भद्रावती (चंद्रपूर): Bhadrawati Ganja Raid News अंतर्गत पोलिसांनी मध्यरात्री मोठी कारवाई केली आहे. गजानन नगर येथील एका घरातून १.०४७ किलो ओलसर गांजा जप्त करण्यात आला आहे. आरोपीने हा गांजा घराच्या छतावरील गुप्त जागेत लपवून ठेवला होता. पोलिसांनी २२ वर्षीय तरुणाला बेड्या ठोकल्या असून नागपूर कनेक्शन समोर आले आहे. (हे हि वाचा – नात जावयाने चोरली सोन्याची चैन)
शहरातील गजानन नगर परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास स्थानिक पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे धडक कारवाई करत छताच्या गुप्त जागेत लपवून ठेवलेला १.०४७ किलोग्रॅम ओलसर गांजा आणि मोबाईल असा एकूण २२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणात २२ वर्षीय तरुणाला बेड्या ठोकण्यात आल्या असून, त्याने हा अंमली पदार्थ नागपूर येथून किरकोळ विक्रीसाठी आणल्याची धक्कादायक माहिती तपासात निष्पन्न झाली आहे. या कारवाईमुळे शहरातील अंमली पदार्थ तस्करांचे धाबे दणाणले आहेत.
पोलिसांची मध्यरात्री गजानन नगरात मोठी कारवाई
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय मिश्रा हे पथकासह २4 ऑगस्ट २०२६ च्या पहाटे रात्रगस्त घालत असताना गजानन नगर येथील आयुष देवानंद नरवाडे (वय २२) हा स्वतःच्या राहत्या घरात गांजा बाळगून विक्री करत असल्याची खात्रीशीर गुप्त माहिती मिळाली. माहितीचे गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ वरिष्ठांना अवगत करण्यात आले व उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांची परवानगी मिळवून कायदेशीर प्रक्रियेची पूर्तता करण्यात आली. त्यानंतर परिभ्रमण पोलीस उपअधीक्षक सचिन खेत्रे यांच्या नेतृत्वात, स्वतंत्र पंच, शासकीय मापारी आणि फोटोग्राफरसह पोलीस पथकाने पहाटे साडेतीनच्या सुमारास संशयित आयुष नरवाडे याच्या घरावर छापा टाकला. एनडीपीएस कायद्यानुसार सर्व कायदेशीर प्रक्रिया पार पाडत पंचांसमक्ष घराची कसून झडती घेण्यात आली.
१.०४७ किलो ओलसर गांजा आणि मोबाईलसह २२ हजारांचा मुद्देमाल जप्त
झडतीदरम्यान पहिल्या खोलीत काहीही आक्षेपार्ह आढळले नाही, मात्र आतील खोलीच्या लाकडी छताला दोन बाय दोन आकाराचा भाग कापलेला दिसला. पोलिसांच्या पथकाने छतावरील त्या गुप्त जागेत चढून पाहणी केली असता तेथे एक प्लास्टिक पिशवी लपवून ठेवल्याचे उघडकीस आले. त्या पिशवीची पंचांसमक्ष खात्री केली असता त्यात तीव्र उग्र वास येणारा गांजा मिळून आला. शासकीय मापारी यांच्या इलेक्ट्रॉनिक वजनकाट्यावर वजन केले असता १२ हजार रुपये किमतीचा १ किलो ४७ ग्रॅम ओलसर गांजा आणि आरोपीकडील १० हजार रुपये किमतीचा मोबाईल असा एकूण २२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्ती पंचनाम्यासह सीलबंद करण्यात आला.
पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर आरोपी आयुष नरवाडे याने हा गांजा नागपूरच्या ताजबाग परिसरातील नावेद नावाच्या इसमाकडून किरकोळ विक्रीच्या उद्देशाने खरेदी केल्याची कबुली दिली आहे. या प्रकरणी आरोपीविरुद्ध भद्रावती पोलीस ठाण्यात अंमली पदार्थ विरोधी कायद्यान्वये (NDPS Act 1985 चे कलम 8(c), 20(b)(ii)(B) आणि 29) गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक विरेंद्र केदारे यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. नागपूर ते भद्रावती अशा पसरलेल्या या अंमली पदार्थ रॅकेटचा मुख्य सूत्रधार शोधण्यासाठी पोलीस पुढील तपास वेगाने करत आहेत.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






