नागभीड हद्दपार आरोपी प्रकरणातील पोलिसांच्या कारवाईचे प्रतिनिधिक छायाचित्र

हद्दपारीचा आदेश असतानाही आरोपी नागभीडमध्ये कसा?

User avatar placeholder
Written by Prakash Hande

ऑक्टोबर 10, 2026

नागभीड : नागभीड हद्दपार आरोपी अंबा उर्फ अमित शाम मडकाम याला नागभीड पोलिसांनी राममंदिर चौकातून ताब्यात घेतले. उपविभागीय दंडाधिकारी न्यायालयाच्या हद्दपारी आदेशाचे उल्लंघन केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. ही कारवाई ९ ऑक्टोबर २०२६ रोजी मध्यरात्री करण्यात आली. आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम २२३ अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. नागभीड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हद्दपारीचा आदेश ८ ऑक्टोबर सकाळी ६ वाजल्यापासून १० ऑक्टोबर सकाळी ६ वाजेपर्यंत लागू होता. प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अजिंक्य गोविंदलवार करत आहेत. (४ ऑक्टोबरला मारहाण तो तरुण अजूनही बेशुद्ध, वाचा हि बातमी)

नागभीडमध्ये हद्दपार आरोपीला अटक

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, ८ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री नागभीड पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार दिलीप चौधरी, पोलीस उपनिरीक्षक अजिंक्य गोविंदलवार आणि पोलीस अमंलदार जय रोहनकर हे पथकासह टाउन बीट परिसरात रात्रगस्त घालत होते. गस्तीदरम्यान गुप्त बातमीदाराकडून पोलिसांना खात्रीशीर माहिती मिळाली की, नागभीड शहरातून हद्दपार करण्यात आलेला इसम अंबा उर्फ अमित मडकाम हा मौजा नागभीड येथील राममंदिर चौक परिसरात फिरत आहे. मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलीस पथकाने पंचांना सोबत घेऊन ९ ऑक्टोबरच्या मध्यरात्री १२:२५ वाजेच्या सुमारास राममंदिर चौकात अचानक छापा टाकला. त्यावेळी आरोपी अंबा उर्फ अमित हा त्या परिसरात संशयास्पदरीत्या फिरताना आढळून आल्याने पोलिसांनी त्याला पंचासमक्ष तातडीने ताब्यात घेतले.

ताब्यात घेतल्यानंतर आरोपीची नागभीड येथील ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली आणि त्याला पुढील कायदेशीर कारवाईसाठी नागभीड पोलीस ठाण्यात आणण्यात आले. पोलिसांच्या प्राथमिक तपासात निष्पन्न झाले की, ब्रम्हपुरी येथील उपविभागीय दंडाधिकारी न्यायालयाने (आदेश क्र. ४०३/२०२६) आरोपीला ८ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ६:०० वाजेपासून १० ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ६:०० वाजेपर्यंत नागभीड पोलीस ठाण्याच्या हद्दीतून हद्दपार केले होते. प्रशासकीय आदेशानुसार त्याला या काळात नागभीड हद्दीत वास्तव्यास पूर्णपणे बंदी घालण्यात आली होती.

असे असतानाही आरोपी अंबा उर्फ अमित मडकाम याने कोणत्याही प्रकारची पूर्वपरवानगी न घेता प्रशासनाच्या आदेशाचे सर्रास उल्लंघन केले आणि नागभीड शहर हद्दीतील राममंदिर चौकात बेकायदेशीरपणे प्रवेश केला. शासकीय आदेशाचा अवमान करून बंदी घातलेल्या क्षेत्रात आढळल्याने पोलीस हवालदार दिलीप चौधरी यांच्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध नागभीड पोलीस ठाण्यात कलम २२३ BNS अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील सखोल तपास पोलीस उपनिरीक्षक अजिंक्य गोविंदलवार करत आहेत.

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment