चंद्रपूर / वरोरा: Warora Ganja Crime News चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. कालरी वार्ड नवीन वस्ती परिसरात पोलिसांनी छापा टाकला.
घरातून गांजा विक्री करणाऱ्या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून हजारो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
शहरातील कालरी वार्ड, नवीन वस्ती परिसरात राहत्या घरातून अमली पदार्थांची चोरटी विक्री करणाऱ्या एका तरुणावर वरोरा पोलिसांनी धडक कारवाई करत छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी आरोपीकडून सुमारे १४ हजार ५०० रुपये किमतीचा २८८.८६ ग्रॅम गांजा जप्त केला असून, आरोपीविरुद्ध अंमली पदार्थ विरोधी कायद्यान्वये (एनडीपीएस ॲक्ट) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुरज उर्फ भुऱ्या तेजुराम शाहू (वय २३ वर्षे, रा. नवीन वस्ती, कालरी वार्ड, वरोरा) असे ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. (हे हि वाचा – ५ वर्षीय मुलीवर अत्याचार, न्यायालयाने सुनावली २० वर्षाची शिक्षा)
गुप्त बातमीदाराच्या माहितीवरून घराची केली झाडाझडती
वरोरा पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाला गुप्त बातमीदाराकडून खात्रीशीर माहिती मिळाली होती की, कालरी वार्ड नवीन वस्ती येथे राहणारा सुरज शाहू हा स्वतःच्या राहत्या घरातून गांजा या अमली पदार्थाची साठवणूक करून विक्री करत आहे. या माहितीची तात्काळ दखल घेत पथकाने पोलीस निरीक्षक ओमप्रकाश सोनटक्के यांना सविस्तर माहिती दिली. त्यानंतर वरोरा उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बाकल यांच्याकडून एनडीपीएस कायद्याच्या कलम ४२ नुसार कायदेशीर कारवाईची रीतसर लेखी परवानगी प्राप्त करण्यात आली. कारवाईसाठी नगर परिषदेचे दोन शासकीय पंच, डिजिटल वजनकाट्यासह मापारी आणि छायाचित्रकार यांना पाचारण करून संपूर्ण कायदेशीर प्रक्रियेची पूर्तता करण्यात आली.
एनडीपीएस कायद्याच्या कलम ५० नुसार पाळली कायदेशीर प्रक्रिया
पोलिसांचे पथक कालरी वार्ड येथील संशयित आरोपी सुरज शाहू याच्या घराजवळ पोहोचले असता, पोलिसांनी त्यास ताब्यात घेऊन आपला अधिकृत परिचय दिला. एनडीपीएस कायद्याच्या कलम ५० अन्वये त्याला राजपत्रित अधिकाऱ्यांसमक्ष झडती घेण्याचा कायदेशीर अधिकार समजावून सांगत रीतसर नोटीस बजावण्यात आली. आरोपीने उपस्थित पोलीस निरीक्षक यांच्या समक्ष झडतीस सहमती दर्शविल्यानंतर पंचांच्या उपस्थितीत त्याच्या घराची बारकाईने तपासणी करण्यात आली.
घरातील बेडरूममध्ये लाकडी बेडच्या कोपऱ्यात एका पांढऱ्या-कथ्या रंगाच्या फुलांची नक्षी असलेल्या कापडी पिशवीची तपासणी केली असता, त्यात केशरी रंगाच्या पॉलिथिनमध्ये काळपट-हिरवट रंगाची ओलसर झाडपत्ती, पाने, फुले व बिया असलेला उग्र वासाचा गांजा मिळून आला. अधिकृत मापारीमार्फत डिजिटल वजनकाट्यावर मोजणी केली असता एकूण २८८.८६ ग्रॅम निव्वळ गांजा आढळून आला, ज्याची अंदाजे बाजारमूल्य किंमत १४ हजार ५०० रुपये इतकी आहे. पोलिसांनी हा मुद्देमाल रीतसर पितळी सील लावून सीलबंद केला. या संपूर्ण कारवाईचे ‘ई-साक्ष’ ॲपच्या माध्यमातून डिजिटल व्हिडिओ रेकॉर्डिंग व छायाचित्रण करून साक्ष कायद्यानुसार प्रमाणपत्र प्राप्त करण्यात आले आहे.
स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी बेकायदेशीररीत्या गांजा बाळगून त्याची विक्री केल्याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक मनिष जगन्नाथ तालेवार यांच्या तक्रारीवरून आरोपी सुरज उर्फ भुऱ्या शाहू याच्याविरुद्ध वरोरा पोलीस ठाण्यात कलम ८(क) आणि २०(ब) गुंगीकारक औषधीद्रव्य आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ (NDPS Act) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही यशस्वी कारवाई पोलीस निरीक्षक ओमप्रकाश सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मनिष तालेवार, पोलीस हवालदार संदीप, पोलीस अंमलदार विशाल, मनोज, महेश आणि चालक प्रशांत यांच्या पथकाने केली असून, या प्रकरणाचा पुढील सखोल तपास पोलीस उपनिरीक्षक उमाकांत गौरकर करत आहेत
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






