चंद्रपूर: Chandrapur Crime News अंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यातून मोठी बातमी समोर आली आहे. पडोली पोलिसांनी नागपूर-चंद्रपूर महामार्गावरील ताडाळी टी-पॉईंट परिसरात धडक कारवाई केली. एका घरावर छापा टाकून पोलिसांनी १ किलो ३२६ ग्रॅम गांजा जप्त केला. (हे हि वाचा – बल्लारपुरात एटीएम ची दहशत, पोलिसांनी ठोकल्या बेड्या)
या कारवाईत गांजा आणि रोकड मिळून ७२ हजार रुपयांपेक्षा अधिक मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. घरातून अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्या एका महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
Chandrapur Crime News : पडोली पोलिसांची ताडाळीत मोठी मोहीम
चंद्रपूर येथील पडोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत अमली पदार्थ तस्करांविरोधात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. नागपूर-चंद्रपूर महामार्गालगत असलेल्या ताडाळी टी-पॉईंट परिसरातील एका घरातून १ किलो ३२६ ग्रॅम गांजा आणि रोख रक्कमेसह एकूण ७२ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी रानी महेंद्र नारायण झा (वय ५९ वर्षे, मूळ रा. बभनगामा, सुपौल, बिहार; सध्या रा. ताडाळी टी-पॉईंट) नामक महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
बुधवारी सकाळी पडोली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुधाकर कोकोडे यांना गुप्त बातमीदाराकडून ताडाळी टी-पॉईंट येथील एका घरात महिला अमली पदार्थांची विक्री व साठा करत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. माहितीचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तत्काळ एनडीपीएस कायद्यांतर्गत आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली. पोलीस अधीक्षक आणि उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांकडून लेखी परवानगी घेतल्यानंतर स्थानिक दोन स्वतंत्र पंच तसेच वजन मोजण्यासाठी अधिकृत सराफा दुकानातील प्रतिनिधीला सोबत घेण्यात आले.
दुपारी सुमारे पावणेएकच्या सुमारास पोलीस पथकाने ताडाळी टी-पॉईंट येथील संशयित महिलेच्या घरावर छापा टाकला. पोलिसांनी स्वतःची ओळख पटवून दिल्यानंतर एनडीपीएस कायद्याच्या कलम ५० अन्वये संशयित महिलेला लेखी नोटीस देऊन कायदेशीर अधिकारांची जाणीव करून दिली. महिलेच्या संमतीनंतर तिच्या घराची कसून झडती घेण्यात आली असता पहिल्या खोलीतील पलंगाखाली एका काळ्या रंगाच्या प्लास्टिक पिशवीत लपवून ठेवलेला हिरवट-तपकिरी रंगाचा गांजा आढळून आला. वजनकाट्यावर मोजणी केली असता पिशवीसह गांजाचे एकूण वजन १ किलो ३२६ ग्रॅम भरले, ज्याची अंदाजे किंमत ६२ हजार ५०० रुपये आहे. याशिवाय घराच्या झडतीत ९ हजार ७५० रुपयांची रोकडही पोलिसांना मिळून आली.
पोलिसांनी सर्व मुद्देमाल शासकीय पितळी सील लावून पंचांसमक्ष जप्त केला. या संपूर्ण कारवाईचे ‘ई-साक्ष’ मोबाईल ॲपद्वारे व्हिडिओ रेकॉर्डिंग आणि छायाचित्रीकरण करून डिजिटल पुरावे नोंदवण्यात आले आहेत. या प्रकरणी पोलीस निरीक्षक सुधाकर कोकोडे यांच्या तक्रारीवरून आरोपी महिलेविरुद्ध एनडीपीएस कायद्याच्या कलम ८(क), २०(ब)(ii)(B) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक देवानंद केकान करत आहेत.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






