चंद्रपूर : दिव्यांग मोपेड चोरी प्रकरणात रामनगर पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून ४० हजार रुपये किमतीचे वाहन जप्त करण्यात आले. ही कारवाई चंद्रपूर शहरात करण्यात आली. १८ ऑक्टोबर रोजी नगीनाबाग येथील बंगला चौकातून ही दुचाकी चोरीला गेली होती. ती दिव्यांग व्यक्तीच्या वापरासाठी मागे दोन चाके लावून रूपांतरित केली होती. याप्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३ (२) नुसार गुन्हा दाखल झाला होता. पोलिसांनी सांगितल्यानुसार, गोपनीय माहितीच्या आधारे संशयिताचा शोध घेण्यात आला.
चंद्रपूर शहरातील रामनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून दिव्यांग व्यक्तीच्या वापरासाठी विशेष रूपांतरीत केलेली मोपेड लांबवणाऱ्या एका चोरट्याला पोलिसांनी शिताफीने जेरबंद केले असून, त्याच्याकडून चोरीला गेलेली ४० हजार रुपये किमतीची मोटारसायकल हस्तगत करण्यात आली आहे. या धडक कारवाईमुळे रामनगर पोलिसांनी आणखी एका गुन्ह्याची उकल करण्यात यश मिळवले आहे. (चंद्रपुरात रिक्षा चोरी, रामनगर पोलिसांनी आरोपीला केली अटक, वाचा बातमी)
दिव्यांग मोपेड चोरी: १८ ऑक्टोबरला नेमके काय घडले?
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गत १८ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी दोन ते सहा वाजेच्या दरम्यान तक्रारदार बाळू तुकाराम पवार (वय ४९ वर्षे, रा. बालाजी वार्ड क्र. ०२, चंद्रपूर) हे दिव्यांग असून त्यांनी स्वतःच्या वापरासाठी होंडा अॅक्टिव्हा मोपेड (क्रमांक एम.एच. ३४ सी.बी. ६९८०) या गाडीला मागे दोन चाके लावून रूपांतरित केली होती. त्यांनी ही वाहन सवारी बंगला चौक, नगीनाबाग येथील एका दुकानासमोर उभी केली असता, अज्ञात चोरट्याने संधी साधत ती लांबवली. याप्रकरणी तक्रारदाराच्या फिर्यादीवरून रामनगर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३ (२) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक श्री. आयुष नोपानी, अपर पोलीस अधीक्षक श्री. ईश्वर काककडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. प्रमोद चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली रामनगर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरके यांनी शोध पथकाला आरोपीचा शोध घेण्याच्या सक्त सूचना दिल्या होत्या. त्यानुसार रामनगर पोलिसांचे शोध पथक या चोरीच्या गुन्ह्याचा समांतर तपास करत असताना, सदर मोटारसायकल किशोर बाजीराव महाडोरे (वय ४२ वर्षे, रा. मेंडकी, ता. ब्रम्हपुरी, जि. चंद्रपूर) याने चोरल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. दरम्यान, आरोपी पोलिसांना वारंवार चकवा देत होता, परंतु पोलिसांनी सतत त्याच्या मागावर राहत त्याचा ठावठिकाणा शोधून काढला आणि अखेर त्यास ताब्यात घेतले. पोलिसांनी त्याच्याकडून गुन्ह्यात चोरलेली ४० हजार रुपये किमतीची मोटारसायकल जप्त केली असून, आरोपीकडून अन्य काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
ही यशस्वी कारवाई रामनगर पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरके, सहायक पोलीस निरीक्षक शिवाजी नागवे, सहायक पोलीस निरीक्षक हनुमान उगले, पोलीस उपनिरीक्षक कृष्णा दराडे, आणि शोध पथकातील पोलीस अंमलदार आनंद खरात, प्रकाश बलकी, मंगेश शेंडे, रामप्रसाद नैताम, बाबा नैताम, रविकुमार ढेंगळे, जितेंद्र आकरे, मनिषा मोरे, पंकज ठोंबरे, प्रकाश मडावी, संदिप गेडाम, सुरेश कोरवार, पंकज पोंदे, सुरज शेडमाके व ब्ल्युटी साखरे यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडली.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






