ब्रम्हपुरी – चंद्रपूर जिल्ह्यातून एक मोठी क्राईम न्यूज समोर आली आहे. (Bramhapuri Hookah Raid) अंतर्गत पोलिसांनी रुई गावामध्ये एका घरात सुरू असलेल्या बेकायदेशीर साठ्यावर थेट छापा टाकला. या धडक कारवाईत पोलिसांनी तब्बल ४६,३९५ रुपये किमतीचा प्रतिबंधित सुगंधीत तंबाखू आणि हुक्का शिशा साहित्याचा मोठा साठा जप्त केला आहे. पोलिसांनी या प्रकरणी मुख्य आरोपी भानुदास मारोती चौधरी याच्याविरुद्ध विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला असून या धडक कारवाईमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. (बेवारस कार मधून लाखोंचा सुगंधित तंबाखू जप्त)
चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत प्रतिबंधित सुगंधीत तंबाखू आणि हुक्का शिशा साहित्याची बेकायदेशीर विक्री करणाऱ्या एका मोठ्या अड्ड्यावर पोलिसांनी धाड टाकून कारवाई केली आहे. मौजा रुई येथील रहिवासी असलेला आरोपी भानुदास मारोती चौधरी याने आपल्या राहत्या घरात या प्रतिबंधित आणि आरोग्यास अत्यंत अपायकारक असणाऱ्या सुगंधीत तंबाखू पदार्थांची मोठ्या प्रमाणावर साठवणूक करून ठेवली होती. या गुप्त माहितीच्या आधारे ब्रम्हपुरी पोलिसांनी ११ जुलै २०२६ रोजी सायंकाळच्या सुमारास रुई गावातील त्याच्या घरावर छापा टाकला आणि तब्बल ४६,३९५ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईमुळे चंद्रपूर जिल्ह्यातील बेकायदेशीर अंमली आणि प्रतिबंधित पदार्थांची तस्करी करणाऱ्या तस्करांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
Bramhapuri Hookah Raid प्रकरणाचा सविस्तर पोलीस अहवाल
या कारवाईबाबत सविस्तर वृत्त असे की, ब्रम्हपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार निलेश विठ्ठल तुमसरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज खडसे आणि त्यांचे सहकारी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध दारू, जुगार आणि प्रतिबंधित सुगंधीत तंबाखू विक्रीच्या गुन्ह्यांचा शोध घेण्यासाठी खाजगी वाहनाने पेट्रोलिंग करत होते. दरम्यान, पोलीस पथक पेट्रोलिंगवर असताना त्यांना खात्रीशीर मुखबिराद्वारे माहिती मिळाली की, रुई गावातील भानुदास चौधरी हा आपल्या घरात प्रतिबंधित सुगंधीत तंबाखू व हुक्का शिशाचा साठा करून त्याची छुप्या पद्धतीने विक्री करत आहे. माहिती मिळताच पोलिसांनी कायदेशीर प्रक्रियेसाठी तात्काळ दोन पंचांना पाचारण केले आणि पंचांच्या उपस्थितीत रुई गावात आरोपीच्या घराचा शोध सुरू केला.
घराचा शोध घेत असताना पोलिसांना गावातीलच तरुणाने पोलिसांना थेट आरोपीच्या घरापर्यंत नेले. पोलिसांनी घराबाहेरून आवाज दिला असता, संशयित आरोपी भानुदास चौधरी हा घरात हजर नव्हता. घरात केवळ त्याचे वयोवृद्ध वडील मारोती हरी चौधरी (वय ७७ वर्षे) आणि आई सुनिता मारोती चौधरी (वय ७० वर्षे) उपस्थित होते. पोलिसांनी त्यांचा परिचय देऊन घराची पंचांसमक्ष सखोल झडती घेतली असता, घरातील स्टोअर रूममध्ये चार प्लास्टिकच्या चुंगळ्यांमध्ये लपवून ठेवलेला प्रतिबंधित तंबाखू आणि हुक्का शिशाचा मोठा साठा पोलिसांच्या हाती लागला.
या छाप्यात पोलिसांनी १९,८७५ रुपये किमतीचे १५ पॉकेट ‘होला हुक्का शिशा तंबाखू’, ११,४०० रुपये किमतीचे ‘मजा १०८ हुक्का शिशा तंबाखू’चे ४० टीनाचे डबे जप्त केले. याशिवाय ७,६५० रुपयांचे ९ पॉकेट ‘ईगल हुक्का शिशा तंबाखू’चे पाऊच आणि ७,४७० रुपयांचे १८ पॉकेट ईगल हुक्का शिशा असा एकूण ४६,३९५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या साठ्याबाबत वयोवृद्ध पालकांकडे विचारणा केली असता, हा माल त्यांचा मुलगा भानुदास याचाच असून त्यांना या व्यवहाराची काहीही माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले. पोलिसांनी घटनास्थळावरून रासायनिक प्रयोगशाळेच्या (सी.ए.) तपासणीसाठी काही नमुने सीलबंद करून मुद्देमाल जप्त केला.
या गंभीर प्रकरणी पोलीस अंमलदार निलेश तुमसरे यांच्या लेखी तक्रारीवरून ब्रम्हपुरी पोलीस ठाण्यात फरार आरोपी भानुदास मारोती चौधरीविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी त्याच्या विरोधात भारतीय न्याय संहिता (BNS), २०२३ च्या कलम २२३, २७५ आणि अन्न सुरक्षा व मानके अधिनियम, २००६ च्या कलम २६(२)(i), २६(२)(iv), ३०(२)(a) तसेच ४९ अन्वये गुन्हा क्रमांक ०५६१/२०२६ नुसार गुन्हा दाखल केला आहे. ठाणे प्रभारी अधिकारी तथा पोलीस निरीक्षक प्रमोद गोविंदराव बनबळे यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक मनोज दादाराो खडसे यांच्याकडे सोपवण्यात आला असून पोलीस सध्या फरार आरोपी भानुदास चौधरीचा शोध घेत आहेत.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






