पोंभुर्णा – पोंभुर्णा बातम्या: तालुक्यात १८ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री हल्ल्याची घटना घडली. तेरवीच्या कार्यक्रमावरून परतणाऱ्या एका व्यक्तीला मारहाण झाल्याची तक्रार आहे. पोलिसांनी सांगितल्यानुसार, फिर्यादी मंगेष चन्नावार (४३) मशिद रोडने बसस्टॉपकडे जात होते. त्यावेळी दोघांनी कार थांबवून मारहाण केल्याचा आरोप आहे. त्यांच्या डोक्याला दुखापत झाली. या प्रकरणी पोंभुर्णा पोलिसांनी दोघांविरुद्ध भारतीय न्याय संहितेतील कलमांखाली गुन्हा नोंदवला आहे.
पोंभुर्णा तालुक्यातून एक खळबळजनक घटना समोर आली असून, तेरवीच्या कार्यक्रमावरून घरी परतत असताना एका व्यक्तीवर प्राणघातक हल्ला करण्यात आल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पोंभुर्णा पोलीस ठाण्यात दोघा जणांविरुद्ध गंभीर गुन्ह्यांची नोंद करण्यात आली असून, पोलिसांनी तात्काळ तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत. (प्रेयसीची हत्या करून मृतदेह नागपुरात पुरला, वाचा बातमी)
पोंभुर्णा बातम्या: मशिद रोडवर नेमके काय घडले
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगेष प्रभाकर चन्नावार (वय ४३, रा. ताडाळा, तुकूम, ता. मूल, जि. चंद्रपूर, सध्या रा. पोंभुर्णा) हे पोंभुर्णा येथील मीनाबाई सुरमवार यांच्या घरी गेल्या दोन वर्षांपासून राहत आहेत. काल दिनांक १८ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास पोंभुर्णा येथील रूपेश चन्नावार यांच्या आईचा तेरवीचा कार्यक्रम असल्यामुळे मंगेष चन्नावार हे त्या कार्यक्रमासाठी गेले होते. कार्यक्रम आटोपल्यानंतर रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास ते रूपेश चन्नावार यांच्या घरून बाहेर पडले आणि मशिद रोडने पोंभुर्णा बसस्टॉपच्या दिशेने जात होते.
त्याच वेळी आरोपी अंकुश संजय बोलमवार (रा. पोंभुर्णा) आणि युवराज घोसेकर (रा. मूल, जि. चंद्रपूर) यांनी आपली कार मंगेष यांच्या जवळ आणून अचानक थांबवली. कारमधून खाली उतरताच आरोपींनी मंगेष यांना “थांब बे साल्या, कोठे चाललास?” असे म्हणत दमदाटी करण्यास सुरुवात केली. यादरम्यान संतापलेल्या अंकुश बोलमवार याने कारमधून एक लाकडी काठी काढून मंगेष यांच्या डोक्यावर जोराचा प्रहार केला, ज्यामुळे त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन रक्तस्त्राव झाला. तितक्यात दुसऱ्या आरोपीने म्हणजेच युवराज घोसेकर याने मंगेष यांचा गळा आवळून त्यांना रस्त्यावरील वॉल कंपाऊंडवर जोरदार आपटले. या अचानक झालेल्या हल्ल्याने घाबरलेल्या फिर्यादीने आरोपींचे पाय धरल्यानंतर आरोपी तिथून पसार झाले.
घटनेनंतर फिर्यादी मंगेष चन्नावार यांनी थेट पोंभुर्णा पोलीस ठाणे गाठून घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. पोलिसांनी तात्काळ दखल घेत त्यांना ग्रामीण रुग्णालय पोंभुर्णा येथे वैद्यकीय उपचारासाठी नेले, व उपचार पूर्ण झाल्यानंतर त्यांचा तोंडी फिर्यादी रिपोर्ट नोंदवून घेतला. या प्रकरणी पोंभुर्णा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (बीएनएस), २०२३ च्या कलम ११८(१), ३(५) आणि ३५२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस शिपाई अंकुश मंडडे करीत आहेत.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now







1 thought on “पोंभुर्णा येथे तेरवीहून परतणाऱ्या व्यक्तीवर हल्ला; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल”