करण्याच्या कारणावरून दोन गटांमध्ये झालेल्या हाणामारीत एका तरुणाचे डोके फोडण्यात आले, तर वृद्ध शेतकऱ्यासह त्यांच्या मुलालाही मारहाण करण्यात आली. या प्रकरणी राजुरा पोलिसांनी एकाच कुटुंबातील सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. (कोरपण्यात सुगंधित तंबाखूचा साठा जप्त)

राजुरा पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या पांढरपवनी शेतशिवारात कौटुंबिक जमिनीच्या वादातून दोन गटात झालेल्या हिंसक हाणामारीत एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. शेत सोडून दुसऱ्याच्या हद्दीत नागरणी करण्याच्या कारणावरून हटकल्याने चिडलेल्या चुलत भावाच्या मुलांनी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी मिळून वृद्ध चुलत्यासह त्यांच्या मुलाला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली, तर एका तरुणाच्या डोक्यावर काठीने प्रहार करून त्याचे डोके फोडले. याप्रकरणी राजुरा पोलिसांनी एकाच कुटुंबातील ६ जणांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या (BNS) विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

Rajura Land Dispute प्रकरण नेमके कसे घडले?

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, पांढरपवनी येथील ७५ वर्षीय वृद्ध मजूर हरिचंद्र विठू ऊर्फ विठोबा धानोरकर यांची ५ एकर वडोदरापार्जित शेती आहे, जी त्यांचे मोठे भाऊ भगवान विठू धानोरकर यांनी वेगवेगळी करून दिली होती. या जमिनीवर दोन्ही भावांची मुले आपापल्या हिश्श्यानुसार वहिवाट करत शेतीचे काम करतात. १६ जून २०२६ रोजी सकाळी सव्वादहा वाजेच्या सुमारास हरिचंद्र धानोरकर यांचे सुपुत्र रामेश्वर धानोरकर आणि सून मनीषा हे शेतावर गेले असता, त्यांचा पुतण्या बंडू भगवान धानोरकर हा हरिचंद्र यांच्या मालकीच्या शेतात ट्रॅक्टरने नागरणी करत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

यावेळी रामेश्वर यांनी ‘आपली शेती सोडून आमच्या शेतात नागरणी का करता?’ असा जाब विचारला. या किरकोळ कारणावरून वाद पेटला आणि शेतात उपस्थित असलेले बंडू भगवान धानोरकर, अनिल बंडू धानोरकर, सुनील बंडू धानोरकर, चेतन विठोबा धानोरकर, प्रतिभा अनिल धानोरकर आणि तेजस्विनी सुनील धानोरकर यांनी एकत्र येत ‘तुमच्या बापाची शेत आहे का, तुम्ही कोण बोलणारे?’ असे म्हणत वृद्ध हरिचंद्र व त्यांच्या मुलाला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली.

हा वाद आणि भांडण सोडविण्यासाठी चुलत भाऊ मंगेश धानोरकर, रमेश धानोरकर आणि गणेश सुरेश धानोरकर हे धावून आले असता, आरोपी सुनील बंडू धानोरकर याने संतप्त होऊन गणेश धानोरकर याच्या डोक्यावर काठीने जोरदार प्रहार केला. या भीषण हल्ल्यात गणेशचे डोके फुटून गंभीर दुखापत झाली आणि मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव सुरू झाला. मारहाणीनंतर आरोपींनी फिर्यादी हरिचंद्र व त्यांच्या मुलाला ‘तुम्हाला पाहून घेतो’ अशी जीवे मारण्याची धमकी देऊन शिवीगाळ केली.

या घटनेनंतर जखमी हरिचंद्र धानोरकर यांनी तात्काळ राजुरा पोलीस स्टेशन गाठून तोंडी तक्रार नोंदवली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी बंडू, अनिल, सुनील, चेतन, प्रतिभा आणि तेजस्विनी धानोरकर यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS), २०२३ च्या कलम ११८(१), १८९(२), १९०, १९१(२) आणि ३५१(२) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस ठाणे प्रभारी नितीनकुमार चिंचोलकर यांच्या मार्गदर्शनात पोलीस शिपाई नागोराव दत्ताराव भेंडेकर करत आहेत.

Advertisement

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment