चंद्रपूर : Chandrapur Job Alert अंतर्गत स्थानिक नोकरी शोधणाऱ्या अनुभवी उमेदवारांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रियदर्शनी इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृहात व्यवस्थापक पदासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. सदर पद ११ महिन्यांच्या कंत्राटी तत्त्वावर भरण्यात येणार आहे. निवड झालेल्या व्यवस्थापकाला दरमहा १६ हजार रुपये मानधन दिले जाईल. (हे हि वाचा – चंद्रपुरात अग्निविर भरती)
इच्छुक व पात्र उमेदवारांनी २५ सप्टेंबर २०२६ पर्यंत आपले अर्ज सादर करावेत. निवासी उपजिल्हाधिकारी डी. एस. कुंभार यांनी याविषयी अधिकृत पत्रक प्रसिद्ध केले आहे.
Chandrapur Job Alert: प्रियदर्शनी सांस्कृतिक सभागृहात व्यवस्थापक पदाची भरती
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अधिनस्त असलेल्या प्रियदर्शनी इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृह, चंद्रपूर येथे व्यवस्थापक म्हणून मानधन तत्त्वावर काम करण्यासाठी पात्र व अनुभवी व्यक्तींकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. सदर नियुक्ती 11 महिन्यांच्या कालावधीसाठी अस्थायी स्वरूपात कंत्राटी पद्धतीने करण्यात येणार असून व्यवस्थापकास दरमहा 16 हजार रुपये मानधन देण्यात येणार आहे.
व्यवस्थापक पदासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि कामाचा अनुभव
व्यवस्थापक पदासाठी सेवानिवृत्त अधिकारी/कर्मचारी किंवा शासकीय अथवा अशासकीय कार्यालयीन कामाचा किमान 10 वर्षांचा अनुभव असलेली व्यक्ती पात्र राहील. अर्जदार चंद्रपूर मुख्यालयी वास्तव्यास असणे आवश्यक असून तो पदवीधारक असावा. तसेच संगणकाचे ज्ञान व एमएस-सीआयटी (MS-CIT) पात्रता आवश्यक आहे.
नियुक्त व्यवस्थापकाकडे प्रियदर्शनी इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृहाची देखरेख व जतन करणे, विविध व्यक्ती व संस्थांच्या कार्यक्रमांसाठी नाट्यगृह आरक्षित करून देणे, नाट्यगृहाच्या उत्पन्न व खर्चाचा हिशेब ठेवणे, नाट्यगृहात घडणाऱ्या घटनांची नोंद ठेवणे तसेच वरिष्ठांनी वेळोवेळी दिलेल्या आदेश व निर्देशांनुसार कामकाज करण्याची जबाबदारी राहणार आहे.
25 सप्टेंबरपर्यंत अर्ज सादर करा : इच्छुक, पात्र व अनुभवी व्यक्तींनी आवश्यक कागदपत्रांसह सहायक करमणूक कर अधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय, चंद्रपूर यांच्याकडे दि. 15 ते 25 सप्टेंबर 2026 या कालावधीत कार्यालयीन वेळेत अर्ज सादर करावा. दि. 25 सप्टेंबरनंतर प्राप्त होणाऱ्या अर्जांचा विचार केला जाणार नाही.
निवड झालेल्या उमेदवाराची नियुक्ती जिल्हाधिकारी, चंद्रपूर यांच्या अधिकारात 11 महिन्यांसाठी पूर्णतः तात्पुरत्या स्वरूपात कंत्राटी पद्धतीने करण्यात येईल. या कालावधीत सेवा असमाधानकारक आढळल्यास कोणतीही पूर्वसूचना न देता सेवा समाप्त करण्याचा अधिकार प्रशासनास राहील. या नियुक्तीमुळे नियमित नियुक्तीचा हक्क निर्माण होणार नाही. तसेच रजा, भरपाई, वैद्यकीय प्रतिपूर्ती, सेवाज्येष्ठता, सेवानिवृत्ती वेतन अथवा अन्य सेवाविषयक लाभ अनुज्ञेय राहणार नाहीत.
व्यवस्थापकाच्या निष्काळजीपणामुळे अथवा चुकीमुळे सभागृहाचे आर्थिक नुकसान किंवा हानी झाल्यास संबंधित रक्कम मानधनातून वसूल करण्याचा अधिकार जिल्हाधिकारी यांना राहील. कंत्राटाचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर सेवा आपोआप संपुष्टात येईल. सेवा समाधानकारक असल्यास नियमानुसार पुढील कालावधीसाठी मुदतवाढ देण्याचे अधिकार जिल्हाधिकारी यांनी राखून ठेवले आहेत.
नियुक्तीचा कालावधी पूर्ण होण्यापूर्वी सेवा सोडावयाची असल्यास एक महिना अगोदर लेखी नोटीस देणे आवश्यक राहील. नोटीस न दिल्यास एक महिन्याचे मानधन कपात करण्यात येईल. नियुक्त व्यक्तीस नेमून दिलेली कामे तसेच जिल्हाधिकारी यांनी वेळोवेळी दिलेल्या निर्देशानुसार काम करणे बंधनकारक राहील, असे निवासी उपजिल्हाधिकारी डी. एस. कुंभार यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now


