राजुरा (चंद्रपूर): Rajura Crime News Today अंतर्गत राजुरा शहरात मध्यरात्री रक्तरंजित थरार समोर आला आहे. मोटारसायकल थांबवताना ब्रेकचा आवाज झाल्याच्या कारणावरून वाद निर्माण झाला. त्यानंतर काळ्या थारमधून आलेल्या चौघांनी दोघा तरुणांवर लोखंडी रॉडने प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात दोघे गंभीर जखमी झाले असून पोलिसांनी खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे. (हे हि वाचा – भद्रावती पोलिसांच्या छापेमारीत १ किलो गांजा जप्त)
मोटारसायकल थांबवताना झालेल्या ब्रेकच्या किरकोळ आवाजावरून झालेल्या वादातून चौघांनी संगनमत करून दोघा तरुणांवर लोखंडी रॉड आणि दगडांनी जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना राजुरा शहरात घडली आहे. इन्फंट स्कूल समोरील पानठेल्यावरून सुरू झालेल्या या वादाचे पर्यवसान काही वेळातच पंचायत समिती चौकात रक्तरंजित हाणामारीत झाले. काळ्या रंगाच्या थार गाडीतून आलेल्या चार तरुणांनी दोघांवर रॉडने सपासप वार करत त्यांना गंभीर जखमी केले असून, या प्रकरणी राजुरा पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न (Attempt to Murder) तसेच इतर गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काळ्या थारमधून आलेल्या चौघांचा लोखंडी रॉड व दगडांनी हल्ला
तक्रारीनुसार, २३ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री १०:३० वाजताच्या सुमारास उज्ज्वल विनायक भंटारकर (वय २८, रा. चुनाभट्टी वार्ड, राजुरा) व त्याचा मित्र ऋचिक उर्फ सोनू धनराज चुनारकर हे दोघे मोटारसायकलने इन्फंट स्कूल जवळील पानठेल्यावर खर्रा खाण्यासाठी गेले होते. पानठेल्यासमोर गाडी थांबवत असताना मोटारसायकलच्या ब्रेकचा अचानक मोठा आवाज आला. यावेळी तेथे उभा असलेला संशयित अभय लांडे याने “गाडीचा एवढा आवाज का करत आहात?” अशी विचारणा करत दोघांनाही अश्लील शिवीगाळ केली व “तुम्हाला बघून घेतो” अशी धमकी देऊन निघून गेला. त्यानंतर उज्ज्वल व सोनू हे दोघे पंचायत समिती चौकात येऊन आपसात बोलत थांबले होते.
मित्राला वाचवण्यासाठी धावलेला सोनू चुनारकर गंभीर जखमी
काही वेळातच एका काळ्या रंगाच्या थार गाडीतून अभय लांडे, आकाश राठोड, रितिक लांडे आणि करण हावडा हे चौघे तेथे आले. गाडीतून खाली उतरताच अभय लांडे व करण हावडा यांच्या हातात लोखंडी रॉड होते. “साले ज्यादा मस्ती आ गई क्या, आज तुमको जान से मार दुंगा” अशी धमकी देत त्यांनी उज्ज्वलच्या पाठीवर, कमरेवर व डोक्यावर रॉडने जबर प्रहार केले. मित्र सोनू चुनारकर हा भांडण सोडवण्यासाठी मध्यस्थी करण्यास आला असता, आरोपींनी त्याच्यावरही लोखंडी रॉड व दगडांनी तुटून पडत डोक्यावर, नाकावर व हनुवटीवर बेदम मारहाण केली. गंभीर दुखापतीमुळे सोनू रक्ताच्या थारोळ्यात जागीच बेशुद्ध पडला, हे पाहून चौघेही हल्लेखोर थार गाडीतून पसार झाले.
घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी धाव घेऊन दोघा जखमींना तातडीने राजुरा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, सोनू चुनारकर याच्या डोक्याच्या मागील बाजूस गंभीर दुखापत झाल्याने व उज्ज्वलच्या नाकातून रक्तस्त्राव सुरू असल्याने डॉक्टरांनी दोघांनाही पुढील उपचारासाठी चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवले, जेथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. जखमींची प्रकृती स्थिर झाल्यानंतर पोलिसांनी घेतलेल्या जबाबावरून राजुरा पोलीस ठाण्यात आरोपी अभय लांडे, आकाश राठोड, रितिक लांडे आणि करण हावडा यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम १०९(१) (हत्येचा प्रयत्न), ११५(२), ११८(१) आणि ३(५) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. ठाणे प्रभारी निरीक्षक नितीनकुमार चिंचोलकर यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश पाटील या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






