चंद्रपूर: Chandrapur Crime News अंतर्गत चंद्रपूर जिल्हा पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. गुन्हेगारी प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी प्रशासनाने १० सराईत गुन्हेगारांना जिल्ह्यातून तडीपार केले. ब्रह्मपुरी आणि चंद्रपूर शहर उपविभागातील समाजकंटकांवर ही धडक कारवाई करण्यात आली. यामुळे गुन्हेगारी वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. (हे हि वाचा – चिमुरमधील २ दारूविक्रेते तडीपार)
Chandrapur Crime News: पोलीस प्रशासनाची गुन्हेगारीविरुद्ध धडक मोहीम
जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आणि गुन्हेगारी प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी चंद्रपूर जिल्हा पोलीस प्रशासनाने समाजकंटकांविरुद्ध जोरदार मोहीम उघडली आहे. नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या आणि सातत्याने गुन्हेगारी कारवायांमध्ये सक्रिय असणाऱ्या ब्रह्मपुरी आणि चंद्रपूर शहर उपविभागातील तब्बल १० सराईत गुन्हेगारांना चंद्रपूर जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे. या धडक कारवाईमुळे गुन्हेगारी वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.
ब्रह्मपुरी पोलीस स्टेशन हद्दीतील ४ सराईत दारू विक्रेत्यांवर हद्दपारीचा आदेश
पहिल्या कारवाईत, ब्रह्मपुरी पोलीस स्टेशनच्या हद्दीत अवैध दारू विक्री आणि सट्टापट्टीचा जुगार चालवून गावात दहशत निर्माण करणाऱ्या ४ सराईत गुन्हेगारांवर तडीपारीची कारवाई करण्यात आली. यामध्ये संजय मधुकर लांजेवार (वय ५२, रा. फुलेनगर, ब्रह्मपुरी), सुरज नामदेव बगमारे (वय ३७, रा. बोंडेगाव हुळकी, ब्रह्मपुरी), कमलसिंग मायासिंग जुनी (वय २५, रा. मेंडकी, ता. ब्रह्मपुरी) आणि वैभव उर्फ गोलू नानाजी राऊत (वय ३०, रा. गणेशपूर, ता. ब्रह्मपुरी) यांचा समावेश आहे.
या चौघांविरुद्ध यापूर्वी प्रतिबंधक कारवाया करूनही त्यांच्या वर्तनात सुधारणा झाली नव्हती, उलट त्यांच्या दहशतीमुळे सर्वसामान्यांमध्ये असुरक्षिततेचे वातावरण होते. या पार्श्वभूमीवर ब्रह्मपुरी पोलिसांनी तडीपारीचा प्रस्ताव तयार करून उपविभागीय दंडाधिकारी ब्रह्मपुरी यांच्याकडे सादर केला होता. सर्व कायदेशीर बाबींची पडताळणी करून उपविभागीय दंडाधिकार्यांनी या चारही गुन्हेगारांना १ महिन्यासाठी चंद्रपूर जिल्ह्याच्या हद्दीतून हद्दपार करण्याचे आदेश जारी केले असून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन जिल्ह्याबाहेर रवाना केले आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी साहील झरकर आणि पोलीस निरीक्षक प्रमोद बानबले यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि मनोज खडसे, पोहवा मुकेश गजबे, मिलिंद नैताम, अंमलदार प्रविण भिवगडे, इरशाद खान, निलेश तूमसरे, स्वप्नील पळसपगार व वशिष्ट रंगारी यांनी पार पाडली.
चंद्रपूर शहर उपविभागातील ६ गुन्हेगारांवर कलम ५६ अन्वये तडीपारी
दुसऱ्या धडक कारवाईत, चंद्रपूर उपविभागांतर्गत नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या ६ सराईत गुन्हेगारांवर महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५६ अन्वये तडीपारीचा बडगा उगारण्यात आला आहे. यामध्ये घुग्घूस येथील प्रितम धनराज लभाने (वय २८) याला ३ महिने, रयतवारी कॉलरी येथील नंदकिशोर रामसागर सोनी (वय ५०) याला ६ महिने, जलनगर वॉर्ड येथील शंकर नागलु तोकलवार (वय ४७) याला ३ महिने, इंदिरानगर येथील अन्सार अलीम खान पठाण (वय २५) याला ६ महिने, जलनगर वॉर्ड येथील दिनेश किशोर मडावी (वय ४०) याला ६ महिने आणि बाबुपेठ वॉर्ड येथील शिवम योगेश रागीट (वय २२) याला ६ महिन्यांच्या कालावधीसाठी जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे.
या सर्व आरोपींवर चोरी, घरफोडी, जबर दुखापत करणे, अवैध हत्यार बाळगणे, जुगार आणि अवैध दारू विक्रीसारखे गंभीर गुन्हे दाखल असून, त्यांच्या दहशतीमुळे नागरिक व साक्षीदार न्यायालयात किंवा पोलिसांसमोर उघडपणे साक्ष देण्यासही घाबरत होते. घुग्घुस, चंद्रपूर शहर व रामनगर पोलिसांनी सादर केलेल्या प्रस्तावांवर उपविभागीय दंडाधिकारी चंद्रपूर यांनी कायदेशीर पडताळणी करून हे तडीपारीचे आदेश दिले. ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद चौगुले, ठाणे प्रभारी प्रकाश राऊत, पोलीस निरीक्षक निशीकांत रामटेके आणि पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरके यांच्या पथकाने पूर्ण केली. जिल्हा गुन्हेगारीमुक्त करण्यासाठी आणि नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करण्यासाठी बेकायदेशीर कृत्य करणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा कडक इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






