चंद्रपूर: Chandrapur Durgapur Crime News समोर आली आहे. चंद्रपूर शहरातील दुर्गापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील समता नगर परिसरात रविवारी रात्री तुफान राडा झाला. सिमेंट कंपनीच्या गेटपासवरून उद्भवलेल्या क्षुल्लक वादातून दोन गटांत तुफान मारहाण झाली. यामध्ये लोखंडी कड्याने वार करून एका तरुणाचे डोके फोडण्यात आले. या प्रकरणी दुर्गापूर पोलिसांनी चार जणांविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. (हे हि वाचा – रात्री एटीएम मध्ये शिरला मात्र प्रयत्न फसला)
Chandrapur Durgapur Crime News: समता नगर परिसरात क्षुल्लक वादातून तुफान राडा
मिळालेल्या माहितीनुसार, समता नगर येथील रहिवासी तक्रारदार गंगा ईटकर (वय ४०) या मजुरीचे काम करून आपल्या कुटुंबाचा सांभाळ करतात. त्यांची बहीण कमला सुभाष ईटकर ही देखील शेजारीच राहते. कमला ईटकर यांचा मुलगा राहुल ईटकर (१९) व त्यांचा नातेवाईक विनीत पवार हे दोघे सिमेंट कंपनीत (CSTPS) मजुरीचे काम करतात. काम मिळण्यासाठी आवश्यक असणारा गेटपास बनवण्यासाठी राहुलने विनीत याच्याकडे कागदपत्रे दिली होती. रविवारी, १९ जुलै २०२६ रोजी रात्री ९:३० वाजताच्या सुमारास राहुल हा गेटपास आणण्यासाठी विनीतच्या घराकडे जात होता.
राहुल समता नगर येथील पाण्याच्या टाकीजवळ पोहोचला असता, तेथे उपस्थित असलेल्या राजू ईटकर याने त्याला अडवले. “तू आमच्या वस्तीत कशाला फिरत आहेस?” असा जाब विचारत राजूने राहुलला शिवीगाळ करून हाताने मारहाण करण्यास सुरुवात केली. घाबरलेल्या राहुलने तात्काळ घरी धाव घेऊन आपल्या कुटुंबाला घडलेला प्रकार सांगितला. यानंतर राहुलची आई कमला ईटकर, मावशी गंगा ईटकर आणि भाऊ करण उर्फ लक्की ईटकर हे सर्वजण राजू ईटकर याला जाब विचारण्यासाठी पाण्याच्या टाकीजवळ गेले.
नातेवाईक विचारणा करत असतानाच, राजू ईटकर याच्या घरून त्याची आई सोनी ईटकर, भाऊ संजू ईटकर आणि मनू ईटकर हे सर्वजण हातात मिळेल ते साहित्य घेऊन धावून आले. “तुम्ही येथे विचारणा करायला कशाला आलात?” असे ओरडत आरोपींनी चौकातच राहुलला पुन्हा मारहाण करण्यास सुरुवात केली. वाद विकोपाला गेल्याने मधात पडून भांडण सोडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या करण उर्फ लक्की याच्यावर आरोपी संजू ईटकर याने हातात असलेल्या लोखंडी कड्याने थेट डोक्यावर आणि डाव्या कानाच्या मागे जोरदार वार केला. या प्राणघातक हल्ल्यात लक्कीच्या डोक्यातून रक्ताच्या धारा वाहू लागल्या.
भांडण सोडवण्यासाठी पुढे आलेल्या तक्रारदार गंगा ईटकर यांच्या डाव्या गालावरही संजू ईटकर याने कड्याने मारहाण करून त्यांना जखमी केले. तर दुसरीकडे मनू ईटकर आणि सोनी ईटकर यांनी कमला ईटकर यांना जमिनीवर पाडून हाताबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. “जर पुन्हा या भागात आलात, तर जिवंत सोडणार नाही,” अशी धमकी देत आरोपींनी घटनास्थळावरून काढता पाय घेतला.
या भयानक प्रकारानंतर जखमींना तात्काळ उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यानंतर तक्रारदार गंगा ईटकर यांनी दुर्गापूर पोलीस ठाणे गाठून आपबिती सांगत फिर्याद नोंदवली. गंगा ईटकर यांच्या तोंडी रिपोर्टवरून दुर्गापूर पोलिसांनी आरोपी राजू ईटकर, सोनी ईटकर, संजू ईटकर आणि मनू ईटकर (सर्व रा. समता नगर, चंद्रपूर) यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS), २०२३ च्या कलम ११५(२), ११८(१), ३(५), ३५१(२) आणि ३५२ अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. या घटनेचा पुढील तपास ठाणे अंमलदार संतोष शेगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस शिपाई सूरज खाडे करत आहेत.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






