चंद्रपूर: Chandrapur Police Crime Action अंतर्गत चंद्रपूर जिल्हा पोलीस दलाने गुन्हेगारी प्रवृत्तीच्या घटकांवर जरब बसवण्यासाठी आक्रमक मोहीम उघडली आहे. पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी आणि अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीत ही विशेष कारवाई पार पडली. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) कलम १२६ व १२९ अन्वये ५२८ इसमांवर कारवाई करण्यात आली. (हे हि वाचा – चंद्रपूर पोलिसांचा गुन्हेगारांना इशारा, आता थेट मकोका व हद्दपारी)
Chandrapur Police Crime Action अंतर्गत ५२८ इसमांवर मोठी कारवाई
जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासोबतच गुन्हेगारी प्रवृत्तीच्या घटकांवर जरब बसवण्यासाठी चंद्रपूर जिल्हा पोलीस दलाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीत संपूर्ण जिल्ह्यात विशेष प्रतिबंधक मोहीम (Preventive Action Camp) राबवली जात आहे. या धडक मोहिमेअंतर्गत भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) कलम १२६ व १२९ अन्वये विविध उपविभागांमध्ये आतापर्यंत तब्बल ५२८ इसमांवर प्रतिबंधक कारवाई करण्यात आली असून, यामुळे जिल्ह्यातील गुन्हेगारी वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
जिल्ह्यातील शांततेला बाधा निर्माण करणाऱ्या समाजकंटकांना चाप लावण्यासाठी पोलिसांनी वेगवेगळ्या उपविभागांमध्ये शिबिरांचे नियोजन केले होते. या मोहिमेची सुरुवात वरोरा उपविभागातून झाली असून तेथे १६ जुलै २०२६ रोजी १०८ जणांवर, तर त्यानंतर पुन्हा २७ ऑगस्ट रोजी वरोरा उपविभागातच ११२ संशयितांवर अशाच प्रकारे प्रतिबंधक कारवाई करण्यात आली. यानंतर मोहिमेची व्याप्ती वाढवत ३ सप्टेंबर रोजी चंद्रपूर उपविभागात एकाच दिवशी विक्रमी १३५ जणांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला. पाठोपाठ ७ सप्टेंबर रोजी राजुरा उपविभागातील ७४ आणि ९ सप्टेंबर रोजी चिमूर उपविभागातील ९९ इसमांवर भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या तरतुदींनुसार कडक कायदेशीर कारवाई पूर्ण करण्यात आली. विविध तारखांना राबवलेल्या या मोहिमेमुळे आतापर्यंत एकूण ५२८ समाजकंटकांवर कायद्याचा फास आवळण्यात पोलिसांना मोठे यश आले आहे.
दरम्यान, पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले आहे की ही मोहीम इथेच थांबणार नसून तिचा पुढील टप्पा ब्रह्मपुरी आणि मूल उपविभागात राबवला जाणार आहे. येत्या दोन दिवसांत या दोन्ही उपविभागांमध्ये विशेष प्रिव्हेन्टिव्ह कॅम्प आयोजित करून गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व कायदा-सुव्यवस्थेला धोका ठरणाऱ्या संशयितांवर तातडीने प्रतिबंधक कारवाई केली जाईल. समाजात शांतता, सुव्यवस्था व नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करण्यासाठी चंद्रपूर पोलीस दल कटिबद्ध असून, समाजकंटक तसेच उपद्रवी घटकांवर अशा प्रकारचा कठोर कायदेशीर बडगा यापुढेही सातत्याने सुरूच राहील, असा सज्जड इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






