तळोधी (बाळापूर) / नागभीड: Talodhi Police Action Case अंतर्गत तळोधी पोलिसांनी हद्दपारीचा आदेश झुगारणाऱ्या एका इसमाविरुद्ध गुन्हा नोंदवून त्याला ताब्यात घेतले आहे. नागभीड तालुक्यातील नांदेड गोपाळ टोली येथे ही कारवाई करण्यात आली.उपविभागीय दंडाधिकाऱ्यांनी आरोपीला तळोधी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून हद्दपार केले होते. मात्र बंदीचा आदेश झुगारून आरोपी छुप्या मार्गाने आपल्या घरी आला होता.
गोपनीय माहिती मिळताच पोलिसांनी पंचांसमक्ष छापा टाकून आरोपीला पकडले. त्याच्याविरुद्ध शासकीय आदेशाच्या उल्लंघनाप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (हे हि वाचा – पुरातन मंदिराजवळ बांधकाम भोवले, व्यापाऱ्यांवर गुन्हा दाखल)
Talodhi Police Action Case अंतर्गत हद्दपार आरोपीला बेड्या
कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी महसूल प्रशासनाने जारी केलेल्या हद्दपारीच्या आदेशाला वाटाण्याच्या अक्षता लावून पोलीस ठाण्याच्या हद्दीत बेकायदेशीरपणे वावरणाऱ्या एका इसमावर तळोधी पोलिसांनी थेट कारवाईचा बडगा उगारला आहे. ब्रह्मपुरीच्या उपविभागीय दंडाधिकाऱ्यांनी (SDM) तळोधी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वास्तव्यास बंदी घातलेली असतानाही छुप्या पद्धतीने घरी आलेल्या पुरुषोत्तम मनिराम बांबोळे (वय ४४, रा. नांदेड गोपाळ टोली, ता. नागभीड) याच्याविरुद्ध पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या (BNS) तरतुदींनुसार गुन्हा नोंदवून त्याला ताब्यात घेतले आहे.
उपविभागीय दंडाधिकारी ब्रह्मपुरी यांनी जारी केला होता हद्दपारीचा आदेश
मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, नागभीड तालुक्यातील मौजा नांदेड गोपाळ टोली येथील रहिवासी पुरुषोत्तम बांबोळे याच्या उपद्रवी हालचाली लक्षात घेता उपविभागीय दंडाधिकारी ब्रह्मपुरी यांनी फौजदारी संकीर्ण अर्ज क्र. १९२/२०२६ आणि भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या (BNSS) कलम १६३(२) अन्वये ७ सप्टेंबर २०२६ रोजी प्रतिबंधात्मक आदेश जारी केला होता. या आदेशानुसार पुरुषोत्तम बांबोळे याला १० सप्टेंबर २०२६ ते ११ सप्टेंबर २०२६ या कालावधीत तळोधी (बाळापूर) पोलीस ठाण्याच्या हद्दीत प्रवेश करण्यास व वास्तव्यास सक्त मनाई करण्यात आली होती. मात्र, प्रशासकीय आदेशाची मुदत सुरू असतानाच गुरुवार, १० सप्टेंबर रोजी आरोपी छुप्या मार्गाने आपल्या नांदेड गोपाळ टोली येथील राहत्या घरी परत आल्याची गोपनीय माहिती तळोधीचे ठाणेदार यांना मिळाली.
माहिती मिळताच ठाणेदारांच्या निर्देशानुसार पोलीस हवालदार प्रल्हाद वालदे, पोलीस अंमलदार सुभाष पवळे व सैनिक नितेश बोरकर यांचे पथक तातडीने मौजा नांदेड येथे रवाना झाले. पोलिसांनी स्थानिक पोलीस पाटील शीतल प्रेमदास किचकापे तसेच सरपंच-प्रशासक मुरलीधर प्रभाकर गौरकर यांना सोबत घेऊन आरोपीच्या घरावर अचानक छापा टाकला असता, पुरुषोत्तम बांबोळे हा घरात संशयास्पदरीत्या बसलेला आढळून आला. पोलिसांनी पंचांसमक्ष त्याला हद्दपारीच्या आदेशाची प्रत वाचून दाखवत कोणत्याही सक्षम अधिकाऱ्याची अधिकृत परवानगी घेतली आहे का, अशी विचारणा केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. प्रशासकीय आदेशाचे उघड उल्लंघन केल्याचे स्पष्ट झाल्याने पोलिसांनी पंचांसमक्ष पंचनामा करून आरोपीला तात्काळ ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले.
शासकीय आदेशाची जाणीवपूर्वक अवहेलना केल्याप्रकरणी पोलीस हवालदार प्रल्हाद जीतूजी वालदे यांच्या तक्रारीवरून आरोपी पुरुषोत्तम मनिराम बांबोळे याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ च्या कलम २२३ (शासकीय आदेशाचे उल्लंघन) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. ठाणे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल गुहे यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा पुढील सखोल तपास पोलीस हवालदार योगेश तुळाराम शिवणकर करत आहेत. प्रशासनाने कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टीने दिलेल्या हद्दपारी अथवा प्रतिबंधात्मक आदेशांचे उल्लंघन करणाऱ्या असामाजिक घटकांवर यापुढेही अशीच कठोर कारवाई केली जाईल, असा सज्जड इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






