चंद्रपूर: डाक जीवन विमा अभिकर्ता पदासाठी भारतीय डाक विभागाने इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविले आहेत. यासाठी चंद्रपुरात २७ ऑक्टोबर २०२६ रोजी थेट मुलाखत होणार आहे. वरिष्ठ अधीक्षक एस. रामकृष्णा यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलाखत सकाळी ११ ते दुपारी ४ या वेळेत घेतली जाईल. ती वरिष्ठ अधीक्षक डाकघर कार्यालय, चंद्रपूर विभाग येथे होणार आहे. किमान १० वी पास आणि १८ वर्षे वयाचे उमेदवार अर्ज करू शकतात. अर्जाचा नमुना कार्यालयात उपलब्ध आहे. (मूल व पोंभुर्णा तालुक्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा, वाचा बातमी)
भारतीय डाक विभागाच्या वतीने डाक जीवन विमा योजनेअंतर्गत अभिकर्ता (एजंट) पदावर नियुक्ती करण्यासाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. यासंदर्भातील अर्जाचा नमुना चंद्रपूरच्या डाक अधीक्षक कार्यालयात उपलब्ध करून देण्यात आला असून, जे तरुण व नागरिक या क्षेत्रात करिअर करू इच्छितात त्यांच्यासाठी ही एक उत्तम संधी आहे.
डाक जीवन विमा अभिकर्ता पदासाठी कोण पात्र आहेत?
पात्रता व अटी: या पदासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवाराचे किमान वय १८ वर्षे असणे आवश्यक असून शैक्षणिक पात्रता किमान १० वी पास ठरविण्यात आली आहे. यामध्ये प्रामुख्याने बेरोजगार किंवा स्वयंरोजगार करणारे शिक्षित तरुण, माजी जीवन सल्लागार, इन्शुरन्स कंपन्यांचे माजी एजंट, माजी सैनिक, अंगणवाडी सेविका, महिला मंडळ सेविका तसेच सेवानिवृत्त शिक्षक सहभाग घेऊ शकतात. मात्र, अर्जदार उमेदवार हा सद्यस्थितीत अन्य कोणत्याही इन्शुरन्स कंपनीचा एजंट नसावा.
निवड प्रक्रिया व परवाना: उमेदवारांची निवड थेट मुलाखतीद्वारे केली जाणार असून, मुलाखतीत त्यांचे व्यावसायिक कौशल्य, व्यक्तिमत्व, परस्पर संबंधाचे कौशल्य आणि जीवन विम्याबाबतचे ज्ञान तपासले जाईल. निवड झालेल्या उमेदवारास सुरक्षा ठेव म्हणून ५ हजार रुपयांची अनामत रक्कम जमा करावी लागेल. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर डाक विभागाकडून तात्पुरता परवाना दिला जाईल, जो आयआरडीएची (IRDA) परवाना परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतर कायमस्वरूपी परवान्यात रूपांतरित केला जाईल. तसेच निवड झालेल्या उमेदवारांना टपाल विभागाने वेळोवेळी ठरवून दिलेले आकर्षक कमिशन दिले जाईल.
मुलाखतीची वेळ व आवश्यक कागदपत्रे:
इच्छुक उमेदवारांनी सर्व आवश्यक शैक्षणिक प्रमाणपत्रे जसे की १० वी किंवा १२ वी बोर्डाचे प्रमाणपत्र, जन्मतारखेचा दाखला, पॅन कार्ड, संगणक ज्ञानाचे प्रमाणपत्र (असल्यास) आणि अन्य संबंधित कागदपत्रांसह विहित नमुन्यातील अर्ज घेऊन थेट उपस्थित राहणे आवश्यक आहे. याकरिता २७ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत ‘वरिष्ठ अधीक्षक डाकघर कार्यालय, चंद्रपूर विभाग, चंद्रपूर’ येथे उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. याविषयी अधिक माहितीसाठी जवळच्या डाक कार्यालयाशी संपर्क साधावा किंवा www.maharashtrapost.gov.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी, अशी माहिती वरिष्ठ अधीक्षक एस. रामकृष्णा यांनी दिली आहे.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now





