चंद्रपूर – चंद्रपूर गांजा जप्त प्रकरणी शहर पोलिसांच्या डीबी पथकाने भिवापूर वॉर्डात कारवाई केली. पोलिसांच्या माहितीनुसार, नुराणी मशिदीजवळील एका घरातून २४६ ग्रॅम गांजासदृश पदार्थ जप्त करण्यात आला. जप्त पदार्थाची अंदाजे बाजारकिंमत ४ हजार ९२० रुपये असल्याचे सांगण्यात आले. ही कारवाई ८ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी करण्यात आली. या प्रकरणी ६९ वर्षीय व्यक्तीविरुद्ध एनडीपीएस कायदा १९८५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास चंद्रपूर शहर पोलीस करत आहेत. पांडुरंग गंगाधर बानलवार (वय ६९, रा. नुराणी मशिदीजवळ, भिवापूर वॉर्ड, चंद्रपूर) असे अमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी कारवाई करण्यात आलेल्या वृद्धाचे नाव आहे. (वाढदिवसावर वाजला डीजे, दुर्गापूर पोलिसांनी केला जप्त, वाचा बातमी)
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, ८ ऑक्टोबर २०२६ रोजी चंद्रपूर शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कृणाल रामटेके हे डीबी पथकासह परिसरात गस्त घालत असताना, पांडुरंग बानलवार हा आपल्या राहत्या घरी गांजा आणून त्याची छुप्या रीतीने विक्री करत असल्याची गोपनीय माहिती खबऱ्याकडून मिळाली. या माहितीची खात्री पटल्यानंतर ठाणेदारांना पूर्वकल्पना देऊन उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांची रीतसर परवानगी घेण्यात आली. त्यानंतर शासकीय पंच, फोटोग्राफर आणि वजनकाटाधारकाला पाचारण करून पोलीस पथकाने सायंकाळच्या सुमारास भिवापूर वॉर्डातील नुराणी मशिदीजवळील आरोपीच्या घरावर धाड टाकली.
घरातून २४६ ग्रॅम गांजासदृश पदार्थ जप्त
एनडीपीएस कायद्यातील नियमांनुसार आरोपीला नोटीस देऊन पंचांसमक्ष त्याच्या घराची बारकाईने झडती घेण्यात आली. त्यावेळी घराच्या आवारातील ओट्यावर ठेवलेल्या एका प्लास्टिक पिशवीमध्ये वाळलेली हिरवी पाने, फुले, देठ व बिया असा गांजासदृश अंमली पदार्थ आढळून आला. वजनकाटाधारकाकडून पंचांसमक्ष मोजमाप केले असता पिशवीत २४६ ग्रॅम निव्वळ गांजा असल्याचे निष्पन्न झाले, ज्याची बाजारातील अंदाजे किंमत ४ हजार ९२० रुपये आहे. पोलिसांनी पंचांसमक्ष सर्व मुद्देमाल सील करून जप्त केला आहे.
विक्रीसाठी बेकायदेशीरपणे गांजा बाळगल्याप्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक कृणाल रामटेके यांच्या तक्रारीवरून आरोपी पांडुरंग बानलवार याच्याविरुद्ध चंद्रपूर शहर पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायदा १९८५ च्या कलम ८(क) आणि २०(ब)(ii)(अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील सखोल तपास पोलीस हवालदार जावेद सिद्दिकी करत आहेत.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






