भद्रावती (चंद्रपूर): Bhadrawati Scented Tobacco Raid मोहिमेअंतर्गत भद्रावती पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. शहरात बंदी असलेला सुगंधित तंबाखू छुप्या पद्धतीने विकणाऱ्यावर छापा टाकण्यात आला. भंगाराम वॉर्डातील एका घरातून ‘मजा १०८’ कंपनीचा तंबाखू जप्त झाला. अन्न सुरक्षा व नवीन कायद्यान्वये आरोपीवर थेट गुन्हा दाखल झाला आहे. (हे हि वाचा – चंद्रपूर जिल्ह्यातील १० सराईत गुन्हेगारांवर हद्दपारीची कारवाई)
Bhadrawati Scented Tobacco Raid: अवैध सुगंधित तंबाखूवर पोलिसांचा छापा
शासनाने मानवी आरोग्यासाठी अत्यंत घातक असलेल्या सुगंधित तंबाखूवर संपूर्ण बंदी घातलेली असतानाही, भद्रावती शहरात छुप्या पद्धतीने प्रतिबंधित तंबाखूची साठवणूक आणि विक्री सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. भद्रावती पोलिसांनी आज २८ ऑगस्ट रोजी भंगाराम वॉर्ड परिसरात एका घरावर धाड टाकून प्रतिबंधित ‘मजा १०८’ सुगंधित तंबाखूचा साठा जप्त केला असून, याप्रकरणी एका पानमटेरियल विक्रेत्याविरुद्ध विविध गंभीर कलमान्वये गुन्हा नोंदवला आहे.
भंगाराम वॉर्डातील घरातून ‘मजा १०८’ कंपनीचा तंबाखू साठा जप्त
भद्रावती पोलीस स्टेशनचे पथक हद्दीत अवैध धंद्यांवर कारवाई करण्यासाठी पेट्रोलिंग करत असताना, भंगाराम वॉर्डातील पीर खा राजे खा पठाण (वय ५० वर्ष, रा. भंगाराम वॉर्ड, भद्रावती) हा व्यक्ती आपल्या राहत्या घरातील हॉलमध्ये प्रतिबंधित सुगंधित तंबाखूचे डब्बे विक्रीसाठी बाळगून असल्याची खात्रीशीर गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक संतोष केदार, पोलीस अंमलदार प्रेमकुमार बावनकर आणि पोलीस शिपाई यांनी दोन पंचांना सोबत घेऊन तातडीने संबंधित ठिकाणी छापा टाकला. पोलिसांनी पंचांसमक्ष घराची झाडाझडती घेतली असता, हॉलमधील सोफ्यावर एका बॉक्समध्ये ‘मजा १०८’ कंपनीचे लेबल लावलेले प्रत्येकी ५० ग्रॅम वजनाचे एकूण १० सीलबंद डब्बे बेकायदेशीररीत्या साठवून ठेवल्याचे आढळून आले. बाजारात या जप्त साठ्याची किंमत २ हजार ८५० रुपये इतकी आहे.
चौकशीदरम्यान आरोपीने हा सुगंधित तंबाखू किरकोळ विक्रीसाठी आणल्याचे आणि तो सुपारी व चुन्यासोबत मिसळून खवय्यांना विकत असल्याची कबुली दिली. सुगंधित तंबाखूचे सेवन केल्यामुळे कर्करोग, मुखरोग आणि इतर घातक आजार होऊन जनआरोग्यास मोठा धोका पोहोचतो याची पूर्ण जाणीव असतानाही आरोपीने नफ्यासाठी हा साठा बाळगला होता. या प्रकरणी पोलिसांनी जप्त मुद्देमालाचा पंचनामा करून नमुने सिलबंद केले आहेत. पोलीस अंमलदार प्रेमकुमार बावनकर यांच्या तक्रारीवरून आरोपी पीर खा राजे खा पठाण याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ चे कलम २७५, २८६ सह अन्न व सुरक्षा मानके कायदा २००६ चे कलम २६(२)(i), २६(२)(iv), २७(३)(e), ३०(२)(a) आणि ५९ अन्वये भद्रावती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






