भद्रावती सुगंधी तंबाखू साठ्यातून पोलिसांनी जप्त केलेला मुद्देमाल

घरात लपविला प्रतिबंधित सुगंधित तंबाखूचा साठा

User avatar placeholder
Written by Prakash Hande

ऑक्टोबर 19, 2026

भद्रावती – भद्रावती सुगंधित तंबाखू साठ्यावर पोलिसांनी १८ ऑक्टोबर २०२६ रोजी छापा टाकला. गौतम नगर भागातील एका घरातून प्रतिबंधित तंबाखू आणि खर्रा साहित्य जप्त करण्यात आले. पोलिसांनी सांगितल्यानुसार, एकूण १ लाख ७२ हजार ८६ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत झाला आहे. घरमालक अतुल कोल्हे याच्यासह तिघांविरुद्ध भद्रावती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. भारतीय न्याय संहिता आणि अन्न सुरक्षा कायद्यातील कलमे लावण्यात आली आहेत. (तेरवीवरून परतणाऱ्या व्यक्तीवर हल्ला, वाचा बातमी)

भद्रावती सुगंधीत तंबाखू साठ्यावर पोलिसांचा छापा

चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती शहरातून एक मोठी कारवाई समोर आली असून, गौतम नगर भागातील एका घरात शासनाने प्रतिबंधित केलेल्या सुगंधित तंबाखू आणि खर्रा साहित्याचा अवैध साठा करणाऱ्या एका मुख्य आराेपीसह तिघांना रंगेहाथ पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणी भद्रावती पोलीस ठाण्यात अन्न सुरक्षा मानके कायदा आणि भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, तब्बल सव्वा लाखांहून अधिक मूल्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवार १८ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी साडेबारा ते एक वाजण्याच्या सुमारास भद्रावती पोलीस ठाण्याचे पथक हद्दीत गस्तीवर असताना, गौतम नगर येथील अतुल कोल्हे याने आपल्या घरी शासनाने प्रतिबंधित केलेला सुगंधित तंबाखू व अन्य प्रतिबंधित अन्नपदार्थ बेकायदेशीररीत्या विक्रीसाठी साठवून ठेवल्याची खात्रीशीर माहिती मुखबिराकडून मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी पंचांसमक्ष गौतम नगर येथील अतुल कोल्हे याच्या घरी छापा टाकला. यावेळी घराच्या पहिल्या मजल्यावर असणाऱ्या मागील बेडरुममधील लाकडी फर्निचरच्या शेल्फमध्ये काही तरुण प्रतिबंधित तंबाखू, सुपारी आणि चुना मिक्स करून खैनी अथवा ‘खर्रा’ घोटत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.

१.७२ लाखांचा मुद्देमाल जप्त

पोलिसांनी घटनास्थळावर पकडलेल्या इसमांकडे विचारणा केली असता त्यांनी आपले नाव अनिकेत विनोद डोंगरे (वय २३, रा. हनुमान नगर पांडव वार्ड, भद्रावती), दीपक सुनील कुसनाके (वय २५, रा. पिपरबोडी, ता. भद्रावती) आणि यश मारोती दुपारे (वय १९, रा. चंडिका वार्ड, भद्रावती) असल्याचे सांगितले. तसेच या गुन्ह्यातील मुख्य पाहिजे असलेला आरोपी अतुल कोल्हे (रा. गौतम नगर, भद्रावती) याच्या मालकीच्या घरातून पोलिसांनी कसून झडती घेतली असता, तेथे विहित ९९ ग्रॅम वजनाची विमल पान मसाला पाकिटे, व्ही १ तंबाखू किंग पॅक, सुमारे ५०० ग्रॅम वजनाची प्रत्येकी २० पाकिटे असलेली सुगंधित तंबाखूची एकूण १२८ पाकिटे, तसेच प्रत्येकी २० किलो कत्रा सुपारीच्या दोन चुंगळ्या आणि खर्रा घोटण्यासाठी वापरण्यात येणारा चुना व प्लास्टिक पिशव्या असा एकूण १ लाख ७२ हजार ८६ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या कारवाईदरम्यान पोलिसांनी घटनास्थळावर पंचसमक्ष ५ किलो चुना व अर्धा किलो प्लास्टिक नष्ट केले, तर उर्वरित असा सर्व सविस्तर मुद्देमाल जप्त करून आरोपींसह पोलीस ठाण्यात आणण्यात आले. आरोपींनी शासनाकडून प्रतिबंध करण्यात आलेल्या सुगंधित तंबाखूची विनापरवाना साठवणूक व विक्री करून अन्न सुरक्षा आयुक्तांच्या आदेशाचे उल्लंघन केले आहे. तसेच अशा प्रकारच्या घातक पदार्थांच्या सेवनाने मानवी शरीरावर कर्करोग (कॅन्सर), मुखरोग व प्रजननावर विपरीत परिणाम होत असल्याची जाणीव असतानाही आर्थिक फायद्यासाठी लोकांच्या जीवाशी खेळणाऱ्या या इसमांवर भद्रावती पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम २२३, २७५, ४९, ३(५) सह अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम, २००६ च्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस हवालदार पेतरस सिडाम करीत आहेत.

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

2 thoughts on “घरात लपविला प्रतिबंधित सुगंधित तंबाखूचा साठा”

Leave a Comment