चंद्रपूर: Chandrapur Post Office Rakhi Service अंतर्गत रक्षाबंधनासाठी टपाल विभागाने विशेष पुढाकार घेतला आहे. दूरगावी आणि परदेशात राहणाऱ्या भावांसाठी राखी पाठवणे आता अधिक सोपे झाले आहे. चंद्रपूर मुख्य पोस्ट ऑफिस आवारातील सॉर्टिंग काउंटर रात्रीपर्यंत खुले राहणार आहे. सायंकाळी ४:०० ते रात्री ८:३० या वेळेत विशेष बुकिंग सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.
बहीण-भावाच्या अतूट प्रेमाचा सण असलेल्या रक्षाबंधनानिमित्त दूरगावी किंवा परदेशात राहणाऱ्या भावांपर्यंत वेळेत राखी पोहोचवण्यासाठी भारतीय डाक विभागाने (India Post) चंद्रपूर येथे विशेष पुढाकार घेतला आहे. कामाच्या व्यस्ततेमुळे अथवा नियमित वेळेत पोस्टात जाणे शक्य न झालेल्या बहिणींसाठी चंद्रपूर मुख्य पोस्ट ऑफिसच्या आवारातील ‘चंद्रपूर सॉर्टिंग बुकिंग काउंटर’ सज्ज झाले असून, येथे सायंकाळच्या वेळेतही देश-विदेशात राख्या व पार्सल पाठवण्याची विशेष सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. (हे हि वाचा – जोखमीची गर्भावस्था, आरोग्य कर्मचाऱ्यांनी बजावली चोख कामगिरी)
सामान्यतः पोस्ट ऑफिसची नियमित कामकाजाची वेळ संपल्यानंतर नागरिकांना स्पीड पोस्ट अथवा पार्सल बुक करता येत नाही. ही अडचण लक्षात घेऊन डाक विभागाने चंद्रपूर सॉर्टिंग काउंटरवर दररोज सायंकाळी ४:०० ते रात्री ८:३० या वेळेत विशेष बुकिंग सेवा कार्यान्वित केली आहे. या विस्तारित सेवेमुळे नागरिकांना नोकरी-व्यवसाय सांभाळून रात्री उशिरापर्यंत भारतात कुठेही तसेच थेट परदेशातही स्पीड पोस्ट आणि पार्सलच्या माध्यमातून राखी पाठवणे शक्य झाले आहे. जगभरात कुठेही सुरक्षित पोहोच, वेगवान वितरण आणि पार्सल ट्रॅकिंग अशा अत्याधुनिक सुविधांमुळे टपाल विभागावर नागरिकांचा विश्वास अधिक दृढ होत आहे.
परदेशात राहणाऱ्या भावांसाठी ‘आंतरराष्ट्रीय राखी मेल बुकिंग सेवा’ देखील या काउंटरवर विशेषत्वाने उपलब्ध करून देण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय पार्सल बुक करण्यासाठी नागरिकांना वैध ओळखपत्र (पॅन कार्ड, पासपोर्ट किंवा इतर शासकीय ओळखपत्र), प्राप्तकर्त्याचा अचूक पत्ता व पिनकोड, वस्तूंचा तपशील आणि मूल्य माहिती कस्टम्स प्रक्रियेसाठी सादर करावी लागणार आहे. या विशेष सेवेचा लाभ चंद्रपूर परिसरातील सर्व नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन डाक विभागाकडून करण्यात आले असून अधिक माहितीसाठी ९९७५१४५५०२ या क्रमांकावर संपर्क साधता येईल. डाक विभागाच्या या तत्पर सुविधेमुळे भौगोलिक दुरावा पुसून सणाच्या दिवशी प्रत्येक भावाच्या हातावर वेळेत राखी पोहोचण्याचा मार्ग सुकर झाला आहे.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






