Bhadrawati Tobacco Raid police seized banned tobacco and betel nut in ghadpet

भद्रावतीमध्ये दीड लाखांचा प्रतिबंधित सुगंधित तंबाखू जप्त, दोन विक्रेत्यांवर गुन्हा दाखल

User avatar placeholder
Written by Prakash Hande

September 6, 2026

भद्रावती – Bhadrawati Tobacco Raid मोहिमेअंतर्गत भद्रावती पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. घोडपेठ परिसरात पोलिसांनी छापा टाकला. तेथून १ लाख ४७ हजार ४५० रुपयांचा साठा जप्त करण्यात आला. यात प्रतिबंधित सुगंधित तंबाखू आणि कत्रा सुपारीचा समावेश आहे. पोलिसांनी दोन विक्रेत्यांवर गंभीर गुन्हे नोंदवले आहेत. परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक सचिन खेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई झाली.

शासनाने प्रतिबंधित केलेल्या सुगंधित तंबाखू आणि कत्रा सुपारीची छुप्या मार्गाने विक्री करणाऱ्यांविरुद्ध भद्रावती पोलिसांनी धडक मोहीम राबवत घोडपेठ येथे मोठी कारवाई केली आहे. ४ सप्टेंबर रोजी पोलिसांनी टाकलेल्या या छाप्यात सुमारे १ लाख ४७ हजार ४५० रुपयांचा बेकायदेशीर मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून, या प्रकरणी दोन आरोपींविरुद्ध अन्न सुरक्षा मानके आणि भारतीय न्याय संहितेअंतर्गत गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. (हे हि वाचा – मोपेडवरून गांजा तस्करी, महिलेला अटक)

Bhadrawati Tobacco Raid: घोडपेठ येथे पोलिसांचा धडक छापा

भद्रावती पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी तथा परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक सचिन खेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक घोडपेठ परिसरात गस्त घालत असताना, गोपनीय बातमीदाराकडून पोलिसांना खात्रीशीर माहिती मिळाली. घोडपेठ येथील बुद्ध विहाराच्या मागे राहणारे मासूम काटकर व समीर देवगडे हे दोघे शासनाने बंदी घातलेल्या सुगंधित तंबाखूचा मोठ्या प्रमाणावर साठा करून त्याची परिसरात चोरट्या मार्गाने विक्री करत असल्याची माहिती समोर आली. माहितीची खात्री पटताच पोलीस पथकाने पंचांना सोबत घेऊन तातडीने संशयितांच्या निवासस्थानी धडक दिली.

मासूम काटकर याच्या घरातून १ लाखांहून अधिक किमतीचा तंबाखू जप्त

पोलिसांनी घोडपेठ येथील दोन्ही संशयितांच्या घरांची कसून झाडाझडती घेतली असता घरात लपवून ठेवलेला प्रतिबंधित साठा उघडकीस आला. यामध्ये आरोपी मासूम बाबा काटकर (वय २५ वर्षे, रा. घोडपेठ) याच्या घरातून ‘मजा १०८’ कंपनीच्या हुक्का शिष्या सुगंधित तंबाखूचे तब्बल ४०० डब्बे जप्त करण्यात आले, ज्याची अंदाजे किंमत १ लाख १४ हजार रुपये आहे. तर दुसरा आरोपी पानठेला चालक समीर गोवर्धन देवगडे (वय ३५ वर्षे, रा. घोडपेठ) याच्या घरातून ‘मजा १०८’ सुगंधित तंबाखूचे ५० डब्बे (किंमत १४ हजार २५० रुपये) तसेच ४० किलो वजनाची कत्रा सुपारी (किंमत १९ हजार २०० रुपये), असा एकूण ३३ हजार ४५० रुपयांचा साठा जप्त करण्यात आला. दोन्ही ठिकाणांहून पोलिसांनी एकूण १ लाख ४७ हजार ४५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करून सील केला.

आरोग्यास घातक ठरणाऱ्या या प्रतिबंधित सुगंधित तंबाखू व कत्रा सुपारीची अवैध विक्री आणि साठा केल्याप्रकरणी भद्रावती पोलीस ठाण्यात समीर देवगडे आणि मासूम काटकर या दोघांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम २२३, २७५, ४९, ३(५) सहकलम ३०(२)(अ), २६(२)(४), ३, ४, ५९ अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम २००६ अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. हा एवढ्या मोठ्या प्रमाणातील साठा आरोपींनी कुठून मागवला होता आणि या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा समावेश आहे, या दिशेने पोलीस आता सखोल तपास करीत आहेत.

सदर धडक कामगिरी प्रभारी अधिकारी तथा परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक सचिन खेत्रे यांच्या नेतृत्वात सपोनि संजय मिश्रा, सहायक पोलीस उपनिरीक्षक पेटरस सिडाम, पोलीस हवालदार प्रशांत शेंदरे, नाईक पोलीस अंमलदार भारत, पोलीस अंमलदार शंकर आणि महिला पोलीस शिपाई मोनाली यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली. भद्रावती पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे अवैध तंबाखू विक्रेते आणि तस्करांचे धाबे दणाणले आहेत.

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment